Turmeric Market : हळदीला पुन्हा सोन्याचे दिवस येतील?

Turmeric Rate : हळदीच्या मागणी-पुरवठ्याचे ढोबळ समीकरण आणि पुढील ८-१० महिन्यांचा कालावधी विचारात घेतला तर हळदीची किंमत परत एकदा नवीन विक्रमाकडे जाणार असल्याचे सूचित होते. ही बहुधा अखेरची आणि मोठी तेजी नक्की केव्हा येईल आणि किती टिकाऊ राहील, हा खरा प्रश्‍न आहे.
Turmeric Market
Turmeric Market Agrowon

Turmeric Market Update : मागील एक-दोन आठवडे भारतातच नव्हे तर जागतिक कमोडिटी बाजारात कच्चे तेल आणि तांबे-ॲल्युमिनियम सारख्या धातूंच्या किमती अनेक महिन्यांच्या उच्चांकावर गेल्या असल्या तरी त्यात खरी धमाल आणि कमाल सोने-चांदीने केली आहे. तीन महिन्यांपूर्वी दोन हजार डॉलर्सवर असलेला वायदेबाजारातील सोन्याचा आंतरराष्ट्रीय भाव शुक्रवारी रात्री एक वेळ २४५० डॉलर्स प्रति औंस या विक्रमी पातळीवर पोहोचला. आणि त्यानंतर लगेच जवळ जवळ १०० डॉलर्सची घसरण देखील नोंदवली.

भारतात सोन्याने वायदे बाजारात ७४ हजार रुपये प्रति १० ग्रॅम हा टप्पा गाठला. म्हणजे दोन महिन्यांत १२ हजार रुपयांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. चांदीने तर गुंतवणूकदारांची अक्षरश: चांदी केली आहे. चांदीने २०२४ मध्ये आतापर्यंत जवळपास ३० टक्के परतावा दिला आहे.

भारतीय वायदे बाजारात शुक्रवारी सुमारे ८६ हजार रुपये प्रति किलो हा किमतीचा नवा विक्रम करून चांदी ८३ हजार रुपयांवर स्थिरावली आहे. केवळ तीन महिन्यांत २० टक्के परतावा दिला. त्यामुळे भारतासारख्या सुवर्णवेड्या देशात गुंतवणूकदार सोने-चांदीकडे अधिकच आकर्षित होत आहेत. मात्र सोने खरेदीची वेळ आता निघून गेली असल्यामुळे सोन्यासारखी तेजी येऊ शकणाऱ्या इतर कमोडिटीजकडे पाहणे अधिक शहाणपणाचे ठरेल.

या पार्श्‍वभूमीवर कुठली कमोडिटी येत्या काळात चांगला परतावा देऊ शकेल याचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येईल की धने आणि हळद या पिकांना चांगले भवितव्य असू शकेल. या मसालावर्गीय पिकांना या वर्षीच्या उत्पादनातील घटीमुळे पुढे चांगले दिवस येऊ शकतील. परंतु धने पीक असे आहे, की भारताबरोबर रशिया-बल्गेरियासारख्या चार प्रमुख देशांमधे त्याचे उत्पादन, निर्यातीचे व्यवहार होतात.

त्यामुळे त्याच्या किमतीवर भारताचे नियंत्रण नाही. मग राहता राहिली हळद. जगातील निदान ४५ देशांना हळदीचा पुरवठा करणारा भारत हा एकमेव देश आहे. हळदीच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा ८० टक्के किंवा थोडा अधिकच आहे. त्यामुळे या बाजारावर भारताचे नियंत्रण राहते. म्हणून हळदीकडे नव्याने पाहणे योग्य ठरेल.

Turmeric Market
Turmeric Market : वायद्यांमध्ये हळददराचा विक्रम ; कमी उत्पादनामुळे तेजी टिकून राहण्याचा अंदाज

मागील वर्षी हळद २०० टक्क्यांहून अधिक वाढल्यामुळे दिवाळीच्या दरम्यान किंमत जवळजवळ २० हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील भारतीय हळदीची मागणी कमी झाली.

