पूरस्थिती
पूरस्थिती

महापुराने साडेचार लाख विस्थापित; ४० बळी

पुणे : राज्यात महापुरातील बळींची संख्या आता ४० झाली असून, चार लाख ४१ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत. दरम्यान, पूरग्रस्तांना पाच हजार रुपये रोखीने दिले जाणार आहेत. पूरग्रस्त भागातील सर्व बॅंका व एटीएमसाठी रोकड पाठविण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. पुराच्या विळख्याने रस्ते संपर्क तुटलेल्या कोल्हापूरमध्ये मदतीचा पहिला टॅंकर नेण्यात शासनाला रविवारी (ता. ११) यश मिळाले.  “कोल्हापूर, सांगलीतील पूर पातळी ओसरते आहे. त्यामुळे कोठूनही ‘रेस्क्यू’ची मागणी झालेली नाही. बचाव कार्याकडून आता सर्व लक्ष आम्ही जनजीवन सुरळीत करण्याकडे देत आहोत,” अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी पत्रकारांना दिली. 

पशुधन-पीक पंचनामे करणे, वीज, पाणी, स्वच्छता, रोकड व इतर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणा ताकदीने वापरण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. त्यासाठी जादा मनुष्यबळ विविध जिल्ह्यांमधून पूरग्रस्त भागांकडे पाठविले जात आहे, असेही ते म्हणाले. मदतीसाठी एनडीआरएफची २३ पथके सांगलीत तर कोल्हापूरला २८ पथके कामे करीत आहेत. ३०२ वैद्यकीय पथके तैनात आहेत. मात्र, विभागात अजून १६३ रस्ते व ७९ पूल बंद असल्याने मदतीमधील अडथळे कायम आहेत. कोल्हापूरला पहिले वाहन पोचले कोल्हापूरला रस्त्यामार्गे मदत पाठविण्याचा जोरदार प्रयत्न प्रशासनाचा सुरू आहे. विशेष म्हणजे रविवारी सकाळी इंधनाचा पहिला टॅंकर अतिशय कष्टपूर्वक नेली गेला. त्याचा वापर हेलिकॉप्टरसाठी होईल. मात्र, पुणे-बंगलोर महामार्ग सुरू करण्याचे शर्थीचे प्रयत्न असले तरी सामान्य वाहतुकीऐवजी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी महामार्गाच वापर प्रथम होणार आहे.

मदतीबाबत संभ्रम नको  पूरग्रस्त भागात बंद एटीएम व रोकड टंचाईची समस्या आहे. डॉ. म्हैसेकर म्हणाले की, “राज्याच्या मुख्य सचिवांनी एसबीआयच्या उच्चपदस्थांशी स्वतः संपर्क करून पूरग्रस्त भागात रोकड उपलब्ध करण्याची सूचना केली आहे. रोकड वाहतुकीसाठी पोलिस बंदोबस्त देखील राज्याकडून दिला जाणार आहे. बाधित नागरिकांना पाच हजारांची रोकड त्यांच्या सोयीसाठी रोखीने दिली जाणार आहे. त्यात संभ्रम होऊ नये. कारण, रोख वाटपानंतरही शहरी भागात उर्वरित दहा हजार व ग्रामीण भागात पाच हजारांची मदत थेट बॅंकेत जमा होणार आहे.”

ब्रह्मनाळमध्ये अजून पाच मृतदेह सापडले ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील अजून पाच मृतदेह सापडले आहे. त्यामुळे मृतांची संख्या १७ झाली आहे. यातील एकूण सहा व्यक्ती बेपत्ता होत्या. पण, आमसिद्ध नरोटे हे जिवंत आढळले आहेत. आता स्थानिक चौकशीपणे आणखी व्यक्ती मृत असण्याची शक्यता नाही. त्यामुळे बोट दुर्घटनेत १७ असल्याचे स्पष्ट होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

पशुधनाचा वीमा तातडीने द्या पूरग्रस्त भागात मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाबाबत पोस्टमार्टेम रिपोर्टचा आग्रह अजिबात धरू नका. पशुपालकांना त्यांच्या पशुधनाचे वीमा दावे तातडीने द्या, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी वीमा कंपन्यांच्या एका स्वतंत्र बैठकीत दिल्या. 

मीरजेची पाणीपुरवठा यंत्रणा सुरू मीरजेची पाणीपुरवठा यंत्रणा सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दोन दिवसांत सांगलीही सुरू होईल. कोल्हापूरचे पंपिंग स्टेशन सोमवारी सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शहराला बाटल्यांमधून पाणी जात आहे. दरम्यान, पुण्यातून सांगलीसाठी दहा हजार ब्लॅंकेट व साडेबारा हजार चटया पाठविल्या गेल्या आहेत.

सफाईसाठी निविदा काढण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी पूरग्रस्त भागात स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. निविदा काढून ग्रामीण व शहरी भाग स्वच्छ करावा, असे सचिवांचे म्हणणे आहे. स्वच्छता सामग्री खरेदीचे अधिकार पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

पूररेषेचे फेररेखांकन होईल महापुरानंतर आता पूररेषेबाबत दीर्घकालीन विचार करावा लागेल. आमचे सध्या प्राधान्य या कामाला नसून मदत कार्याला आहे. मात्र, भविष्यात पुराची निळी किंवा लाल रेषा नव्याने काढावी लागेल. पूररेषेतील अतिक्रमित बांधकामांचा आढावा घेत कारवाई करावी लागेल, असे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले पूरपातळी सातत्याने घटतेय चोवीस तासांत अतिवृष्टी न झाल्याने सांगली व कोल्हापूरची पूरपातळी दर ताशी एक इंचाने कमी होत आहे. मात्र, धोका पातळीपेक्षाही सांगलीत अजून ८ फुटाने तर कोल्हापूरला १८ फुटाने पातळी जादा आहे. अलमट्टी धरणाच्या दिशेने सहा लाख ४५ हजार क्युसेक पाणी जात होते. त्या तुलनेत तेथील डिस्चार्ज (विसर्ग) पाच लाख ३० हजार क्युसेकने सुरू आहे.  परिस्थिती सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल “पुरामधील मृतांचा आकडा ४० पर्यंत गेलेला आहे. तीन नागरिक अजूनही बेपत्ता आहे. बाधितांची संख्या मात्र चार लाख ४१ हजार झाली आहे. काही भागात लोक घराकडे परतत आहेत. तरीही  ५२४ निवारा केंद्रे सुरू आहेत. पुरामुंळे बाधित गावे व विस्थापित नागरिक, हानी झालेले पशुधन याचा नेमका आकडा आलेला नाही. सध्याचे आकडे केवळ सरकारी यंत्रणेचे आहेत. सोमवारपर्यंत ८० टक्के गावांचा संपर्क शक्य आहे. तरीही जनजीवन सुरळीत होण्यासाठी सहा दिवस लागतील,” अशी कबुली आयुक्तांनी दिली.      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com