Chana MSP : हरभरा यंदा तरी हमीभावाचा टप्पा गाठेल का?

केंद्र सरकारने यंदा देशात १३६ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र वाढत्या तापमानामुळे उत्पादनात घट येत आहे. ठिकठिकाणी झालेला वादळी पाऊस आणि गारपिटीने हरभरा पिकाला फटका बसला.
Chana Rate
Chana RateAgrowon
Published on
Updated on

Chana Rate : देशी हरभऱ्याचे उत्पादन मुख्यतः भारतात आणि शेजारच्या देशांत होते. काबुली हरभऱ्याचे उत्पादन भारतासह पश्‍चिम आशिया आणि इतर काही देशांमध्ये होते. हरभऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.

हरभऱ्याचे आरोग्यविषयक फायदेही आहेत. शरीरातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवणे, मधुमेह आणि हृदयरोगावर हरभरा फायदेशीर असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे जागतिक पातळीवर आहारामध्ये हरभऱ्याचा वापर वाढत आहे.

जागतिक पातळीवर भारत कडधान्य उत्पादन आणि वापरात आघाडीवर आहे. देशांतर्गत उत्पादन कमी पडत असल्याने आपल्याला कडधान्यांची आयात करावी लागते. त्यात हरभऱ्याचाही समावेश आहे.

हरभरा वापरात भारत जगात आघाडीवर आहे. सोबतच ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, म्यानमार आणि इथिओपिया या देशांमध्ये हरभऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कोरोनानंतर जगभरात आरोग्यविषयक जागरूकता वाढली.

त्यामुळे लोक आता प्रथिनयुक्त आहाराला पसंती देत आहेत. हरभऱ्यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे हरभऱ्याला ग्राहकांची पसंती आहे. भारतासह इतर विकसनशील देशांमध्ये लोकांचे उत्पन्न वाढत आहे.

त्यामुळे रेडी टू कूक, प्रक्रियायुक्त पदार्थ आणि हॉटेल डिशमध्येही हरभऱ्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतून हरभऱ्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

Chana Rate
Chana Procurement : अनेक संस्थांचे पोर्टल अद्याप बंदच

हरभऱ्याचा वापर वाढण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे किंमत. इतर प्रथिनयुक्त पदार्थ, जसे की सोयाबीन, हरभऱ्याच्या तुलनेत महाग असतात. इतर कडधान्यांच्या तुलनेत हरभऱ्याचा उत्पादनखर्च कमी आहे.

तूर, मूग, उडीद, मसूर आदी पिकांच्या तुलनेत हरभरा किंवा हरभरा डाळ स्वस्त असते. त्यामुळे गरिबांच्या आहारात हरभऱ्याचा समावेश असतो. कडधान्यांमध्ये हरभऱ्याचाच पर्यायी वापर अधिक होतो. हरभऱ्यापासून उपपदार्थ जास्त प्रमाणात बनवले जातात. यामुळे हरभऱ्याची मागणी वर्षागणिक वाढतच आहे.

जागतिक पातळीवर कडधान्यामध्ये हरभरा तिसऱ्या क्रमांकाचे मुख्य पीक आहे. हरभरा उत्पादनात भारत जगात आघाडीवर आहे. एकूण जागतिक उत्पादनात भारताचा वाटा तब्बल ७० टक्के आहे.

मागील हंगामात भारतात हरभऱ्याचे १३५ लाख टन उत्पादन झाले, अशी सरकारची आकडेवारी सांगते. मात्र उद्योगाच्या मते उत्पादन १२० लाख टनांवरच स्थिरावले.

त्यानंतर टर्कीचा नंबर लागतो. जागतिक उत्पादनात टर्कीचा वाटा ४.४२ टक्के आहे. त्यानंतर रशिया ३.५५ टक्के, म्यानमार ३.५० टक्के, पाकिस्तान ३.१३ टक्के, इथिओपियाचा ३ टक्के वाटा आहे.