त्यामुळे किंमत परत १२ हजार रुपयांपर्यंत घसरली. मात्र या वर्षी मार्च महिन्यात परत किमतीने पूर्वीचा विक्रम मागे सारून २० हजारांपलीकडे झेप घेतली. त्यामुळे हळद पुन्हा एकदा प्रकाशात आली आहे. या स्तंभातील लेखात हळदीमध्ये १६,२०० रुपयापर्यंत ‘करेक्शन' येण्याचा अंदाज दिला होता.

प्रत्यक्षात एनसीडीईएक्स या कमोडिटी एक्स्चेंजवर किंमत साडेपंधरा हजारांवर आल्याचे दिसून येत आहे. वायदे बाजारातील काही तांत्रिक गोष्टींमुळे किमतीत थोडे चढ-उतार होत असतात. सध्याची नरमाई ही त्याचा एक भाग आहे. परंतु मूलभूत घटक तेजीपूरक असल्यामुळे मूळ कल अजूनही तेजीचाच आहे.

आवकीचा जोर

सध्या हळदीच्या वायद्यात आलेल्या नरमाईचे प्रमुख कारण थोडेसे तांत्रिक असले तरी शेतकऱ्यांची बदललेली मानसिकता देखील याला कारणीभूत आहे. मागील दोन वर्षे अधिक किंमत मिळावी म्हणून सोयाबीन आणि कापसाचे साठे करून पश्‍चात्ताप झालेले उत्पादक आता हळदीचे उत्पादन कमी असूनही जास्त काळ साठवणूक करण्यास तयार नाहीत.

मागील हंगामापेक्षा या वर्षी तिप्पट भाव मिळत आहे यावर समाधान मानून प्रत्येक तेजीत आपला माल विकत आहेत. एक प्रकारे ही मानसिकता योग्य असली तरी हळदीचा ८० टक्के हंगाम अजून बाकी असताना निदान थोडा माल तरी साठवणूक करण्याची व्यापारी वृत्ती अंगी बाणवण्यात काही गैर नाही.

बदललेल्या मानसिकतेमुळेच मराठवाड्यात अजूनही हळदीच्या आवकीचा जोर चांगला आहे. दर दिवशी १२ ते १५ हजार पोती माल बाजारात येत असल्यामुळे किमतीला लगाम बसत आहे. तसेच जानेवारी ते मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत निर्यात घटल्याचे सांगितले जात आहे. २०२१-२२ मध्ये हळद निर्यात दीड लाख टन होती.

ती पुढील वर्षात १ लाख ७२ हजार टन झाली असली, तरी २०२३-२४ या नुकत्याच संपलेल्या वर्षात ती परत १ लाख ५५ हजार टनाच्या आसपास आल्याचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती १० टक्के कमी भरते. त्याचा थोडा दबाव किमतीवर आल्याचे दिसून येत आहे.

काही अनुभवी बाजारतज्ज्ञांच्या मते हळद वायदे बाजारात आवकीचा जोर कमी झाला नाही तरी ती फार खाली येणार नाही. काँट्रॅक्ट एक्स्पायरीच्या दबावात क्वचित भाव १४ हजार ५०० रूपये होईलही; परंतु ती खरेदीची सुवर्णसंधी असेल असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Turmeric Market
Turmeric Market : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या आवकेत मोठी वाढ

हळद उत्पादनात घट

यापूर्वी म्हटल्याप्रमाणे हळदीच्या उत्पादनात या वर्षी २०-२५ टक्के घट झाल्याचे म्हटले जात आहे. काही जुनेजाणते उत्पादक आणि व्यापारी ही घट ३५-४० टक्के असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. उपलब्ध आकडेवारी पाहता या वर्षातील उत्पादन ४ लाख ४० हजार टन ते ४ लाख ५० हजार टन इतके झाले असावे. मागील वर्षी ते ५ लाख ५० हजार टन होते. यापैकी अंदाजित स्थानिक आणि निर्यात मागणी एकत्रितपणे ४ लाख ७० हजार टन भरते.

