म्हैसाळ आणि विसापूर-पुणदी योजना कार्यान्वित करा 

म्हैसाळ आणि विसापूर-पुणदी योजना कार्यान्वित करा 
म्हैसाळ आणि विसापूर-पुणदी योजना कार्यान्वित करा 

सांगली ः तासगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील बंद पाणी योजनांमुळे भागात भीषण पाणीटंचाई उभी आहे. भागात पर्जन्य नाही. परिणामी नद्या, तलाव, विहिरी, बोअर, बंधारे कोरडे आहेत. तालुकाच्या पूर्व-पश्‍चिम भागातील बहुतांश गावांना म्हैसाळ व विसापूर-पुणदी योजनेचे पाणी मिळते. मात्र, सध्या या दोन्ही योजना बंद आहेत. त्यामुळे योजनांवरील सर्व गावांना पिण्याच्या पाण्यासह, शेतीच्या पाण्याची उणीव भासत आहे. त्यामुळे म्हैसाळ योजना कार्यान्वित करून गव्हाण बंधारा व विसापूर-पुणदीद्वारे सिद्धेवाडी तलाव भरण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

म्हैसाळ योजनेचा मणेराजुरी, गव्हाण, अंजनी, सावळज, वज्रचौडे, वडगाव, लोकरेवाडी, नागेवाडी, डोंगरसोनी गावांना फायदा होतो. गव्हाण बंधाऱ्यातून गावांना पाणी योजना केल्या आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून पाइपलाइन टाकून पाणी बागेपर्यंत नेले आहे. परंतु म्हैशाळच्या बंदमुळे गव्हाण बंधारा कोरडा असल्याने म्हैसाळवरील गावे व शेतकऱ्यांपुढे पाणी प्रश्न आहे. हीच स्थिती विसापूर-पुणदी योजनेवरील गावांची आहे.

या योजनेवर हातनूर, हातनोली, मांजर्डे, पेड, आरवडे, पुणदी गौरगाव, पाडळी, धामणी, विसापूर, गोटेवाडी, बलगवडे, चिंचणी, लोढे, सावर्डे, कौलगे, बस्तवडे, खूजगाव, वाघापूर, बिरणवाडी, सावळज ही गावे अवलंबून आहेत. योजनेवर कोट्यवधी रुपये खर्ची पडले असून साधारण ७७०० हेक्टर शेती क्षेत्रास लाभदायक असणारी योजना बंद आहे. 

पूर्व भागातील शेतीचा कणा असणाऱ्या म्हैसाळ व विसापूर-पुणदी या प्रमुख पाणी योजना आवर्तन व थकीत बिलापोटी बंद आहेत. दोन्ही योजनेंवरील गावांमध्ये द्राक्षाचे क्षेत्रही मोठे आहे. सध्या द्राक्ष हंगाम सुरू असून हंगामात व खरड छाटणी नंतर पाण्याची गरज भासते. ऐन उन्हाळ्यात योजना बंद पडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह, द्राक्षशेती संकटात आहे.

पूर्व भागातील काही द्राक्षबाग शेतकऱ्यांना म्हैशाळचा व तर काहींना विसापूर-पुणदीचा लाभ होतो. दोन्ही योजना वारंवार बंद राहतात. उन्हाळा चालू आहे. द्राक्षबागांना पाणी कमी पडत आहे. शेतकरी पैसे भरण्यास तयार आहेत. तेव्हा दोन्ही योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे. अन्यथा द्राक्षबागा जगविणे अवघड होऊन बागा काढाव्या लागतील.  - अमोस सावळजकर, द्राक्षबाग शेतकरी,  सावळज, ता. तासगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com