...तर भारताला कापूस आयातीची येणार वेळ : सीएआयचा इशारा

...तर भारताला कापूस आयातीची येणार वेळ : सीएआयचा इशारा
...तर भारताला कापूस आयातीची येणार वेळ : सीएआयचा इशारा

जळगाव ः जगातला क्रमांक दोनचा कापूस निर्यातदार देश असलेल्या भारतात कापसाची घटती उत्पादकता चिंतेचा विषय आहे. कापूस उत्पादकता घटत राहिली तर देशांतर्गत वस्त्रोद्योगाची कापूस गाठींची गरज स्थानिक क्षेत्रातून पूर्ण करणे कठीण होईल. यामुळे कापूस आयातीची वेळ येऊ शकते, असा इशारा कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) ने दिला आहे. तर जे देश लहान आहेत, जे कमी क्षेत्रात मोठे उत्पादन घेतात, त्यांच्याकडून धडा घेतला पाहिजे, असा मुद्दा वस्त्रोद्योगाच्या जाणकारांनी ॲग्रोवनशी बोलताना व्यक्त केला आहे.  कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची ९६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मागील आठवड्यात मुंबईत झाली. त्यात खानदेश व पश्‍चिम विदर्भातील काही जिनर्स व असोसिएशनच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला. या सभेत देशाच्या वस्त्रोद्योगासमोरील कापूस पुरवठ्याचे आव्हान आणि कापूस व्यापारातील अडथळ्यांवर चर्चा झाली. 

देशाची वस्त्रोद्योगाची गरज जशी वाढत आहे, तशी कापसाची उत्पादकता वाढली पाहिजे. कारण जगाची कापूस उत्पादकता ७७० किलो रुई प्रतिहेक्‍टरी आहे. त्यात भारताची कापूस उत्पादकता हेक्‍टरी ५०० किलो प्रतिहेक्‍टरी आहे. भारताची कापूस उत्पादकता मागील काही वर्षांपासून वाढलेली नसल्याचे समोर येत आहे.  दुसऱ्या बाजूला आपण देशांतर्गत गरज वाढत असताना ती पूर्ण कशी करणार? कारण देशात कापूस गाठींची जेवढी गरज आहे, त्यापेक्षा अधिक उत्पादन येताना दिसत नाही. यामुळे निर्यातदार असलेला भारत कापसाचा आयातदार बनू शकतो. देशातील ६० दशलक्ष शेतकरी, प्रक्रिया व इतर वस्त्रोद्योगातील मंडळी कापूस पिकावर अवलंबून आहेत. देशात रोजगार देणारा आघाडीचा भाग म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. कापूस देशातील प्रमुख नगदी पीक असून, जगातील एक तृतीयांश कापसाखालील क्षेत्र एकट्या भारतात असते. भारताची जगाच्या कापूस व्यापार, बाजारात प्रमुख भूमिका राहिली आहे. अमेरिकेनंतर क्रमांक दोनचा कापूस निर्यातदार व चीननंतर क्रमांक दोनचा कापूस गाठींची गरज असलेला, वापर करणारा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे. अशा सगळ्या स्थितीत भारताची कापूस उत्पादकता वाढली पाहिजे, असा मुद्दा या सभेत असोसिएशनचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी मांडल्याची माहिती असोसिएशनचे सदस्य अनिल सोमाणी यांनी दिली. 

भारताचा ताळेबंद चुकतोय वस्त्रोद्योगाचे जाणकार, बाजाराचे अभ्यासक असलेले शहादा (जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्यानुसार, भारतात मिल व नॉन मिल आणि लहान उद्योगांना प्रत्येक हंगामात ४०० लाख कापूस गाठींची आवश्‍यकता असते. भारतात मागील हंगामात ३७० लाख गाठींचे उत्पादन आले. यंदा ३३० ते ३३५ लाख गाठींचे उत्पादन येईल, असे म्हटले जात आहे. कापूस गाठींचे जे उत्पादन येते, त्यात कापसाची निर्यात केली जाते. मागील हंगामात सुमारे ६७ लाख गाठींची निर्यात झाली. तर आयात सुमारे २१ लाख गाठींची झाली. यंदाही ५० ते ५५ लाख गाठींची निर्यात होऊ शकते. तर आयातही १८ ते २० लाख गाठींची होईल. पण आजघडीला विचार केला तर भारतात जी कापूस गाठींची गरज आहे, ती स्थानिक उत्पादनातून पूर्ण होईल का, असा मुद्दा आहे. कारण उत्पादनाचे अंदाज आहेत. उत्पादन हाती आलेले नाही.  प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या गुजरात, महाराष्ट्रात मिळून २० ते २५ लाख गाठींनी उत्पादन घटत आहे. दुसऱ्या बाजूला आपली उत्पादकता कमी आहे. चीनमध्ये ३८ ते ४२ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड केली जाते. पण ते किमान ३५० लाख गाठींचे उत्पादन घेतात. ऑस्ट्रेलियामध्ये कापसाखालील क्षेत्र अल्प असते, परंतु त्यांची उत्पादकता १८०० किलो रुई प्रतिहेक्‍टरी आहे. बांगलादेश, पाकिस्तानची उत्पादकता भारतापेक्षा अधिक आहे. भारतात किमान १२० ते १२२ लाख  हेक्‍टवर कापूस पीक असते. पण उत्पादन फक्त ३५० ते ३७० लाख गाठींचे असते. यासंदर्भात संशोधक, शासन, उद्योजक किंवा वस्त्रोगातील सर्वांनी विचार केला पाहिजे, असेही श्री. पाटील म्हणाले. 

पाकिस्तानलाही आयातीची चिंता पाकिस्तानला १५० लाख गाठींची आवश्‍यकता असते. परंतु, उत्पादन १०५ ते १०२ लाख गाठींचे येते. कापूस उद्योग पाकिस्तानात महत्त्वाचा असून, कापूस ही पाकिस्तानची जीवनरेषा आहे. ही बाब लक्षात घेता पाकिस्तानच्या नॅशनल फूड सिक्‍युरिटी ऍण्ड रिसर्च मंत्रालयाने कृती आराखडा तयार केला असून, पुढील हंगामात १५० लाख गाठींच्या उत्पादन मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी कापूस या बाबीशी संबंधित सर्व स्टेक होल्डर्सना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले आहे. पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमिटी आणि कापूस संशोधन व विकास संस्थेने तेथे काही कापूस वाण विकसित केले असून, चांगले उत्पादन तंत्रज्ञान यातून तेथे मिळणार आहे.  प्रमाणित बियाणे, त्याची उपलब्धता, खते व कीडनाशकांचा वापर आणि कापसाचे निर्देशीत दर यावर तेथे भर दिला जाणार आहे. पाकिस्तानला कमी उत्पादन मिळत असल्याने आयातीवर अवलंबून राहावे लागते. या हंगामत पाकिस्तान सुमारे ३३ लाख कापूस गाठींची आयात करणार आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानचा रुपया कमकुवत असून, १४२ रुपयांना एक डॉलर त्यांना पडत आहे. मोठे परकी चलन कापूस गाठी व इतर बाबींच्या आयातीत गमवावे लागत असल्याने पाकिस्तान कापूस आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही, यासाठी सरसावल्याची माहिती मिळाली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com