दोन रुपये प्रतियुनिट दराने वीजपुरवठ्याचे उद्दिष्टः ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अपारंपरिक ऊर्जा विशेषांक
अपारंपरिक ऊर्जा विशेषांक

पुणे: पुढील पाच वर्षांत ऊर्जा विभाग '२ रुपये प्रतियुनिट दराने कोणी वीज खरेदी करता का?' अशी विचारणा गल्ली बोळात करेल, तो दिवस विभागासाठी आणि सर्वसामान्यांसाठी सर्वांत चांगला असेल. या दृष्टीने ऊर्जा विभागाची वाटचाल सुरू असून, महाऊर्जाच्या माध्यमातून ३५ हजार मेगावॉट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ठेवून, प्रोत्साहन देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी (ता. २६) मंत्री बावनकुळे बोलत होते. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महाजनकोचे संचालक पुरुषोत्तम जाधव, महाऊर्जाचे महासंचालक कांतिलाल उमाप, अतिरिक्त संचालक विशाल शिवतारे, प्रादेशिक संचालक महेश आव्हाड आदी उपस्थित होते.  मंत्री बावनकुळे म्हणाले, ‘‘पारंपरिक पद्धतीने निर्माण होणाऱ्या जल आणि औष्णिक ऊर्जानिर्मितीला भविष्यात मर्यादा येणार आहेत. तर औष्णिक ऊर्जानिर्मिती पर्यावरणाला हानिकारक असून, भविष्यातील ऊर्जेची मागणी आणि गरज लक्षात घेता, अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला प्राधान्य द्यावे लागणार आहे. यासाठी महाऊर्जाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. दिवसा शाश्‍वत विजेची मागणी शेतकऱ्यांची असते. यासाठी औष्णिक ऊर्जा केंद्राद्वारे शेतकऱ्यांना कमी दरात वीजपुरवठा करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अनुदान देऊनसुद्धा २७ हजार कोटी थकीत आहे. तर उद्योगांकडे ४२ हजार कोटींची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना दिवसा स्वस्तात शाश्‍वत वीज उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांत ४४ लाख शेतकऱ्यांना ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’द्वारे वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर यापैकी ६ लाख शेतीपंप सौरऊर्जेवर शिफ्ट करण्यात यश आले आहे. यासाठी युद्धपातळीवर सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या मध्यमातून ३५ हजार मेगावॉट ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट असून, ते आव्हान ऊर्जा विभागाने स्वीकारले आहे.’’ राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, ‘‘देशातील एकूण ऊर्जेच्या ६१ टक्के वीज औष्णिक असून, ती प्रदूषणकारी आहे. भविष्यात देशाला ऊर्जेसाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी सौर, पवन या नैसर्गिक स्रोतांना प्रचंड महत्त्व येणार आहे. या दृष्टीने महाऊर्जा कार्यरत आहे. उपसा सिंचन योजना या सौरऊर्जेवर आणण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या माध्यामातून वाचणारी वीज उद्योगाला मिळाली तर औद्योगिक विकास झपाट्याने होणार आहे.’’ महासंचालक उमाप म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला महाऊर्जेद्वारे बळ देण्याचा प्रयत्न आहे. सौरऊर्जानिर्मितीतून खेडी आणि शेतकरी स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार आहे.’’  कार्यक्रमात महाऊर्जेच्या बोधवाक्य, माहितीपट आणि सकाळ-ॲग्रोवनच्या 'अपारंपरिक ऊर्जा विशेषांका'चे प्रकाशन मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रादेशिक संचालक आव्हाड यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com