अकोल्यात पोकराअंतर्गत ६३ गावांचे प्रकल्प आराखडे मंजूर

अलोल्यात पोकराअंतर्गत ६३ गावांचे प्रकल्प आराखडे मंजूर
अलोल्यात पोकराअंतर्गत ६३ गावांचे प्रकल्प आराखडे मंजूर

अकोला ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) जिल्ह्यातील ६३ गावांच्या प्रकल्प आराखड्यास जिल्हा समितीने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात यापूर्वी ६२ गावांचे प्रकल्प आराखडे मंजूर करण्यात आलेले असून, आता एकूण १०५ प्रकल्प आराखडे मंजूर झाले आहेत. जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यातून राज्यात १५ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे. यात अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्याचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे. हवामान बदलाचा भूगर्भातील पाणीसाठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी, शेतीतील पिकांची उत्पादकता घटत आहे. या परिस्थितीत हवामान बदलामुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे.  अकोला जिल्ह्यातील ४९८ गावे या प्रकल्पात निवडण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात १०५ गावांपैकी ४२ ठिकाणचे प्रकल्प आराखडे मंजूर करण्यात आले होते. आता ६३ प्रकल्प आराखडे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या समितीच्या बैठकीत मंजुर करण्यात आले. समितीच्या बैठकीत अकोला व अकोट उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी याचे सादरीकरण केले. या प्रकल्पांतर्गंत भूमिहीन, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. प्रकल्प कार्यान्वित होऊन नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम आता वेगाने सुरू करण्यात आले आहे. 

अशा आहेत प्रकल्पातील योजना 

  •  भूमिहीन तसेच अनुसूचित जाती / जमातीतील महिला शेतकऱ्यांसाठी-शेळीपालन, कुक्कुटपालन
  •  अल्प / अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांसाठी - फळबाग, शेडनेट, हरितगृह, प्लॅस्टिक टनेल, मधुमक्षिकापालन, नवीन विहीर, विहीर पुनर्भरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मृदसंधारण, शेततळे, सामूहिक शेततळे, इतर कृषी आधारित व्यवसाय
  •  शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांसाठी - कृषी उत्पादनांचे संकलन केंद्र, कृषी उत्पादनांचे वर्गीकरण व प्रतवारी केंद्र, गोदाम व छोटे वेअर हाऊस, फळ पिकवणी केंद्र, कृषी मालावर प्राथमिक प्रक्रिया केंद्र, फळे व भाजीपाला वाहतुकीसाठी शीतवाहन, वातानुकूलित कृषी माल विक्री केंद्र, व्हेंडिंग कार्ट, कृषी माल प्रक्रिया केंद्र आणि कृषी आधारित व्यवसाय
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com