Soybean Market : सोयाबीन वधारले; परंतु सावधगिरी आवश्यक

Soybean Rate : दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांनी समाज माध्यमांवरील पोस्ट आणि चुकीचे बाजार सल्ले देणाऱ्यांच्या नादी न लागता आपले सोयाबीन न विकता साठवून ठेवले, त्यांना अल्पावधीतच चांगला फायदा झाला.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Soybean Market Update : मागील महिन्यात नवीन सोयाबीन बाजारात येऊ लागले आणि भाव कोसळले. एक वेळ तर सोयाबीन ४५०० रुपये क्विंटल या पातळीच्या खाली गेल्याचे देखील दिसून आले. समाज माध्यमांवर सरकारी धोरणे, व्यापारी आणि उद्योगपती यांच्याविरोधात रोष व्यक्त होऊ लागला.

काही शेतकरी नेत्यांनी आंदोलनाचे इशारे दिले. त्याच वेळी या स्तंभातून आणि शेतकरी वाचकांकडून येणाऱ्या प्रश्‍नांवर उत्तर देताना सातत्याने आपले सोयाबीन दोन महिने साठवून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. बाजारात दोन-तीन महिन्यांत कल-बदल होण्याची खात्री देतानाच सोयाबीन जानेवारीपर्यंत किमान पाच हजार रुपयांची पातळी गाठेल असे म्हटले होते.

या गोष्टीला आज जेमतेम एक महिना होत आहे. परंतु बाजारातील चित्र चांगलेच बदलले आहे. सोयाबीन ५२०० रुपये झाले आहे. लातूरमध्ये ऑइल मिल्सनी आठवडा अखेर ५४०० रुपयांचा भाव दिल्याचे दिसून आले. म्हणजेच हंगामाच्या सुरुवातीला ‘पॅनिक सेलिंग’च्या लाटेत ४५००-४६०० रुपयांनी आपला माल विकणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

पण दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांनी समाज माध्यमांवरील पोस्ट आणि चुकीचे बाजार सल्ले देणाऱ्यांच्या नादी न लागता आपले सोयाबीन न विकता साठवून ठेवले, त्यांना अल्पावधीतच चांगला फायदा झाला. एक महिन्यात असे काय घडले, की ज्यामुळे सोयाबीनचे भाव अल्पावधीतच ८००-९०० रुपयांनी वधारले? सोयापेंड निर्यातीत अपेक्षेपेक्षा खूपच अधिक झालेली वाढ आणि जागतिक बाजारात खाद्यतेलामध्ये आलेली तेजी यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्याचे दिसते.

जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमती वधारल्या आहेत. मागील एका महिन्यात अशुद्ध सोयातेल प्रति टन ९५० डॉलरवरून १०६० डॉलरवर गेले तर सूर्यफूल तेल ९०० डॉलरवरून ९६५ डॉलरवर गेले. तसेच पाम तेलदेखील कमी-अधिक प्रमाणात वाढले आहे.

दुसरीकडे तेलबिया पेंड निर्यातीच्या आघाडीवर कामगिरीत सुधारणा झाली आहे. साधारणत: या महिन्यांमध्ये अमेरिका आणि अर्जेंटिनामधील स्वस्त पेंड बाजारात आल्याने पेंडनिर्यात जेमतेम राहते. परंतु या वेळी अर्जेंटिनामध्ये उत्पादन घट झाल्यामुळे अमेरिकन पेंड तुलनेने महाग राहिली आहे. त्यामुळे भारतातून पेंड निर्यात वाढली. विशेष करून आशियायी देशांना भारतातून पेंड आयात करण्यासाठी वाहतूक भाडे स्वस्त पडते.

Soybean Market
Soybean Market: पाडवा, बलिप्रतिपदा आणि सोयाबीन

शिवाय भारतीय पेंड जीएमओ-मुक्त सोयाबीनची असल्यामुळे गुणवत्तेत सरस असते. केवळ सोयापेंडच नाही तर मोहरी पेंडदेखील निर्यातीचा नवीन विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोहरीच्या मजबूत किमतीचा आधार काही प्रमाणात सोयाबीनला देखील होत आहे.

मागील वर्षाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांत जेमतेम ५४ हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती. परंतु यंदा या दोन महिन्यांमध्ये ही निर्यात जवळपास चौपट होऊन १ लाख ९२ हजार टनापर्यंत पोहोचल्याचे खाद्यतेल उद्योग संस्थेने म्हटले आहे. यावरून असे स्पष्ट होते, की चालू तेजीची बीजे मागील मंदीतच पेरली गेली होती.

दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या सूर्यफूल वायदे व्यवहारांमुळे आपल्याला खाद्यतेल किमतीचा विश्‍वसनीय डेटा दररोज प्राप्त करणे शक्य झाले आहे. एनसीडीईएक्सच्या संकेतस्थळावर हजर (स्पॉट) बाजारातील ताज्या किमती दररोज दोन वेळा उपलब्ध केल्या जातात. सूर्यफूल तेलाच्या किमती मागील आठवड्यात ८६५ रुपये प्रति १०

किलो या पातळीवरून ९२५ रुपयांवर गेल्याचे या संकेतस्थळावर दिसून आले. याबाबत मागील आठवड्यात या स्तंभातून विस्तृत माहिती देण्यात आली होती. त्याप्रमाणे सोयाबीन आणि सूर्यफूल तेल यांच्या किमतीमध्ये ९३ टक्के सहसंबंध असल्याचे म्हटले होते. याचे प्रात्यक्षिक देखील मागील १० दिवसांतील किमतीच्या आलेखात दिसून येईल.

