वस्त्रोद्योगासमोर दर्जेदार कापूस तुटवड्याचे संकट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव : कापडमिलसाठी चांगल्या दर्जाचे सूत आवश्‍यक असून चांगल्या सुतासाठी गुणवत्तापूर्ण रुई किंवा कापसाची गरज आहे. मात्र असे असतानादेखील देशात गिझा व पीमा या लांब धाग्याच्या कापूस उत्पादनाबाबत अद्याप एकाही शासकीय संस्थेने पुढाकार घेतला नाही. आता तर जो कापूस पिकतो, त्याचाही दर्जा व उत्पादन गुलाबी बोंड अळीने घटले आहे. सुमारे २५ कोटी जणांना रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगाला दर्जेदार रुईसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलियावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यात मोठ्या प्रमाणात परकीय चलन गमावावे लागत असून, दर्जेदार कापूस तुटवड्याचे संकट वस्त्रोद्योगासमोर उभे ठाकले आहे. 

बीटीमधील बीजी तंत्रज्ञान जसे अमेरिकेकडून घेतले, तसे लांब धाग्याच्या कापसाचे तंत्रज्ञान घेऊन त्यावरही देशात काम केले जावे आणि हे तंत्रज्ञान देशात उपलब्ध करावे, असा मुद्दाही वस्त्रोद्योगातील जाणकार, तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. कापूस लागवडीत व उत्पादनात भारत आघाडीवर आहे. परंतु देशांतर्गत बाजारात रुईची मागणी या हंगामात तीन टक्‍क्‍यांनी वाढली आहे. जगातही सुमारे अडीच टक्के मागणी वाढली आहे. 

देशात ४६० सहकारी तर १७०० खासगी सूतगिरण्या आहेत. राज्यात १३३ सहकारी सूतगिरण्या असून, पैकी ६१ सुरू आहेत. राज्यात नव्या वस्त्रोद्योग धोरणातून आणखी २० सूतगिरण्या खानदेश, विदर्भ व मराठवाड्यात साकारत आहेत. गुजरातेत ३० सूतगिरण्या मागील चार वर्षांत वाढल्या आहेत. तेथे आजघडीला ७८ सूतगिरण्या जोमात सुरू असून, सुमारे आठ हजार जिनिंग कारखाने देशात आहेत.

पॉवरलूम व कापडगिरण्यांची संख्या उत्तर प्रदेश व दाक्षिणात्य भागात मोठी आहे. वस्त्रोद्योगात मोडणाऱ्या जिनिंग, स्पिनींग, व्हीविंग मिला, पॉवरलूममधील होजिअरी, गारमेंट व प्रोसेसिंग युनिटना डिसेंबर ते मे या दरम्यान प्रतिमहिना सुमारे २७ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) गरज आहे. दीड वर्षापूर्वी ही गरज २४ लाख गाठींची होती. वस्त्रोद्योग हा शेतीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा रोजगार देणारा उद्योग असून, २५ कोटी जण त्यावर निर्भर आहेत. 

देशात वस्त्रोद्योगाला दरवर्षी किमान ३६० लाख गाठींची गरज आगामी वर्षापासून भासणार आहे. ही गरज मात्र भारत पूर्ण करू शकत नाही, कारण यंदा भारताचे उत्पादन कमाल ३६२ ते ३६७ लाख गाठींपर्यंत येणार आहे. तर पुढील हंगामातही गुलाबी बोंड अळीवर उपाय न सापडल्याने गाठींचे उत्पादन ३४५ लाख गाठींवरच असेल. यात निर्यात, नुकसान, शिलकी गाठी या सर्व बाबी लक्षात घेता देशांर्तगत वस्त्रोद्योगाला कापूस आयातीवर भर द्यावा लागत आहे. 

मागील कापूस हंगामात (१ ऑक्‍टोबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१७) या काळात ३१ लाख गाठींची आयात करावी लागली. यंदा गुलाबी बोंड अळीने कापसाचा दर्जा घसरला व कमी उत्पादनाचे संकेत लक्षात घेता सूतगिरण्या, मोठ्या उद्योगांनी रुईची आयात वाढविली. ती आजघडीला १८ लाख गाठींपर्यंत पोचली आहे. ३० सप्टेंबर २०१८ अखेर ती वाढू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. अशात दरवाढ, कापसाचा तुटवडा, आयातीमधील अडथळे, अशा अनेक समस्यांना वस्त्रोद्योगाला तोंड द्यावे लागत आहे. परकीय गाठींच्या दरवाढीमुळे उत्तरेकडील पॉवरलूमवर परिणाम झाला. 

 देशात पीमा, गिझा का पिकत नाही? पीमा व गिझा हा कापूस ३५ मिलीमीटर लांबीचा आहे. एवढ्या लांबीचा कापूस चीनसह पाकिस्तान, बांगलादेशसह भारतातही उत्पादित होत नाही. त्याचे तंत्रज्ञान ऑस्ट्रेलिया, अमेरिका व तुर्कीकडे आहे. भारतात कमाल २९ मिलीमीटर लांबीचा कापूस उत्पादित होतो. ३५ मिलीमीटरचा कापूस आयात करावा लागत असून, या कापसाचे उत्पादन देशात सुरू झाले तर भारत जगातील क्रमांक एकचा कापूस निर्यातदार ठरेल आणि आयातीवरील अवलंबित्वही संपेल. जसे अमेरिकेकडून बीटीमधील बोलगार्डचे तंत्रज्ञान घेऊन त्यावर देशात काम सुरू झाले, तसे अधिक लांबीच्या कापसाच्या उत्पादनासाठीही कृषी संशोधन संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत लोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी ॲग्रोवनशी बोलताना व्यक्त केले. 

देशातील रुईचा ताळेबंद उत्पादन - ३६२ ते ३६७ लाख गाठी

देशांतर्गत वस्त्रोद्योगाची गरज - सुमारे ३६० लाख गाठी निर्यात - ४५ लाख गाठी (२० मार्चअखेर) आयात - १८ लाख गाठी (२० मार्चअखेर) देशातील सूतगिरण्या - सुमारे २२०० जिनिंग कारखाने - सुमारे ८००० वस्त्रोद्योगावर अवलंबून असलेले कामगार, अधिकारी - सुमारे २५ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com