
Kolhapur News : केंद्राने साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली खरी पण अजूनही साखर निर्यातीला गती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाअंतर्गत बाजारात साखरेचे दर वाढल्याने अनेक कारखान्यांनी निर्यात करार करण्यास फारशी पसंती दाखवली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
एप्रिलच्या मध्यापर्यंत केवळ साडेतीन टन साखरेचीच प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. एप्रिलच्या पूर्वाधापर्यंत साखर कारखान्यांनी सहा लाख टन साखरेचे करार विविध देशांशी केले आहेत. केंद्राने जानेवारीत निर्यातीस परवानगी दिल्यानंतर फेब्रुवारीअखेर पर्यंत निर्यातीचे करार गतीने झाले. मार्चमध्ये मात्र साखरेच्या किमती चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढल्यानंतर कारखानदारांनी निर्यात करार करण्यास हात आखडता घेतला.
देशात सर्वाधिक निर्यात महाराष्ट्र व कर्नाटकातील कारखाने करतात. आंतरराष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील दरात अगदी थोडाच फरक राहिल्याने मार्चमध्ये साखरेचे करार खूपच धीम्या गतीने झाले. अनेक कारखान्यांनी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेत निर्यातीचे मनसुबे मर्यादित ठेवले.
यंदाच्या हंगामात गेल्या हंगामापेक्षा पन्नास लाख टनांपर्यंत साखर उत्पादन कमी झाल्याने शिल्लक साखरेचा दबाव कारखान्यावर नाही, परिणामी झटपट करार करण्याबाबत कारखान्यांनी नापसंती दाखवली. यामुळे एप्रिलमध्ये निर्यात कराराचा वेग जवळजवळ थांबला आहे.
६ लाख टनांचे करार मार्चअखेर पर्यंत झाले आहेत. हीच साखर जशी जहाजे उपलब्ध होतील त्या प्रमाणात परदेशात जात आहे. नवीन साखरेचे करार फारसे होत नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. गेल्या पंधरवड्यापासून साखरेचे दर ३,७०० ते ३,८०० इतके आहेत. उन्हाळा असल्याने शीतपेय व आईस्क्रीम उद्योगातून मागणी असली तरी साखर दरात मात्र अपेक्षित वाढ नसल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.
निर्यात कराराची गती वाढण्याची आशा
साखर उद्योगाने सप्टेंबरपर्यंत केंद्राने दहा लाख टन साखर निर्यातीने दिलेले उद्दिष्ट साखर कारखाने पूर्ण करतील असा विश्नास व्यक्त केला आहे. कारखान्यांना अद्याप पाच महिन्यांचा कालावधी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दरात काही अंशी जरी वाढ झाल्यास निर्यात कराराची गती वाढेल, अशी आशा साखर उद्योगाला आहे.
येत्या काही दिवसांत ब्राझीलचा साखर हंगाम सुरू होणार आहे. यामुळे ती साखर जर बाजारात आली तर साखरेचे दर कितपत वाढू शकतात याबाबत व्यापारी सूत्रांमध्ये साशंकता आहे. जर या कालावधीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात दर नाही वाढले तर मात्र दिलेल्या उद्दिष्टाइतकी साखर कारखाने निर्यात करू शकणार नाहीत, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. १० पैकी ७ ते ८ लाख टन साखर निर्यात होऊ शकते, असे व्यापारी सूत्रांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.