पीकनिहाय कडधान्यातील वाटा (टक्के)

बीन्स…३१ टक्के

वाटणावर्गीय…१७ टक्के

हरभरा…१५ टक्के

मसूर…८ टक्के

तूर….७ टक्के

जागतिक उत्पादनाचे चित्र ः

जगात हरभरा उत्पादन वर्षागणिक वाढत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, टर्की, रशिया, म्यानमार, पाकिस्तान, अमेरिका, मेक्सिको, इराण आदी साठ देशांमध्ये हरभऱ्याचे उत्पादन होते. मात्र भारताचा वाटा अधिक आहे.

जागतिक पातळीवर हरभरा उत्पादनात सतत वाढ होत गेली. २०१६ मध्ये जागतिक हरभरा उत्पादन ११६.२ लाख टनांवर होते. २०१८ मध्ये १६९.४ लाख टनांवर पोहोचले.

त्यात पुन्हा घट होऊन २०२० मध्ये १५०.८ लाख टनांवर आले. २०२१ मध्ये हरभरा उत्पादन पुन्हा १७० लाख टनांवर पोहोचले, असे जाणकार सांगतात. मात्र जागतिक पातळीवर हरभरा लागवड आणि उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे.

जागतिक हरभरा उत्पादन (लाख टन)

२०१६…११६.२

२०१७…१५१.५

२०१८….१६९.४

२०१९….१४१.८

२०२०…१५०.८

२०२१…१७०

देशातील हरभरा लागवड ः

जागतिक पातळीचा विचार करता भारतात सर्वाधिक हरभरा लागवड होते. देशातील एकूण रब्बी पिकांचा विचार केला, तर सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याखाली असते. २०१८-१९ मध्ये देशात हरभऱ्याची सर्वांत कमी लागवड झाली. त्या वर्षी ९६.१९ लाख हेक्टरवर लागवड होती.

२०१६-१७ मध्ये ९९ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. त्यानंतर हरभरा लागवड वाढतच गेली. देशातील वाढता हरभरा वापर आणि सरकारने वाढविलेला हमीभाव यामुळे लागवडीत वाढ झाल्याचे जाणकार सांगतात.

यंदाच्या हंगामात सुमारे ११२ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली. यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत जवळपास दोन टक्क्यांनी हरभरा लागवड घटली. यंदा मॉन्सून चांगला झाला. त्यामुळे रब्बी पिकासाठी पाणी उपलब्ध होते. पण मागील वर्षभर हरभऱ्याला चांगला भाव मिळाला नाही. त्यामुळे देशातील लागवड घटल्याचे सांगितले जाते.

देशातील हरभरा लागवड (लाख हेक्टर)

२०१६-१७…९९

२०१७-१८…१०७

२०१८-१९…९६.१९

२०१९-२०…१०७.३०

२०२०-२१…११०.३८

२०२१-२२…११४.९५

२०२२-२३…११२

देशातील राज्यनिहाय हरभरा लागवड

देशात दरवर्षी मध्य प्रदेशात हरभरा लागवड सर्वाधिक होते. मध्य प्रदेशात हरभऱ्याचे सरासरी लागवड क्षेत्र ३० लाख हेक्टर आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात मागील पाच वर्षांत सरासरी १९ लाख हेक्टर आणि राजस्थानमध्ये १७ लाख हेक्टरवर हरभऱ्याची लागवड झाली.

परंतु मागील दोन वर्षांपासून लागवडीचे चित्र बदलले. महाराष्ट्राने सलग दुसऱ्यावर्षी हरभरा लागवडीत बाजी मारली. एकट्या महाराष्ट्रात लागवड १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढली. राज्यात २९ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली आहे.

यंदा महाराष्ट्रातच सर्वाधिक क्षेत्र वाढले. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पेरा यंदा कमी राहिला आहे. मध्य प्रदेशातील पेरा २५ लाख हेक्टरवरून यंदा २२ लाख हेक्टरवर आला.

तर गुजरातमधील लागवड ११ लाख हेक्टरवरून ७ लाख ६५ हजार हेक्टरवर पोहोचली. राजस्थानमध्येही हरभरा लागवड जवळपास दीड लाख हेक्टरने घटली आहे.

