बांगलादेश असणार सर्वांत मोठा कापूस आयातदार

देशातून नव्या हंगामातही सुमारे ५० ते ५५ लाख गाठींची निर्यात होण्याचा अंदाज आहे. एकट्या बांगलादेशातून २५ ते २८ लाख गाठींची आयात होईल.
बांगलादेश असणार सर्वांत मोठा कापूस आयातदार
बांगलादेश असणार सर्वांत मोठा कापूस आयातदार

जळगाव : देशातून नव्या हंगामातही सुमारे ५० ते ५५ लाख गाठींची निर्यात होण्याचा अंदाज आहे. एकट्या बांगलादेशातून २५ ते २८ लाख गाठींची आयात होईल. शिवाय चीन-अमेरिकेत व्यापार युद्धानंतर शीतयुद्ध सुरू असल्याने अमेरिका चीनऐवजी व्हिएतनामकडून कापड आयात वाढवू शकतो. परिणामी, व्हिएतनामची भारताकडून सुताची मागणी बऱ्यापैकी राहील, असा अंदाज आहे.  देशातून सरत्या हंगामात म्हणजेच २०२०-२१ मध्ये सुमारे ७८ लाख गाठींची निर्यात परदेशात झाली आहे. ही गेल्या चार वर्षांमधील विक्रमी कापूस किंवा रुईची निर्यात आहे. सर्वाधिक सुमारे ३० लाख गाठींची निर्यात बांगलादेशात झाली आहे. या पाठोपाठ व्हिएतनाम, चीनचा क्रमांक आहे. बांगलादेशात नारायणगंज भागात वस्त्रोद्योग वाढला आहे. 

मजूर व इतर बाबी स्वस्तात उपलब्ध होत असल्याने चीननेदेखील तेथे गुंतवणूक केली आहे. अमेरिका सर्वांत मोठा कापूस निर्यातदार आहे. तेथून जगभरात सुमारे २३० ते २३५ लाख गाठींची निर्यात होईल. परंतु बांगलादेशला अमेरिका, ब्राझील, आफ्रिकन देशांतून कापूस समुद्रमार्गे आणताना अधिकचा वाहतूक खर्च येतो. अधिकचा वेळ लागतो. भारतातून बांगलादेशात रेल्वे व रस्ते मार्गे कापूस पोचविणे सहज शक्य झाले आहे. वेळही कमी लागतो. यामुळे तेथे सर्वाधिक निर्यात होत आहे, असे जाणकारांचे मत आहे. 

५५ लाख गाठींची निर्यात शक्य, सरकीला उठाव भारत जगात वस्त्रोद्योगात क्रमांक दोनवर आहे. भारतातून ५० ते ५५ लाख गाठींची निर्यात विविध देशांमध्ये होईल, असा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे. देशात नव्या हंगामात सुमारे साडेपाच हजार कोटी किलोग्रॅम सुताचे उत्पादन अपेक्षित आहे. देशातून दरवर्षी सुमारे १२०० ते १२५० कोटी किलोग्रॅम सुताची निर्यात केली जाते. चीनमध्ये अधिक सूत निर्यात होते. तसेच व्हिएतनाम, बांगलादेश, तुर्की व इतर आखाती देशांमध्ये सूत निर्यात होते. सध्या सूत निर्यात बऱ्यापैकी सुरू असून, दरांनी उच्चांक गाठला आहे. २५० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक दर दर्जेदार सुताला आहेत.  देशात सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसत आहे. सरकीचा उपयोग खाद्यतेलासाठी केला जातो. सध्या सरकीची मागणी खाद्यतेल उद्योगासह सरकी पेंड (पशुखाद्य) यासाठीदेखील आहे. यामुळे सरकीचे दर विक्रमी स्थितीत म्हणजेच चार हजार १०० रुपये प्रतिक्विंटल एवढे असून, दरात वर्भरात तब्बल १५०० रुपयांची वाढ क्विंटलमागे झाली आहे. 

देशातून २०२०-२१ मध्ये झालेल्या कापूस गाठींच्या निर्यात (लाख गाठींमध्ये) देश आणि निर्यात :  बांगलादेश ३०, चीन १६, व्हिएतनाम १४, इंडोनेशिया ९ , इतर ९ : एकूण ७८ 

देशातील २०२०-२१ मधील सूत निर्यातीची स्थिती (आकडे दशलक्ष किलोग्रॅममध्ये) देश आणि निर्यात : चीन ९०.४१, बांगलादेश २४.१९, पाकिस्तान ००, इजिप्त  ६.१५, पोर्तुगाल ४.१०, पेरू ४.१० प्रतिक्रिया... चीन-अमेरिकेतील व्यापार शीतयुद्ध किंवा कोविड १९ च्या समस्येनंतर तीव्र होत आहे. मध्यंतरी अमेरिकेने चीनमधील कापड व कापसापासून तयार होणाऱ्या बाबींच्या आयातीवर बालमजुरांचा उपयोग चीन करीत असल्याचा दावा करून बंदी घातली होती. या देशांमधील वादाचा लाभ व्हिएतनाम, भारत, बांगलादेशला होऊ शकतो. तेथे कापड निर्यातीची संधी आहे. चीनऐवजी व्हिएतनामकडे युरोप, अमेरिकेतील कापड खरेदीदार जातील. यामुळे पुढे व्हिएतनाम भारतीय सूत, रुईची खरेदी वाढवेल. कारण व्हिएतनाम कापसाबाबत आयातीवर अवलंबून आहे.  - महेश सारडा, अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com