सहा महिन्यांनंतर नीरा नदीत पाणी

सहा महिन्यांनंतर नीरा नदीत पाणी
सहा महिन्यांनंतर नीरा नदीत पाणी

वालचंदनगर, जि. पुणे : नीरा नदीवरील भोरकरवाडी (ता. इंदापूर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून नदी पात्रात पाणी सोडले आहे. सुमारे सहा महिन्यांनंतर नदीत पाणी आल्याने निमसाखर, निरवांगी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. निमसाखर, निरवांगी, खोरोची, पिठेवाडी परिसरातील नीरा नदी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोरडी पडली होती. नदीत पाणी नसल्यामुळे पिके जळून गेली होती. तसेच शेतीच्या, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला होता. नदीत पाणी सोडण्यासाठी मार्च महिन्यात परिसरातील शेतकऱ्यांनी आठ दिवस उपोषण करून रास्ता रोको आंदोलन, काळ्या गुढ्या उभारणे, मुंडण करणे आदी आंदोलने केली होती. मात्र, प्रशासनाने पाणी सोडण्यास नकार दिला होता. गेल्या आठवड्यात बारामती, फलटण तालुक्‍यात चांगला पाऊस झाल्याने इंदापूर तालुक्‍यातील नीरा नदीवरील काही बंधाऱ्यांत समाधानकारक साठा झाल्याने बंधाऱ्याची ढापे काढल्यामुळे भोरकरवाडीच्या बंधाऱ्यात पाणीसाठा झाला होता. निमसाखर, निरवांगी, खोरोची परिसरातील शेतकऱ्यांनी भोरकरवाडीच्या बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर बंधाऱ्याची ढापे काढून नीरा नदीत पाणी सोडण्यात आले. सध्या निरवांगी परिसरात बंधाऱ्यातील पाणी पोचले आहे. सुमारे पाच-सहा महिन्यानंतर नीरा नदीत पाणी आल्यामुळे पाण्यासाठी उपोषण करणारे शेतकरी दोन दिवसांमध्ये नदीतील पाण्याचे पूजन करणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com