एकंदरीत पाहता सोयाबीनमध्ये अचानक आलेल्या तेजीने हरखून न जाता पुढील काळात सावध पावले टाकण्याची गरज आहे. कारण फेब्रुवारीमध्ये ब्राझीलमध्ये आणि एप्रिलमध्ये अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचा पुरवठा वाढणार का, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.

देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर सोयापेंड निर्यात मागील दोन महिन्यांत वाढली असली तरी आता सोयाबीन किमती वाढल्यामुळे जागतिक बाजारातील स्पर्धेत आपल्याला टिकून राहणे कठीण होईल. मागील संपूर्ण आर्थिक वर्षात सोयापेंड निर्यात १० लाख टनांपेक्षा अधिक झाली होती. या वेळी पहिल्या सात महिन्यांत पावणेसात लाख टन निर्यात झाली असून, वाढलेल्या सोयाबीन किमती पाहता पुढील दोन महिन्यांत निर्यातवेग मंदावू शकेल.

त्या प्रमाणात सोयाबीन किमतींमध्ये करेक्शन येऊ शकते. त्याच प्रमाणे मागील हंगामातील शिल्लक साठे बाजारात येऊ लागल्याने देखील सोयाबीनमध्ये नरमाई येऊ शकते. अर्थात, यापुढे ४९०० ते ५००० रुपयांच्या किंमत पातळीला मजबूत आधार राहील, अशी आशा करण्यास हरकत नाही. सोयाबीनमध्ये ५४५०-५५०० रुपयांची किंमत पातळी ओलांडणे ब्राझीलमधील हवामान, चीनमधील आर्थिक घडामोडी आणि सोयाबीन आयात या घटकांवर अवलंबून राहतील.

थोडक्यात सांगायचे, तर सोयाबीन आता ५०००-५४०० रुपये पातळीच्या ‘ट्रेडिंग रेंज’मध्ये आले आहे. या कक्षेमधून बाहेर येण्यास निदान सहा-आठ आठवडे तरी जावे लागतील. ज्यांना हेजिंग करायचे त्यांनी सूर्यफूल तेल वायद्यांचा वापर करावा.

Soybean Market
Soybean Market: ब्राझीलने ९० टक्के सोयाबीन विकलं; नव्या हंगामाची पेरणी सुरु

रब्बी पेरण्या

शुक्रवारअखेर संपलेल्या आठवड्यातील रब्बी पेरण्यांच्या आकडेवारीवरून हरभरा अजूनही १० टक्के पिछाडीवर असल्याचे दिसते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पावसाचे कमी झालेले प्रमाण दुष्काळाची व्यापकता वाढवत आहे. अशा वेळी गहू आणि हरभरा यात मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. गव्हाला पाणी जास्त लागते. गहू क्षेत्र सध्या चांगलेच पिछाडीवर आहे. परंतु सरकारी खरेदी आणि वाढीव हमीभाव यामुळे अखेरच्या टप्प्यात गहू पेरा वाढण्याची शक्यता आहे.

भाताची काढणी लांबल्यामुळे देखील गव्हाची पेरणी सध्या पिछाडीवर आहे. त्याच वेळी तुलनेने कमी पाणी लागणाऱ्या हरभऱ्याला दोन वर्षांतील विक्रमी भावाचा आधार मिळणार आहे. दोन्ही पिकांना पुढील हंगामात चांगले भाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगामाअखेर या पिकांचा पेरा पिछाडी भरून काढण्याची शक्यता आहे. कडधान्य बाजार निदान पुढील आठ-दहा महिने तरी तेजीत राहणार असल्यामुळे हरभरा पीक आकर्षक राहील.

या स्थितीमुळे मोहरी क्षेत्र कमी झाल्याचे दिसून येत आहे. अर्थात, सध्याची सोयाबीनमधील तेजी आणि मोहरी पेंड निर्यातीचा सलग दुसऱ्या वर्षी विक्रम होण्याची शक्यता यामुळे पुढील काळात मोहरी क्षेत्रदेखील पिछाडी भरून काढील असे वाटत आहे.

आडपिकांमध्ये धने हे मसाला पीक पुढील वर्षी बरा नफा मिळवून देऊ शकेल. कारण धन्याशी स्पर्धा करणाऱ्या जिरा पिकाचे जवळपास ७० ते ८० टक्के वाढीव क्षेत्र. जिऱ्याचे भाव मागील वर्षात विक्रमी ६५ हजार रुपये या विक्रमी पातळीवर गेले होते.

त्यामुळे गुजरात आणि राजस्थान या प्रमुख जिरे उत्पादक राज्यांत या पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्याचा फटका धन्याच्या लागवडीला बसणार आहे. धन्याचे क्षेत्र कमी राहणार असल्याने मागील हंगामात या पिकाला बसेल. त्यामुळे मागील हंगामात बऱ्यापैकी मंदीत राहिलेल्या धन्याचे भाव येत्या वर्षात ३० ते ४० टक्के वाढण्याचा अंदाज बाजारधुरीण व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com