

Kolhapur News: देशातील साखर कारखान्यांना केंद्र सरकारने एप्रिलचा कोटा देताना उत्तर प्रदेशवर मेहरबानी करत मार्चपेक्षा तब्बल २० टक्के साखर विक्री कोटा जादाचा दिला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला गेल्या महिन्यापेक्षा ५ टक्के कमी कोटा आला आहे. उन्हाळ्यामुळे साखरेला बाजारात चांगले दर असल्याने कारखाने साखर विक्री जादा प्रमाणात करण्यासाठी धडपडत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशला झुकते माप देत तेथील कारखान्यांना गेल्या महिन्यापेक्षा जादा साखर विक्री करण्याची मुभा दिली आहे.
उत्तर प्रदेशला मार्चमध्ये ६ लाख ९५ हजार १३८ लाख टन साखरेचा कोटा दिला होता. एप्रिलमध्ये ८ लाख ३७ हजार ७४६ टनांचा कोटा दिला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत उत्तर प्रदेशला १ लाख ४२ हजार ६०८ लाख टन साखर जादा विक्रीसाठी दिली आहे. महाराष्ट्राला एप्रिलमध्ये ८ लाख ५ हजार २५६ टनांचा कोटा दिला आहे. गेल्या महिन्यात ८ लाख ४९ हजार टन साखर विक्री करण्यास परवानगी दिली होती. गेल्या महिन्याच्या तुलनेत ४४ हजार टनांनी कोटा घटवला आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांना विक्री कोटा कमी दिल्याने आता दर असूनही त्याचा फायदा या राज्यातील कारखान्यांना उत्तर प्रदेश इतका होणार नाही, अशी शक्यता आहे.
देशात उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील शीतपेय व आईस्क्रीम उत्पादक कंपन्या साखरेची मागणी नोंदवत आहेत. सध्या महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर हंगाम संपला आहे. केवळ उत्तर प्रदेशातच सध्या जादा संख्येने कारखाने सुरू आहेत. यामुळे यंदाच्या हंगामात साखरेची निर्मिती धीम्या गतीने होत आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्पयात आता जादा प्रमाणात साखर येणार नाही, अशी शक्यता असल्याने साखरेच्या किमती तेजीत आहेत. ४००० रुपयांच्या आसपासचा दर राज्यानुसार आहे. यामुळे सध्या साखर विकल्यास साखर कारखान्यांना दोन महिन्यांच्या तुलनेत फायदेशीर ठरत असल्याने कारखाने साखर विक्रीला प्राधान्य देत असल्याचे चित्र सध्या आहे.
गेल्या महिन्याच्या तुलनेत जादा कोटा दिलेली राज्ये
छत्तीसगड, गुजरात, हरियाना, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश
कमी कोटा दिलेली राज्ये
आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तराखंड
प्रमुख राज्यांना दिलेला कोटा असा
राज्य कोटा
उत्तर प्रदेश ८ लाख ३७ हजार ७४६
महाराष्ट्र ८ लाख ५ हजार २५६
कर्नाटक ३ लाख २३ हजार ९५५
बिहार ६३ हजार ९१३
गुजरात ७६ हजार ७६४
तमिळनाडू ३५ हजार ९३७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.