सिंधुदुर्गातील काजू उत्पादन घटण्याची शक्यता

सिंधुदुर्गातील काजू उत्पादन घटण्याची शक्यता
सिंधुदुर्गातील काजू उत्पादन घटण्याची शक्यता

सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका असलेले काजू पीक संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेंडामर, फांदीमर, पानगळ अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेकडो एकरमधील काजूची झाडे अखेरच्या घटका मोजत असून हिरव्यागार बागा ओसाड दिसू लागल्या आहे. त्यामुळे यावर्षी काजूच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६७ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रांवर काजू लागवड आहे. दरवर्षी काजू लागवडीखालील क्षेत्रात सुमारे ५ एकरने वाढ होताना दिसत आहे. ६७ हजार पैकी सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील काजू उत्पादनक्षम आहेत. त्यामुळे काजू उत्पादनातून जिल्ह्यात दरवर्षी बाराशे ते पंधराशे कोटींची उलाढाल होते. परंतु, काजू उत्पादक शेतकरी यंदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात २६ जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामध्ये ४ ऑगस्टपासून भर पडली. सलग पाच ते सहा दिवस अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचे दुष्पपरिणाम आता दिसू लागले आहेत. अतिवृष्टीमुळे इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता जिल्ह्याचा आर्थिक कणा असलेले काजू पीक वाया जाण्याची शक्यता आहे. काजू बागांमध्ये सलग दहा ते बारा दिवस पाणी साचले होते. त्यामुळे विविध रोगांनी ग्रासले आहे. दहा बारा वर्षांची झाडे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत नष्ट होत असल्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. आतापर्यंत हिरव्यागार दिसणाऱ्या बागा आता ओसाड दिसू लागल्या आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना उपाययोजनाही करता येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

काजू बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे यावर्षी उत्पादनात मोठी घट होणार आहे. पानगळ किंवा फांदीमर विविध उपाययोजना करून जरी थांबविता आली तरी नवीन फांदी आल्यानंतर त्या फांदीला फलधारणा होणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काजू पीक हे सध्या मुख्य पीक बनले आहे. सर्व जिल्ह्यात काजूच्या मोठ्या बागा आहेत.

अतिवृष्टीमुळे माझ्या बागेतील शेकडो झाडांच्या फांद्या पूर्णतः सुकल्या आहेत. काही झाडे सुकत चालली आहेत. दहा बारा वर्षांची आमची उत्पादनक्षम झाडे सुकत असल्यामुळे आमच्यावर मोठे संकट ओढवले आहे. या नुकसानीचा शासनाने विचार करणे आवश्‍यक आहे.- सुरेश गंगाराम गुरव, शेतकरी, ऐनारी, ता. वैभववाडी

जिल्ह्यात झालेली काजूची लागवड ही बहुतांशी संकरित आहे. या झाडांना कीड रोगांचा प्रादुर्भाव लवकर होतो. पाणथळ किंवा तीव्र उतारावरील बागांना मोठा फटका अधिक बसला आहे. विशेषत वेंगुर्ला ४ जातीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी वेळेत बोडोमिश्रणची फवारणी कृषी विभागाच्या सल्ल्याने घेणे आवश्‍यक आहे. - प्रा. विवेक कदम, कृषी महाविद्यालय सांगुळवाडी

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात काजू बांगाचे नुकसान होत आहे हे वास्तव आहे. या संदर्भात सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागविला आहे. नुकसानीचा हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. - शिवाजीराव शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com