Chana Rate
Chana Procurement : मराठवाड्यात हरभरा खरेदी केंद्रांची वानवा

राज्यनिहाय हरभरा लागवड (लाख हेक्टर)

राज्य…२०२१-२२…२०२२-२३

महाराष्ट्र…२७…२९

मध्य प्रदेश…२५…२२

राजस्थान…२०…२१.४३

कर्नाटक…११…११.८४

गुजरात…११…७.६५

देशातील हरभरा उत्पादन

गेल्या काही वर्षांचा आलेख पाहता भारतात हरभरा उत्पादन वाढत गेल्याचे दिसते. देशात २०१६-१७ मध्ये हरभरा उत्पादन सुमारे ९४ लाख टन होते. २०१७-१८ मध्ये हरभरा उत्पादनाने ११३.८ लाख टनांचा टप्पा गाठला. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी उत्पादन पुन्हा घटले.

मात्र त्यानंतर उत्पादनात सतत वाढच होत गेली. २०२०-२१ मध्ये उत्पादनाने ११९ लाख टनांचा टप्पा गाठला होता. तर मागील हंगामात देशातील हरभरा लागवड वाढली. तसेच वातावरणही पोषक होते. त्यामुळे विक्रमी उत्पादन झाले.

गेल्या हंगामात देशात १३५ लाख ४४ हजार टन हरभरा उत्पादन झाले होते. हे आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन होते. तर यंदा विक्रमी १३६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता सरकारने आपल्या दुसऱ्या सुधारित अंदाजात व्यक्त केली आहे.

असे झाल्यास हा उत्पादनाचा नवा विक्रम ठरेल. मात्र सरकारच्या या उत्पादनाविषयी यंदा शंका उपस्थित केली जात आहे.

देशातील हरभरा उत्पादन (लाख टन)

२०१६-१७…९३.८

२०१७-१८…११३.८

२०१८-१९…९९.४

२०१९-२०…११०.८

२०२०-२१…११९.१

२०२१-२२…१३५.४

२०२२-२३…१३६

हरभरा हमीभाव (रुपये प्रति क्विंटल)

२०१६-१७…४,०००

२०१७-१८…४,४००

२०१८-१९…४,६२०

२०१९-२०…४,८७५

२०२०-२१…५,१००

२०२१-२२…५,२३०

२०२२-२३…५,३३५

उत्पादन घटण्याचा अंदाज

देशातील लागवड क्षेत्र आणि सिंचनाची उपलब्धता, पाऊस आणि गारपिटीचा फटका नसल्याने सरकारने यंदा १३६ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मागील वर्षी १३५ लाख टन उत्पादन होते. मात्र जाणकार आणि उद्योगाला यंदाही सरकारचा हा अंदाज मान्य नाही. सरकारने हरभरा लागवडीची जी आकडेवारी दिली त्यावरूनही मतमतांतरे आहेत.

व्यापाऱ्यांच्या मते देशात सरकारच्या आकड्यांपेक्षा लागवड क्षेत्र कमी आहे. त्यातच वाढलेल्या तापमानाचाही फटका उत्पादनास बसत आहे. जाणकारांच्या मते यंदा १०० ते १०५ लाख टनांपर्यंत हरभरा उत्पादन होईल.

देशात फेब्रुवारी महिन्यात १९०१ नंतरचे सर्वाधिक उष्ण तापमान होते. फेब्रुवारी महिन्यात तापमान जास्त राहिल्याचा फटका पीक वाढीस बसला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात हरभरा पिकाची उत्पादकता कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फेब्रुवारीत तापमान जास्त राहिल्याने हरभरा उत्पादकता १० ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्च महिन्यात तापमान जास्त राहण्याचा अंदाज आहे. मागीलवर्षी मार्च महिन्यात विक्रमी तापमान होते. यंदाही ऊन चांगले तापण्याची शक्यता आहे.

यंदा मार्च महिन्यातही हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हामुळे हरभऱ्याची पक्वता वेळेआधीच होत आहे. त्यामुळे उत्पादकता कमी राहणार आहे, असे शेतकरी सांगत आहेत.

