Grape Market Update छत्रपती संभाजीनगर : जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील द्राक्षाच्या आगारातील द्राक्षाच्या दरात (Grape Rate) वाढ नसल्याचीच स्थिती आहे. ग्राहकांना लागणारे दर व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळणारे दर यात मोठी तफावत दिसत आहे. शिवाय वातावरणाची प्रतिकूलता शेतकऱ्यांना आपले द्राक्ष मिळतील त्या भावात विक्री करावी लावत असल्याचे चित्र आहे. (Latest Agriculture News)
आधी थंडीमुळे द्राक्षाला उठाव नव्हता. महाशिवरात्री आधी ३५ ते ४० रुपयांपर्यंत असणारे द्राक्षाचे प्रती किलोचे दर घडीला २० ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले होते.
आता ते १५ रुपयांपासून ३० रुपयांच्या आतच प्रति किलोपर्यंत खाली उतरले असल्याचे शेतकरी सांगतात. जालना जिल्ह्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरूडी, बोरखेडी, आदी शिवारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सटाणा, दरकवाडी, पळशी परिसरातही द्राक्ष बागांचा विस्तार आहे. जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारातील काळ्या द्राक्षाला जानेवारीच्या मध्यानात १२६ रुपये प्रतिकिलो तर इतर द्राक्षांना ४५ ते ६५ रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत होते. त्यानंतर ते २० ते ३२ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले.
द्राक्षाची मागणी असलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यात तसेच महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी लांबल्याने द्राक्षाच्या मागणीत सुरुवातील वाढ होत नसल्याची स्थिती होती.त्याचा थेट परिणाम द्राक्ष दरावर झाला.
याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या भागातील द्राक्ष एकाच वेळी काढणीला आल्याने उत्पादन कमी असूनही दरात वाढ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आता द्राक्ष १५ ते २७ रुपये प्रति किलो दरम्यानच व्यापारी मागत आहेत. हवामान अनुकूल नाही, त्यात व्यापाऱ्यांची ही एकजूट आहे. शिवाय सर्व शेतकऱ्यांना थेट विक्री करणे शक्य नाही.
- दत्ता म्हस्के, द्राक्ष उत्पादक, वरुड, जि. जालना.
आमच्या परिसरात आत्ताच्या घडीला १५ ते ३२ रुपये प्रति किलोपर्यंत द्राक्ष विकले जात आहेत. मी स्वतः २२ रुपये प्रति किलो ने द्राक्ष दिले.
- नंदकिशोर साळुंके, द्राक्ष उत्पादक गोलटगाव, छत्रपती संभाजीनगर
सतत बदलत असलेले वातावरण, त्यामुळे वाढणारी धोके द्राक्षांमध्ये गोडी उतरण्यात येणाऱ्या अडचणी, फळ काढणीचा लांबू न देता येणारा अवधी, यामुळे विवंचनेतील द्राक्ष उत्पादक मिळणाऱ्या दरात समाधान मानून घेत आहे.
- शिवाजी घावटे, द्राक्ष उत्पादक सटाणा, छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.