सर्व कीडनाशकांसाठी ‘क्यूआर कोड’ची सक्ती

अब्जावधी रुपयांची निकृष्ठ दर्जाची कीडनाशके बाजारात खपवली जात असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या कंपन्यांची दर्जेदार उत्पादने तात्काळ लक्षात येण्यासाठी केंद्र शासनाने आता नियमावलीत बदल केला आहे. कीटकनाशकांच्या बाटलीवरील लेबलवर आता ‘क्यूआर कोड’ बंधनकारक करण्यात आला आहे.
सर्व कीडनाशकांसाठी ‘क्यूआर कोड’ची सक्ती
सर्व कीडनाशकांसाठी ‘क्यूआर कोड’ची सक्ती

पुणे : अब्जावधी रुपयांची निकृष्ठ दर्जाची कीडनाशके बाजारात खपवली जात असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या कंपन्यांची दर्जेदार उत्पादने तात्काळ लक्षात येण्यासाठी केंद्र शासनाने आता नियमावलीत बदल केला आहे. कीटकनाशकांच्या बाटलीवरील लेबलवर आता ‘क्यूआर कोड’ बंधनकारक करण्यात आला आहे.  भारतीय कृषी संशोधन परिषदेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत किंवा बोगस कीडनाशकांची विक्री ही शेतकऱ्यांसाठी एक गंभीर समस्या आहे.  तांत्रिकदृष्ट्या माहिती नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या पातळीवर ही समस्या हाताळता येऊ शकत नाही. त्यासाठी  कायदेशीर कारवाई आणि शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी उपाय, असे दोन पर्याय आहेत.

अनधिकृत किंवा बोगस कीडनाशकांना लगाम घालण्यासाठी भारतीय कीडनाशके कायदा १९६८ मध्ये सुधारणा सूचविण्यात आल्या आहेत. मात्र कायदा दुरूस्तीची प्रक्रिया किचकट असल्याने गेल्या कीटकनाशके कायद्यातील सुधारणा धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आता दुसऱ्या पर्यायानुसार शेतकऱ्यांना जागृत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ‘क्यूआर कोड’ची अंमलबजावणी देशभर लागू करण्यात आली आहे. 

देशातील बनावट कीडनाशकांचा अभ्यास पाच वर्षांपूर्वी झाला होता. शेतकऱ्यांनी १६ हजार ९०० कोटी रुपयांची कीडनाशके वर्षभरात खरेदी केली होती. त्यापैकी तीन हजार २०० कोटी रुपयांची कीडनाशके बोगस असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी केंद्रीय कृषी  व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अवर सचिव आर.राजीव यांनी सर्व राज्यांना क्युआर कोडची अंमलबजावणीबाबत सूचना पाठविल्या आहेत.

“क्यूआर कोड’मुळे शेतकऱ्यांना पीक संरक्षण उत्पादनांची ट्रेसेबिलिटी (माग घेण्याची पध्दत) कळेल. तसेच बोगस कीटकनाशकांचा पुरवठा करणारी साखळी नियंत्रित होईल. यामुळे देशातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची कीटकनाशके उपलब्ध होण्यास मदत होईल,” असे केंद्र शासनाने या सूचनेत नमुद केले आहे. 

कीटकनाशके कायदा १९६८ मधील ३४ व्या कलमान्वये केंद्राने देशातील सर्व कंपन्यांना ‘क्यूआर कोड’ ची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरला आहे. केंद्रीय कीटकनाशके मंडळाला देखील याबाबत कळविण्यात आले आहे, सूत्रांनी स्पष्ट केले. 

‘क्यूआर कोड’ म्हणजे काय? -शहरापासून गावपातळीवर आता पैशांची देवाणघेवाण किंवा वस्तूचे बिल देण्यासाठी ‘क्यूआर कोड’चा वापर केला जात आहे. हा बारकोड प्रणालीचाच सुधारित अवतार आहे. कीडनाशकाच्या उत्पादनावर दिलेल्या ‘क्यू आर’ कोडवर शेतकऱ्याने आपला मोबाईल (यात क्यूआर कोड रिडर ॲप हवे) धरल्यास कोडचे स्कॅनिंग होईल व उत्पादनाची सर्व माहिती शेतकऱ्याला तात्काळ दिसेल. कंपनीने स्वतःची ‘लिंक’ किंवा अन्य कोणतीही माहिती दिल्यास ती देखील शेतकऱ्याला कळू शकेल. बोगस व अप्रमाणित कीटकनाशके बाजारात खपविणाऱ्या टोळ्यांना ‘क्यूआर कोड’ सुविधा देता येणार नाही. परिणामी शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे.

‘क्यूआर कोड’वर कशाची माहिती मिळेल? कीडनाशक उत्पादन करणाऱ्या कंपनीचे नाव, नोंदणी व बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, एक्स्पायरी डेट म्हणजेच अंतिम वापराबाबतची तारीख, उत्पादनाचे नाव, वैधानिक इशारा देणारे चिन्ह, ग्राहक मदत केंद्राचा (कस्टमर केअर) क्रमांक, प्रतिमात्रा (अँटिडोट) तपशील, विपणन संस्थेचे नाव, उत्पादनाचा ‘युनिक आयडेन्टिटी क्रमांक’.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com