‘नाफेड’च्या खरेदीवर बाजाराची भिस्त

मागील हंगामात ‘नाफेड'ने हरभऱ्याची मोठी खरेदी केली होती. तसेच मागील वर्षभर टप्प्याटप्प्याने हरभरा विक्री केली. राज्यांना कमी दरात हरभरा देऊ केला. ‘नाफेड'च्या विक्रीमुळे हरभरा बाजार मागील वर्षभर दबावातच राहिला.

दुसरीकडे ‘नाफेड'कडे सध्या हरभऱ्याचा १५ ते १६ लाख टन साठा आहे. बाजार सध्या दबावात असल्याने ‘नाफेड'ला खरेदीत उतरणे गरजेचे आहे. ‘नाफेड'ने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये हमीभावाने खेरदीसाठी नोंदणी सुरू केली.

पण प्रत्यक्ष खरेदीला आणखी वेळ लागेल. ‘नाफेड'कडे यंदा मागील हंगामातील शिल्लक हरभरा जास्त असल्याने यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमी खरेदीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यातच सध्या खुल्या बाजारात हमीभावापेक्षा ५०० रुपयांपर्यंत कमी दर आहेत. त्यामुळे हरभरा बाजाराला यंदा ‘नाफेड'ची खरेदी आणि उत्पादन कसे राहते यावर अवलंबून आहे.

Chana Rate
Chana Market : हरभऱ्याचे घाटेच भरले नाही; उत्पादकता घटल्याचा शेतकऱ्यांचा दावा

हरभरा बाजारातील आशेचा किरण

सध्या खुल्या बाजारात हरभऱ्याला प्रति क्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. केंद्र सरकारने यंदा ५,३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. देशातील काही ठिकाणी हरभऱ्याची कमी अधिक प्रमाणात आवक सुरू झाली.

मात्र आवकेचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. तरीही हरभरा दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. ‘नाफेड'च्या विक्रमी खरेदीमुळे दर दबावात आहेत. ‘नाफेड'ने मागील हंगामात २५ लाख टनांच्या दरम्यान हरभरा खरेदी केला होता. त्याची विक्री टप्प्याटप्प्याने केली. सध्याही काही ठिकाणी ‘नाफेड' हरभरा विकत आहे.

‘नाफेड'च्या विक्रीमुळे बाजारावर दबाव आहे. व्यापारी आणि स्टॉकिस्ट वाढलेल्या दरात खरेदीस इच्छुक नाहीत. त्यामुळे दरावर दबाव कायम आहे. परंतु फेब्रुवारीत पिकाला तापमान वाढीचा फटका बसला. मार्च महिन्यातही तापमान जास्त राहण्याचा अंदाज आहे.

यामुळे उत्पादनातील घट जास्त वाढण्याचा अंदाज आहे. मागील आठवड्यात शनिवार ते मंगळवार अनेक भागांत पाऊस आणि गारपीट झाली. तसेच अनेक ठिकाणी घाटे भरले न भरण्याचे प्रमाण जास्त आहे.

त्यामुळे काही ठिकाणी उत्पादकता २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यंदा तुरीचेही उत्पादन कमी राहिले. त्यामुळे हरभऱ्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे.

ला-निना स्थितीमुळे मॉन्सून काळात पाऊस कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आताच याविषयी ठामपणे सांगता येणार नाही. एप्रिल किंवा मे महिन्यात भारतीय हवामान विभाग याविषयी सविस्तर सांगेल. पण सध्या बाजारात कमी पावसाची चर्चा सुरू आहे.

यंदा कमी पाऊस झाल्यास खरिपासह रब्बीतील पिकांवर अवकळा येऊ शकते. मॉन्सून काळात पाऊस कमी राहिल्यास हरभरा बाजाराला नक्कीच आधार मिळेल. पण ही स्थिती पुढील काळात स्पष्ट होईल. पण सध्याच्या चर्चेमुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार होत आहे.

‘नाफेड’ खरेदीत उतरले आणि उष्णतेचा कडाका वाढला तर खुल्या बाजारातही हरभरा भाव हमीभावाच्या आसपास राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com