‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या पुरस्काराच्या मानकरी
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या पुरस्काराच्या मानकरी

‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या पुरस्काराच्या मानकरी

पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी सिंचन करणाऱ्या संस्थांना देण्यात येणारे गेल्या दोन वर्षांचे (२०१७-१८ आणि २०१८-१९)  पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार जाहीर झाले आहेत. मोठया प्रकल्पाअंतर्गत अनुक्रमे जानुबाई (बारामती, जि. पुणे) आणि केशवराज पाणी वापर संस्था, (अन्वी, मिर्झापूर, अकोला) यांना जाहीर झाले आहेत. पाच लाख रुपये रोख सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  जलसंपदा विभागाच्या वतीने महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियाना अंतर्गत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये मोठे, मध्यम, लघुप्रकल्प, साठवण तलाव आणि कोल्हापूर पद्धतीचा बंधारा या पाच गटांमध्ये राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे पाच, तीन, दोन आणि एक लाख रुपये असे आहे.  पुरस्काराच्या रकमेच्या विनियोगासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात यावे. एकुण रकमेच्या ५ टक्के रक्कम केवळ कार्यालयीन व्यवस्थापनासाठी वापरण्यात यावेत, तर उर्वरित रक्कम यंत्रसामुग्रीसाठी वापरण्यात यावी. तसेच या रकमेतुन प्रति घनमिटर जास्तीत जास्त कृषी उत्पादनासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाने दिले आहेत. २०१७-१८ वर्षाचे पुरस्कार पुढीलप्रमाणे गट : मोठे प्रकल्प  प्रथम : जानूबाई पाणी वापर संस्था (शिरवली, बारामती, जि. पुणे) द्वितीय : ज्योतिर्लिंग - (बारामती. जि. पुणे) तृतीय : वारेगाव उपसा जलसिंचन सहकारी संस्था (सिन्नर, जि. नाशिक)  मध्यम, लघू, साठवण तलाव गटासाठी नामांकने न आल्याने पुरस्कार दिले जाणार नाहीत.  गट : कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था (मेहकर, जि. बुलढाणा)  २०१८-१९ चे पुरस्कार गट : मोठे प्रकल्प  प्रथम : केशवराज पाणी वापर संस्था, काटेपूर्णा प्रकल्प (अन्वी,ता. मिर्झापूर, जि. अकोला)  मध्यम गट  प्रथम क्रमांक : कै. रंगनाथ गोपाळ पाटील पाणी वापर संस्था, वाघाड प्रकल्प, (वलखेड, दिंडोरी, नाशिक) लघू, साठवण, कोल्हापूर बंधारा गटासाठी नामांकने न आल्याने पुरस्कार दिले जाणार नाहीत.  पारदर्शक कारभाराचा सन्मान पाणी हे सर्वस्व आहे. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या पाण्याचे वाटप उत्तम पद्धतीने करून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सभासदांना प्रामाणिकपणे सहकार्य केले. तसेच जानुबाई संस्थेच्या माध्यमातून शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे पाणीपट्टी वसुली, सेवा-सुविधा, पाण्याची बचत, पोट साऱ्यांची कामे, दैनंदिन हिशोब पत्रके अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण केली. संस्थेच्या या कामकाजाची दखल घेऊन शासनाने आम्हांला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, त्याबद्दल आम्ही जलसंपदा विभागाचे आभार मानतो, असे शिरवली (ता.बारामती) येथील जानुबाई पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष विजय शंकर घनवट म्हणाले.  प्रत्येक थेंबाचा काटेकोर वापर पाणी वापर संस्था पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटेकोर वापर करते. कालव्याची निगा, देखरेख ठेवली जाते. सिंचनामुळे गावात  गहू, हरभऱ्याचे उत्पादन १८ ते २० क्विंटलपर्यंत पोचले आहे. संस्थेने पुढाकार घेत दोन किलोमीटरपर्यंत शेतरस्त्याचे काम केले. सिंचन सुविधांमुळे आमच्या गावात आजवर एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही, हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो, अशी प्रतिक्रिया अन्वी मिर्झापूर (जि. अकोला) येथील केशवराज पाणी वापर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. टी. नायडेकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com