
Pune News : महाराष्ट्रात यंदा तुरीची लागवड वाढली आहे. पण बाजारात आतापासूनच तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रानेही हमीभावाने तुरीची तातडीने खरेदी करावी आणि त्यावर ४५० रुपये बोनस द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सरकारने तातडीने पावले उचलली नाही तर अनेक शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावात तूर विकावी लागणार आहे.
देशातच यंदा तुरीची लागवड १४ टक्क्यांनी वाढली आहे. महाराष्ट्रातील लागवड वाढली. त्यामुळे यंदा उत्पादन वाढीचे अंदाज आहेत. त्यामुळे नवी तूर बाजारात दाखल होण्याच्या आधीच बाजारात तुरीचे भाव पडले आहेत. मागील दीड महिन्यातच तूर अडीच हजाराने पडली. त्यामुळे चांगला भाव पाहून तुरीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली.
कर्नाटकात आगाप लागवडीची तूर बाजारात येत आहे. पण बाजारभाव नसल्याने कर्नाटक सरकारने आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला. कर्नाटक ३ लाख ६ हजार टन खरेदी करणार आहे. शिवाय या तुरीला ४५० रुपये बोनसही देणार आहे. त्यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांना किमान ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळणार आहे.
कर्नाटकने आघाडी घेतली. पण महाराष्ट्रात अजूनही खरेदीबाबत संभ्रमावस्था आहे. सरकारने खरेदीचे उद्दीष्टही जाहीर केले नाही. यंदा महाराष्ट्रात कर्नाटकपेक्षा तुरीचे उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राने खरेतर कर्नाटकच्या पुढे जाऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. पण महाराष्ट्र सरकार आजही सोयाबीन खरेदीचा तिढा सोडवण्यातच गुंतले आहे. यंदा तूर उत्पादकांना चांगला दर मिळाला नाही तर पुढच्या हंगामात शेतकरी लागवडी कमी करतील, असे शेतकरी सांगत आहेत.
मागच्या वर्षभरात तुरीला चांगला भाव होता. त्यामुळे चांगल्या भावाच्या अपेक्षेने यंदा शेतकऱ्यांनी तूर लावली. शेतकऱ्यांना विक्रमी तर नाही पण किमान किफायतशीर तरी मिळावा, याची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्यासाठी कर्नाटकप्रमाणे हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना ४५० रुपये बोनस द्यावा. असे झाले तरच शेतकरी पुढच्या काळात तूर लागवडी वाढवतील आणि भारत तुरीमध्ये आत्मनिर्भर होईल.
यंदाही तेजीचे संकेत
बहुतांशी शेतकरी काढणी झाल्यानंतर लगेच तुरीची विक्री करतात. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव वाढून भाव कमी होतात. यंदाही तेच घडण्याची शक्यता आहे. जे शेतकरी लगेच तूर विकणार आहेत त्यांना सरकारने किमान ८ हजारांचा भाव द्यावा. तेसच जे शेतकरी काढणीनंतर लगेच तूर विक्रीचे नियोजन करत आहेत त्यांनी किमान हमीभावाने विक्री करावी.
पण जशी बाजारातील आवक कमी होईल, तसा बाजारात ८ हजारांच्या पुढे सरकेल. मार्च-एप्रिल महिन्यात तुरीचा बाजार एक हजाराने सुधारू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. पण शेतकऱ्यांनी सरकारीची धोरणे आणि बाजारातील घडामोडींकडे लक्ष ठेऊन असावे, असे आवाहनही अभ्यासकांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.