
Kolhapur News : देशात येत्या हंगामात साखरेचे उत्पादन ३१७ लाख टन होण्याचा अंदाज आहे. इंडियन शुगर्स असोसिएशनने (इस्मा) उपग्रह प्रतिमांचा आधार घेऊन हा अंदाज वर्तवला आहे. यंदा देशात उसाचे क्षेत्र ५९ लाख हेक्टर आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उसाच्या क्षेत्रात थोडी वाढ दिसत असली तरी साखर उत्पादन वाढण्यावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असा अंदाज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा आहे.
इथेनॉलकडे साखर वळविण्यापूर्वीचे उत्पादन ३६२ लाख टन असेल. ४५ लाख टन साखर इथेनॉलसाठी वापरली जाईल. उर्वरित साखर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. देशाचा खप २७५ लाख टनांपर्यंत असेल. ही साखर विक्री झाल्यानंतर पुढील हंगामापर्यंत ४२ लाख टन साखर शिल्लक असेल, असा अंदाज आहे.
यंदा मॉन्सूनने देशात उशिरा सुरुवात केली. यामुळे प्रत्यक्षात जरी ऊस क्षेत्र वाढलेले दिसत असले तरी त्यातून किती उत्पादन निघेल याबाबत साशंकता व्यक्त होत होती. जुलैमध्ये पावसाने समाधानाकारक हजेरी लावल्यानंतर ‘इस्मा’ने देशभरातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत प्रत्येक राज्यांचा ऊस लागवड व पावसाचा अंदाज घेण्यात आला. यंदाही साखर उत्पादनात फार मोठी वाढ होईल, अशी शक्यता नसल्याचे चित्र स्पष्ट झाले.
यंदा साखरेचा मुबलक साठा
केंद्र सरकारने मात्र साखर उत्पादनाबाबत फारशी काळजी करण्याची गरज नसल्याची माहिती एका निवेदनाद्वारे दिली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सरकार देशातील कारखान्यांकडून साखर विक्रीचा अंदाज घेत आहे. यानुसार विक्रीचे कोटे जाहीर करत आहे. देशातील साखरेच्या किरकोळ किमती स्थिर ठेवण्यात यशस्वी ठरल्याचा दावा केंद्राचा आहे.
एप्रिल-मे २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय साखरेच्या किमतींनी दशकातील सर्वोच्च पातळी गाठली असली तरीही, साखरेच्या देशांतर्गत किमतींमध्ये सुमारे ३ टक्के इतकी नाममात्रवाढ झाली आहे. ही दरवाढ उसाच्या रास्त आणि लाभदायक किंमत (एफआरपी) वाढीशी सुसंगत आहे.
१०८ लाख टन सारखेचा साठा
आंतरराष्ट्रीय साखरेच्या किमती भारतातील साखरेच्या किमतीपेक्षा जवळपास ५० टक्के जास्त आहेत. देशातील साखरेची सरासरी किरकोळ किंमत सुमारे ४३ रुपये प्रतिकिलो आहे आणि ती केवळ याच मर्यादेत राहण्याची शक्यता आहे. गेल्या १० वर्षांत साखरेच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे; मात्र, त्याच प्रमाणात साखरेचा खप वाढलेला नाही; त्यामुळे, कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत देशात पुरेसा साखरसाठा उपलब्ध असल्याची खात्री आहे.
जुलै २०२३ च्या अखेरीस, भारतात सुमारे १०८ लाख टन साखरेचा साठा आहे, जो चालू ऊस हंगाम २०२२-२३ च्या उर्वरित महिन्यांसाठी तसेच हंगामाच्या शेवटी सुमारे ६२ लाख टनांच्या उद्दिष्टित साठ्यासह देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे देशांतर्गत ग्राहकांना वर्षभर पुरेशी साखर रास्त दरात उपलब्ध असेल, असे केंद्राने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.