Tur Market : मोझांबिकमधून तूर आयात थांबली

Tur Import : मोझांबिकने स्वस्त भावात तूर देण्यास नकार दिल्यानंतर भारताने दबाव वाढवला होता. त्यामुळे मोझांबिकमधील निर्यातदारांनी कोर्टात धाव घेतली होती.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : मोझांबिकने स्वस्त भावात तूर देण्यास नकार दिल्यानंतर भारताने दबाव वाढवला होता. त्यामुळे मोझांबिकमधील निर्यातदारांनी कोर्टात धाव घेतली होती. मोझांबिकच्या कोर्टाने भारताला चांगलाच झटका दिला.

यामुळे आफ्रिकेतील इतर देशांच्या तुरीचेही भाव वाढले. तर देशातील महत्त्वाच्या तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तूर उत्पादनात आणखी घट होण्याचा अंदाज असून दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे.

भारताने मोझांबिकसोबत वर्षाला दोन लाख टन तूर आयातीचे करार केले आहेत. म्हणजेच मोझांबिक भारताला दोन लाख टन तूर देणार. आता भारताला तुरीचा तुटवडा जाणवतो. यामुळे तुरीचे भाव चांगलेच वाढले आहेत. नेमके याच काळात मोझांबिकमध्ये तुरीची उपलब्धता आहे. तुरीचे भाव कमी करण्यासाठी मोझांबिकने सर्व तूर भारताला लगेच निर्यात करावी, असा दबाव भारताच्या वतीने टाकण्यात आला.

मोझांबिकमध्ये दीड ते दोन लाख टन तुरीचा स्टॉक आहे, पण येतील निर्यातदार निर्यात करत नाहीत, त्यांना भारताच्या अडचणीचा फायदा घेऊन जास्त भाव वसूल करायचाय, अशी मांडणी करत भारतातील आयातदारांनी मोझांबिकशी केलेले करार रद्द करण्याची मागणी केली. केंद्र सरकारने मोझांबिक सरकारशी अनेकदा चर्चाही केली.

Tur Market
Tur Crop Damage : जळगाव जामोदमध्ये तुरीचे पीक जमिनीवर

केंद्र सरकारने सर्व प्रयत्न करूनही मोझांबिकमधून आयात वाढत नव्हती. कारण होते करार. भारताचा करार झाला आहे दोन लाख टनांचा. आता मोझांबिकमधील निर्यातदारांचे म्हणणे आहे, की फक्त दोन लाख टनांचेच करार आहेत.

या दोन लाख टन निर्यातीसाठीच निर्यातदारांना सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन म्हणजेच ही तूर नेमकी कुठे उत्पादित झाली याची माहिती द्यावी लागेल. यापेक्षा अधिकच्या तुरीला हे सर्टिफिकेट लागू होणार नाही. नेमका हाच मुद्दा घेऊन मोझांबिकमधील निर्यातदाराने कोर्टात धाव घेतली होती.

मोझांबिक कोर्टाने तेथील निर्यातदारांच्या बाजूने निकाल देत दोन लाख टनांपेक्षा जास्त तूर निर्यात थांबवली. तसेच कोर्टाने सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनलाही स्थगिती दिली. यामुळे भारताला मोठा फटका बसला.

मोझांबिकमधून आयात थांबल्याने आफ्रिकेतील इतर देशांकडे तुरीची मागणी वाढली. देशातील आयातदार मालावी, टांझानिया, युगांडा आणि केनिया या देशांकडे तुरीची चाचपणी करत आहेत. यामुळे या देशांच्या तुरीच्या दरातही वाढ झाली. या देशांच्या तुरीला ८ हजार ते ९ हजारांचा भाव मिळत आहे.

Tur Market
Tur Market : नवी तूरही चांगलाच भाव खाणार

देशात तूर पिकाचे नुकसान वाढले

देशातही तुरीच्या पिकाला पावसाचा जोरदार फटका बसला. २६ नोव्हेंबरपासून झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रात तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यातील नगर, मराठवाडा आणि विदर्भ या महत्त्वाच्या भागात पिकांचे नुकसान झाले.

फूलगळ झाली, पीक आडवे झाले. कर्नाटकातही नुकसान झाले होते. आताही कर्नाटकात ‘मिगजौम’ चक्रीवादळामुळे जोरदार वारे आणि पावसामुळे पिकाचे नुकसान वाढले. म्हणजेच काय तर तूर पिकाचे नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

दर टिकून राहण्याची शक्यता

तुरीला देशातील बाजारात सध्या ९ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. नवा माल पुढील महिनाभरात बाजारात दाखल होऊ शकतो. त्यामुळे दरातही काहीसे चढ-उतार होत आहेत. पण तुरीचा जुना माल कमी आहे. नवा मालही कमीच असेल. यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहील.

म्यानमारच्या मालाचा काहीसा दबाव असेल. पण तुरीची टंचाई मोठ्या प्रमाणात असल्याने तुरीचा भाव टिकून राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल विकताना या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून विक्रीचे नियोजन केल्यास फायदेशीर ठरेल. नव्या हंगामात शेतकऱ्यांना तुरीसाठी १० हजारांचाही भाव मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com