Pune News : देशात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. तूर डाळीने काही बाजारांमध्ये १६३ रुपयांचा टप्पा गाठला. सरकारच्या अथक प्रयत्नांनंतरही तुरीचे भाव कमी होण्याचे नाव घेईना. सरकारची सर्व भीस्त आता आफ्रिकेतून तूर आयातीवर आहे. सप्टेंबरपासून आफ्रिकेची तूर बाजारात येईल. पण केवळ तूर आयात करून भाव कमी होण्याची शक्यता नाही. त्यासाठी देशातील तूर लागवड आणि पाऊसमान महत्वाचे आहे.
देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. सरकारच्या सक्तीनंतरही तुरीच्या दरात नरमाई दिसली नाही. दरात काहीसे चढ उतार आले. पण दर तेजीतच दिसले. बाजारातील आवक सरकारच्या प्रयत्नानंतरही वाढली नाही.
त्यामुळे तुरीचे भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील दोन महिने देशात तुरीचा तुटवडा कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरातील तेजी टिकेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
तुरीचे भाव सरकारने स्टाॅक लिमिट लावल्यानंतर स्थिरावले आहेत. काही बाजारांमध्ये तुरीचा कमाल भाव कमी जास्त होत आहे. पण दरात फारशी वाढ मागील महिनाभरात दिसली नाही.
त्यामुळे स्टाॅकीस्ट आणि व्यापारी नफावसुलीसाठी तुरीची विक्री करत होते. परिणामी दरात काहीसे चढ उतार आले. पण सरासरी भावपातळी कायम राहीली. म्हणजेच सरकारला तुरीचे दर कमी करण्यात अपयश आलेले दिसते. पण सरकार भाव स्थिर ठेवण्यात अशस्वी झाले, असे म्हणावे लागेल.
देशात तुरीचा स्टाॅक कमी असल्याने भाव तेजीत आहेत. तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारची भीस्त आता आफ्रिकेतून होणाऱ्या तूर आयातीवर आहे. आफ्रिकेतील तूर ऑगस्टपासून काढणीला येईल.
त्यानंतर महिनाभरात आयात होऊ शकते. आफ्रिकेतील तूर बाजारात आल्यानंतर भाव कमी होतील, अशी आशा सरकारला आहे. पण याला देशातील तूर लागवड आणि पावसाने साथ दिली पाहीजे. कारण आतापर्यंत देशातील पाऊसमान आणि तूर लागवड आशादायक दिसत नाही.
जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी देशातील तूर लागवड गेल्यावर्षीपेक्षा तब्बल ६० टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्या हंगामात देशात ७ जुलैपर्यंत १५ लाख हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. मात्र यंदा केवळ ६ लाख हेक्टरवर क्षेत्र आतापर्यंत तुरीखाली आले. देशात तूर लागवडीत महाराष्ट्र आणि कर्नाटक महत्वाची राज्ये आहेत. या दोन्ही राज्यांतच ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र असते. पण या दोन्ही राज्यांमध्ये पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे तूर लागवड माघारली आहे.
आजही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तूर पट्ट्यात पुरेसा पाऊस नाही. काही भागात तर पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही भागात पेरण्या होऊनही पाऊस नाही. यापुढील काळात पाऊस कधी आणि किती होतो यावरून लागवडीची निर्णय शेतकरी घेतील.
पण लागवडीला विलंब झाल्यास क्षेत्र कमी होऊ शकते. त्यातच तूर सहा ते सात महिन्यांचे पीक आहे. एल निनोमुळे पाऊसमान कमी झाल्यास उत्पादकतेवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे बाजाराचे लक्ष या सर्व घडामोडींकडे आहे.
सरकारला केवळ आयात करून भाव करता येणार नाही. त्यासाठी यंदा देशातील पिकानेही साथ द्यावी लागेल. आफ्रिकेत लवकर तूर येते. पण येथून आयात होणाऱ्या तुरीतून देशाची केवळ एक ते दीड महिन्याची गरज भासू शकते. यामुळे देशातील उत्पादन वाढणे गरजेचे आहे. देशातील उत्पादन गेल्यावर्षीप्रमाणे घटले तर तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.