म्हणजे ३० हजार टनाचा अनुशेष राहतो. तसेच हंगामाच्या सुरुवातीला असलेला मागील वर्षाचा शिल्लक साठादेखील मागील चार वर्षांतील सरासरी दीड लाख टनावरून ८० ते ९० हजार टन एवढा कमी झाल्याचे व्यापारी वर्तुळातील अंदाज आहेत. पुढील पीक यायला अजून १० महिन्यांचा वेळ आहे. या काळात मागणी-पुरवठ्याची स्थिती काय राहील, याचे चित्र यावरून स्पष्ट होते.

हळदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या निजामाबादमधील अनुभवी व्यापारी आणि एनसीडीईएक्सच्या हळद समितीवरील कामाचा १७ वर्षांचा अनुभव असणाऱ्या अमृतलाल कटारिया यांच्या मते सांगली, तमिळनाडूतील इरोड आणि तेलंगणामधील निजामाबादमधील ८० टक्के आवक संपली असून, आता फक्त मराठवाडा विभागात आवक चालू आहे.

ती १५ मेपर्यंत चांगलीच मंदावेल. तर हिंगोलीमधील हळद उत्पादक शेतकरी प्रल्हाद बोरगड यांच्या मते शेतकऱ्यांच्या बदललेल्या मानसिकतेमुळे हळद आवक जून मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत चालेल. मात्र दोघांच्याही मते उत्पादन २५- ३५ टक्के कमी झाले असल्यामुळे हळदीत तेजीचा कल राहील, यावर शिक्कामोर्तब होते.

नवीन विक्रम अपरिहार्य

मागणी-पुरवठ्याचे वरील ढोबळ समीकरण आणि पुढील ८-१० महिन्यांचा कालावधी विचारात घेतला तर हळदीची किंमत परत एकदा नवीन विक्रमाकडे जाणार असल्याचे सूचित होते. ही बहुधा अखेरची आणि मोठी तेजी नक्की केव्हा येईल आणि किती टिकाऊ राहील, हा खरा प्रश्‍न आहे.

त्या दृष्टीने विचार करता मराठवाडा विभाग निर्णायक ठरेल. तेथील आवक मे मध्यापर्यंत थंडावली तर तेजी मे काँट्रॅक्ट समाप्तीच्या आसपास चालू होऊ शकेल. जर आवक चालूच राहिली तर ही तेजी एक महिन्याने लांबू शकेल. मात्र या कालखंडादरम्यान भारतीय हवामान खात्याकडून मोसमी पावसाचे अंदाज प्रसिद्ध होत असतात.

तेजीच्या कलावर त्याचा तात्पुरता का होईना परंतु परिणाम होईल. या वर्षी मोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक होण्याचे अंदाज अनेक देशी-परदेशी संस्थांनी व्यक्त केले आहेत. त्या वेळी कृषिमाल बाजारपेठेत एक विक्रीचे दडपण आल्यामुळे तात्कालिक व मर्यादित मंदी येऊ शकेल किंवा तेजी बोथट होईल. मात्र दिवाळीपूर्वी मागणीमध्ये जेव्हा मोठी वाढ होईल, त्या वेळी बाजारात पुरवठा आटलेला असेल. तसेच या तिमाहीत निर्यातीत वाढ झाल्यास हंगाम-अखेर शिल्लक साठा २० ते २५ हजार टनांपर्यंत घसरण्याची शक्यता निर्माण होईल. पाच वर्षांतील हा निचांक असेल.

हे चित्र पाहता काही तज्ज्ञांच्या मते ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत हळद परत २० हजारांची पातळी ओलांडून २५ हजार रुपयांकडे झेप घेण्याची शक्यता आहे. टेक्निकल चार्टस हळद २८ ते ३० हजार रूपयांचा टप्पा गाठेल, असे दाखवत आहेत. परंतु कमोडिटी बाजारातील मागील अनुभव पाहता अपेक्षित मागणी-पुरवठा समीकरणाच्या आधारे हळदीची योग्य पातळी २२,४०० ते २३,८०० रुपयांची राहील, असा होरा आहे. अर्थात, किमतीबाबतचे वरील अंदाज हे हळदीमध्ये गुंतवणुकीची शिफारस न समजता विविध संस्थांचे रिसर्च रिपोर्ट आणि मसाला मंडळाकडून प्रसारित केलेल्या आकडेवारी मधून संकलित केलेली माहिती समजावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com