Tur Market Price: शुल्कमुक्‍त वाटाणा आयातीमुळे तूर दबावात

Market Update: पिवळ्या वाटाण्याच्या शुल्कमुक्‍त आयातीला मुदतवाढ दिल्यामुळे देशाअंतर्गत बाजारात तुरीचे दर दबावात आले आहेत. २०२४-२५ या वर्षात तुरीला ७५५० रुपये तर २०२५-२६ या वर्षात ८००० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.
Vatana and Tur
Vatana and TurAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: पिवळ्या वाटाण्याच्या शुल्कमुक्‍त आयातीला मुदतवाढ दिल्यामुळे देशाअंतर्गत बाजारात तुरीचे दर दबावात आले आहेत. २०२४-२५ या वर्षात तुरीला ७५५० रुपये तर २०२५-२६ या वर्षात ८००० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र बाजारात तुरीचे व्यवहार ६३०० ते ६७५१ रुपये क्‍विंटलने होत आहेत. त्यामुळे उत्पादकांना प्रति क्‍विंटल १००० ते १५०० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

केंद्र सरकारने तूर डाळीसह इतर डाळींचे दर ग्राहकांच्या आवाक्‍यात राहावे याकरिता पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला शुल्कमुक्‍त परवानगी दिली आहे. आयातशुल्क मुक्‍त कालावधी संपुष्टात आला असताना सरकारकडून याला पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये डाळवर्गीय शेतीमालाचे दर दबावात आल्याचे चित्र आहे. मे महिन्याच्या अखेरीस नागपूरच्या कळमना बाजार समितीत तुरीचे दर ६५०० ते ६८५० रुपयांवर होते.

Vatana and Tur
MSP Tur Procurement : हमीभावाने ४० हजार ९०१ क्विंटल तूर खरेदी

त्यानंतरच्या काळात तुरीचे दर या दरम्यान स्थिर असल्याचे चित्र बाजारात आहे. त्यानंतर आता तुरीच्या दरात पुन्हा घसरण अनुभवली जात आहे. ६३०० ते ६७३० रुपये असा दर तुरीला या आठवड्यात मिळाला. त्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक केलेल्या तूर उत्पादकांची चिंता वाढीस लागली आहे. बाजारात तुरीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा उत्पादकांना होती. परंतु दर दबावात आल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. दरात वाढीची कोणतीच शक्‍यता नसल्याने सध्या बाजारात तुरीची आवक वाढती आहे.

२९ मे रोजी ७०० क्‍विंटल तूर आवक असताना आता ती दुपटीने वाढत १५०७ क्‍विंटलवर पोहोचली आहे. शेगाव (बुलडाणा) बाजार समितीत तुरीची ४७ क्‍विंटल इतकी कमी आवक होत असताना दर ५७०० ते ६४७० रुपये क्‍विंटलवर आले आहेत. यवतमाळ बाजार समितीत तुरीला ६३०० ते ६७५५ रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. कारंजा (वाशीम) बाजार समितीत तुरीचे व्यवहार ५७५५ ते ६३२० रुपयांनी होत असून आवक ११२५ क्‍विंटल इतकी नोंदविण्यात आली.

Vatana and Tur
Yellow Pea Import: ‘वाटाण्या’च्या अक्षता

अमरावती बाजारात दरात घसरण

अमरावती बाजार समितीचा विचार करता दरवाढीची कोणतीच अपेक्षा नसल्याने या बाजार समितीत तुरीची आवक साडेतीन हजार क्‍विंटलवर पोहोचली आहे. ८००० रुपयांचा हमीभाव असताना या ठिकाणी तुरीला अवघा ६४०० ते ६५७७ रुपयांचाच दर मिळत असल्याची माहिती देण्यात आली.

पिवळ्या वाटाण्याला आयात शुल्कमुक्‍त करण्यात आले आहे. परिणामी बाजारात तुरीसह इतर सर्व डाळवर्गीय पिकांचे दर दबावात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. सरकारने ग्राहकांसोबतच शेतकऱ्यांच्या हिताला देखील प्राधान्य देण्याची गरज आहे. तुरीला ८००० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु १००० ते १५०० रुपये क्‍विंटल कमी दराने बाजारात तुरीचे व्यवहार होत आहेत.
विजय जावंधिया, शेतीमाल विपणन क्षेत्राचे अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com