पुणेः देशातील बाजारात सध्या दर वाढले आहेत. अनेक बाजारात सध्या गव्हाचा दर (Wheat Rate) २ हजार ९०० रुपयांवर पोचला. दरवाढीवर नियंत्रणासाठी उद्योग सरकारकडे खुल्या बाजारात गहू विक्रीची (Wheat Sale) मागणी करत आहे. पण सरकार केवळ आश्वासन देतंय. कारण सरकारच्या गोदामांमध्ये गव्हाचा साठा (Wheat Stock) गेल्यावर्षीपेक्षा निम्माने कमी आहे.
मागील हंगामात देशात गव्हाचे उत्पादन कमी झाले. तसेच निर्यात जास्त झाल्याने दर तेजीत आले होते. खुल्या बाजारात गव्हाचे दर वाढल्याने सरकारची खरेदी कमी झाली होती. मागील हंगामात सरकारला उद्दिष्टाच्या निम्माही गहू खरेदी करता आला नाही. त्यामुळे नाफेडकडील गव्हाचा साठा घटला. त्यातच सरकारला कल्याणकारी योजनांसाठी गव्हाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवावा लागला. यात पंतप्रधान गरिब कल्याण योजनेचाही समावेश होता. त्यामुळं सरकारकडील गव्हाचा साठा आणखीच कमी झाला.
एक नोव्हेंबरला नाफेडच्या गोदामांमध्ये सध्या २१० लाख टन गव्हाचा साठा आहे. तर विविध सरकारी योजनांमध्ये वितरणासाठी २०५ लाख टन गहू आवश्याक आहे. म्हणजेच आवश्यकतेपेक्षा गहू जास्त प्रमाणात उपलब्ध नाही. मागील हंगामात याच काळात ४२० लाख टन गहू सरकारी गोदामांमध्ये होता. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा निम्माच गहू शिल्लक आहे.
गव्हाचे दर
सरकारने गहू निर्यातबंदी केल्यानंतरही गव्हाचे दर २ हजार ६०० ते २ हजार ९०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. गव्हाचे दर वाढल्यानंतर सरकार साठ्यातील गहू बाजारात आणेल, असं काही दिवसांपुर्वी सरकारने स्पष्ट केलं होतं. आता सरकारकडे साठा कमी असल्याची माहिती पुढे आल्यानंतर गव्हाचे दर पुन्हा वाढू शकतात. उद्योगाांनी सरकारकडे २५ लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची मागणी केली होती. मात्र सरकार केवळ आश्वासने देत आहे. याचाही परिणाम गव्हाचा दरावर होत आहे.
किती गहू विकावा लागेल?
वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारला ३० लाख टनांच्या दरम्यान गहू खुल्या बाजारात विकावा लागेल. पण सरकार एवढा गहू खुल्या बाजारात विकण्याची शक्यता कमीच असल्याचं व्यापारी म्हणत आहेत. सरकार सध्याच्या साठ्यातील १० ते १५ लाख टनच गहू बाजारात आणेल. मात्र याचा बाजारावर तेवढा परिणाम होणार नाही. तसंच देशाील नवा गहू एप्रिल महिन्यापासून बाजारात येईल. तोपर्यंत आहे त्या साठ्यावरच गरज भागावावी लागेल. त्यामुळे गव्हाचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज बाजारातील स्टाॅकिस्ट, व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.