उचल परवडली; बँकांच्या कर्जाची साडेसाती नको

वर्षांनुवर्षे येवल्यातील सुमारे २३ ते २५ हजार शेतकरी दर वर्षी खरीप हंगामासाठी बँकांकडून कर्ज उचलायचे. मात्र जिल्हा बँक अडचणीत आल्यापासून शेतकऱ्यांपुढे अडथळ्यांची मालिकाच उभी राहत आहे. हाच आकडा साडेसात हजारांपर्यंत घटला आहे.
उचल परवडली; बँकांच्या कर्जाची साडेसाती नको Affordable lifting; Don't borrow from banks
उचल परवडली; बँकांच्या कर्जाची साडेसाती नको Affordable lifting; Don't borrow from banks

येवला, जि. नाशिक : वर्षांनुवर्षे येवल्यातील सुमारे २३ ते २५ हजार शेतकरी दर वर्षी खरीप हंगामासाठी बँकांकडून कर्ज उचलायचे. मात्र जिल्हा बँक अडचणीत आल्यापासून शेतकऱ्यांपुढे अडथळ्यांची मालिकाच उभी राहत आहे. हाच आकडा साडेसात हजारांपर्यंत घटला आहे. जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपाला नियमांचा लगाम तर खासगी बँकांकडून होणारी टाळाटाळ यामुळे आता अनेक शेतकरी बँकेची पायरी चढायला तयार नाहीत. परिणामी अनेकांनी उसनवारी, सोनेतारण तसेच व्याजाने पैसे उचलून खरीप हंगामाचे भांडवल उभे केल्याची स्थिती आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्हाभरातील शेतकऱ्यांना शेतीच्या भांडवलासाठी हक्काने पैसे उपलब्ध होत होते. मार्चमध्ये घेतलेले कर्ज भरले की लगेच मे-जूनमध्ये शेतकरी सोसायटी मार्फत हक्काने कर्ज उचलून भांडवलासाठी लावत होते. दर वर्षी येथे जिल्हा बँकेमार्फत कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २१ ते २३ हजार तर खासगी बँकांमधून कर्ज घेणाऱ्यांचा आकडा एक ते दोन हजारापर्यंत होता. विशेष म्हणजे वर्षांनुवर्षे ही स्थिती कायम असताना नोटाबंदी नंतर जिल्हा बँक अडचणीत आली आणि कर्जवाटप पूर्णतः विस्कळित झाले आहे. त्याचा फटका अद्यापही शेतकऱ्यांना सहन करण्याची वेळ येत आहे. जिल्हा बँकेत कर्जवाटप विस्कळित झाल्याने अन खासगी बँका सहजासहजी कर्ज देत नसल्याने आता शेतकऱ्यांना सोनेतारण, शेतमाल विक्री आणि सावकाराकडून व्याजाने पैसे उपलब्ध करण्याची वेळ येत आहे. यंदाही जिल्हा बँकेमार्फत कर्जवाटप सुरू असून, हा आकडा २५ कोटीपर्यंत पोहोचला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी नियमित भरणा केला आहे, ज्यांनी मागील वर्षी कर्ज उचलले व या वर्षी ते भरले अशाच शेतकऱ्यांना या कर्ज वाटपाचा लाभ मिळत आहे. त्यामुळे साहजिकच अनेक जण या लाभापासून बाद झाले आहे. तालुक्यात या वर्षी जिल्हा बँकेमार्फत ४५०० शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, वाटप २५ कोटींवर गेले आहे. अर्थात शेतकऱ्यांनी कर्ज भरून लगेच उचलल्यामुळे हा आकडा फुगलेला दिसत आहे. या व्यतिरिक्त इतर व्यापारी व ग्रामीण बँकांतून तीन हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र ज्या तालुक्याला हजार ते बाराशे कोटींच्या आसपास कर्ज वाटपाचा लाभ मिळायचा. तेथेच हा आकडा ५०-६० कोटींच्या मर्यादेत अडकला आहे. शेतकऱ्यांसाठी ही स्थिती नक्कीच समाधानकारक नाही हे नक्की.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com