
Sugar Export : देशातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा आणखी घटण्याची चिन्हे आहेत. प्रतिकूल हवामानामुळे उसाला तुरे येत असून वजनही घटलं आहे.
त्यामुळे ऊस उत्पादन घटणार असल्याचं शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. रॉयटर्स वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
साखर उत्पादनात घट होणार असल्यामुळे अतिरिक्त साखर निर्यातीची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
त्यामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किंमती चढ्या राहतील. त्याचा फायदा भारताचे स्पर्धक असलेल्या ब्राझील आणि थायलंडला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यांतील घडामोडी पाहता ऊस उत्पादन अंदाजात सातत्याने कपात होत आहे.
त्यामुळे साखरेच्या अतिरिक्त निर्यातीची मार्ग बंद झाला असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानेही नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात पहिल्या टप्प्यात ६१ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. गेल्या हंगामात विक्रमी ११० लाख टन साखर निर्यात झाली होती.
सरकारने यंदा दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी द्यावी, यासाठी साखर उद्योगाकडून लॉबिंग सुरू होते.
परंतु उत्पादन घटणार असल्याने सरकार निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता दिसत नाही.
भारतातून प्रामुख्याने इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया, सुदान, सोमालिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना साखर निर्यात केली जाते.
साखर उद्योगातील संस्थांनी गेल्या महिन्यात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदाच्या हंगामात (२०२२-२३) देशातील साखर उत्पादन ३४० ते ३४३ लाख टन राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. गेल्या हंगामात ३५८ लाख टन उत्पादन झाले होते.
परंतु देशातील ऊस उत्पादनात अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकात पीक लवकर पक्व झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऊस उत्पादन अंदाजात पुन्हा कपात करण्यात आली आहे.
"आमचा सध्याचा अंदाज ३३५ लाख टन ऊस उत्पादनाचा आहे. परंतु उत्पादन ३३० लाख टनाहून कमी होण्याची शक्यता आम्ही नाकारत नाही.
तसं झाल्यास जागतिक साखर पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे, " असे ‘अल्विन'चे ट्रेडिंग इन्टेलिजन्स हेड माऊरो व्हिर्गिनो म्हणाले.
अल्विन ही साखरेचा व्यापार करणारी जगातील सगळ्या मोठी कंपनी आहे. या कंपनीने ऊस उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी दोन व्यापक फील्ड सर्वेक्षण केलेले आहेत.
दुसऱ्या एका जागतिक साखर व्यापारी कंपनीने ऊस उत्पादनाच्या अंदाजात कपात करून ते ३२४ लाख टनावर आणले आहे.
महाराष्ट्रात ऊस उत्पादनात मोठी घसरण होऊन ते ११३ लाख टनावर येण्याची शक्यता या कंपनीने व्यक्त केली आहे.
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मात्र यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात १२८ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
रॉयटर्सने गेल्या आठवड्यात दोन डझनहून अधिक शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी ऊस लवकर पक्व झाल्यामुळे तुरा आल्याचे सांगितले.
" माझा ऊस फक्त दहा महिन्यांचा आहे. पण गेल्या महिन्यातच उसाला तुरे येण्यास सुरूवात झालीय. वजनही घटलंय,"असे सातारा जिल्ह्यातील शेतकरी अविनाश ठोंबरे म्हणाले.
बदललेल्या हवामानाचा फटका ऊस पिकाला बसल्याचे दिसत आहे. ‘‘मॉन्सून हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात ढगाळ हवामानामुळे ऊस वाढीच्या अवस्थेत सूर्यप्रकाश कमी पडला.
पिकाला ताण बसला आहे. त्यामुळे सगळीकडे उसाला तुरा आल्याचे दिसत आहे,'' असे ‘अल्विन'चे व्हिर्गनो म्हणाले.
महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटकात कारखान्यांना उसाचा तुटवडा पडू लागला आहे. आतापर्यंत देशातील किमान १७ कारखान्यांनी उसाचे गाळप थांबवले आहे.
तर फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत आणखी दोन डझन कारखान्यांची धुराडी बंद होतील, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.