
नाशिक ः टोमॅटो उत्पादक शेतकरी (Tomato Farmer) २०२२-२३ या आर्थिक वर्षात आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे गेले आहेत. सततचा पाऊस, अनेक भागांत अतिवृष्टीमुळे मर, करपा अशा रोगांच्या (Tomato Disease) विळख्यात लागवडी सापडल्या.
असे असतानाही शेतकऱ्यांनी दोन पैशांच्या अपेक्षेने लागवडी (Tomato Cultivation) जगविल्या. ऑक्टोबर महिन्यात दराने साथ दिली.
त्यामुळे दिवाळीदरम्यान पुन्हा काही शेतकऱ्यांनी लागवडी केल्या. मात्र नोव्हेंबरपासून आवक कमी होऊनही दराला मोठा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
यंदा टोमॅटो हंगामात दरात मोठे चढ-उतार दिसून आले. उत्तर महाराष्ट्रात टोमॅटोसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सप्टेंबर महिन्यात ३६० रुपये प्रतिक्रेट दर होता. त्यात ऑक्टोबर महिन्यात सुधारणा होऊन टोमॅटो सरासरी ४८० रुपये प्रतिक्रेट विकले गेले.
हेच दर नोव्हेंबरमध्ये १५१ रुपये इतके प्रतिक्रेटपर्यंत खाली आले. त्यामुळे २० किलोच्या क्रेटमागे ३०० रुपयांचा फटका बसला. त्यानंतर सुधारणा दिसून आलेली नाही.
जिल्ह्यातील गिरणारे, पिंपळनारे फाटा, खोरी फाटा अशा व्यापारी खरेदी केंद्रांवर नंतरच्या टप्प्यात २० ते ७० रुपये प्रतिक्रेट इतक्या खाली दराने विक्री झाली.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मोठी आवक झाली. सप्टेंबर महिन्यात परराज्यांतील बाजारात मागणी असल्याने आवक वाढून दरही टिकून होते. मात्र नंतर नोव्हेंबर, डिसेंबर व चालु जानेवारी महिन्यात आवक कमी होऊनही मागणी घटल्याने दराचा आलेख घसरता राहिला.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १२) ३,१६२ क्विंटल इतकी सर्वाधिक आवक घोटी बाजार समितीत झाली. येथे क्विंटलला सरासरी ७०० रुपये दर मिळाला. तर पुण्यात १,६९८ क्विंटल आवक होऊन सरासरी ६५० रुपये, मुंबई येथे १,३३३ क्विंटल आवक होऊन १ हजार रुपये,
नागपूर येथे ८०० क्विंटल आवक होऊन ४५० रुपये असे प्रतिक्विंटल दर मिळाले. इतर बाजार आवारात आवक कमीच आहे. मंचर बाजार आवारात अवघी आवक १८ क्विंटल झाली. येथे १७५० रुपये प्रतिक्विंटल उच्चांकी दर नोंदविला गेला.
पिंपळगाव बाजार समितीतील आवक, दर स्थिती
महिना...आवक (क्विंटल)...किमान...कमाल...सरासरी (दर प्रतिक्रेट-२० किलो)
ऑगस्ट...३,९१,५९६...३०...५४१...२६५
सप्टेंबर...१०,६५,२८९...३१...७०१...३६०
ऑक्टोबर...९,३४,३२४...४१...८८१...४८०
नोव्हेंबर...५,०७,४४४...२१...४११...१५१
डिसेंबर...१६१००९...३०...२६५...७५
जानेवारी(ता.१२ अखेर )...३९४१...५०...१६१...९०
गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यांत मागणी
असलेल्या बाजारपेठांच्या लगतच्या क्षेत्रातून आवक वाढली आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील माल बाहेर जात नसल्याची स्थिती आहे. खरेदीसाठी आलेले व्यापारी परतले आहेत. त्यामुळे बाजारावर परिणाम होत आहे. किरकोळ लागवडी असल्या, तरी त्यांना मागणी नसल्याने परतावा मिळत नसल्याची स्थिती आहे. पाकिस्तान सीमा बंद तसेच बांगलादेशमध्ये कमी माल गेल्याचाही फटका आहेच. दिवाळीनंतर बाजार न वाढल्याने व्यापारी वर्गही अडचणीत आहे.
- महेंद्र शिंदे, टोमॅटो आडतदार, पिंपळगाव बसवंत
गुणवत्तेच्या मालाची ५० ते ८० रुपये दरम्यान विक्री झाली. व्यापारी असतानाही दरात सुधारणा नव्हतीच. परिणामी, प्रक्रिया उद्योगासाठी माल द्यावा लागला. व्यापारी माल खरेदी करत होते. मात्र बाहेरचा पुरवठा बंद झाल्याने खरेदी दबावात झाली. हंगामात दरावर सातत्याने दबावच दिसून आला. टोमॅटो तोडणी ते वाहतूक यासाठी सुद्धा भांडवल खर्च करूनही उत्पन्न त्याखाली मिळाले. त्यामुळे मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
- सुदाम म्हैसधुणे, टोमॅटो उत्पादक, मुंगसरे, ता. जि. नाशिक
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.