
पुणेः सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) मागील १५ दिवसांमध्ये क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांची सुधारणा झाली. मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून सोयाबीनचे दर (Soybean Market Rate) काहीसे स्थिरावले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन दरात (Soybean Rate Global Market) चढउतार सुरु आहेत.
चीनमधील कोरोनाचे निर्बंध आता काहीसे शिथिल होत आहेत. चीन सरकारने कोरोना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि प्रवासी यांच्यासाठी काॅरंटाईनचा कालावधी आता दोन दिवसांवर आणला. तर जास्त रुग्ण सापडलेल्या विमान कंपन्यांवरील दंड वसुली आता थांबवली.
तसेच बाजारावरील काही निर्बंधही कमी केले आहेत. यामुळे बाजारातील व्यवहार वाढून चीनमधील बाजाराला उभारी मिळेल, अशी शक्यता आहे. परिणामी चीनची सोयाबीन मागणीही वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारत सोयाबीन दर सुधारण्यास मदत झाली. तसेच डाॅलरचे मुल्यही कमी झाले. त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीनला मागणी वाढत आहे.
तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या दरात सुधारणा होत आहे. खाद्येतल बाजार विश्लेषक पामतेलाच्या दराची पातळी ३ हजार ते ३ हजार ५०० रिंगीट प्रतिटन गृहीत धरत होते. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. पण रशिया आणि युक्रेनमधील निर्यातीवरील तोडगा अधांतरीच असल्यानं सूर्यफुल तेलाचा पुरवठा पुन्हा अडणीत आला.
त्यामुळं पामतेलाच्या बाजाराला आणखी तडका दिला. पामतेलाचे दर अणपेक्षितपणे ४ हजार १५० ते ४ हजार ३०० रिंगीट प्रतिटनांच्या दरम्यान पोचले. आजही पामतेलाचे दर जवळपास २ टक्क्यांनी वाढले. आज बुर्सा मलेशिया एक्सचेंजवर आज पामतेलाने कमाल ४ हजार २९३ रिंगीटचा टप्पा गाठला होता.
पामतेलाचे दर वाढत असल्यानं सीबाॅटवर सोयाबीन, सोयातेलाचे दर टिकून आहेत. आज सोयाबीनचे दर १४.४४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयातेलाच्या दरानं ७७ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. मात्र सोयापेंडच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. ३१ ऑक्टोबरला सोयापेंडचा भाव ४२८ डाॅलर प्रतिटनावर होता. त्यात चढउतार होत आता ४०६ डाॅलरपर्यंत कमी झाले आहेत.
बाजारात सुधारणा
तर देशातील सोयाबन दर टिकून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबनचे दर वाढले. त्यातच आता चीनची खरेदी वाढण्याचा अंदाज आहे. तसंच ब्राझील आणि अर्जेंटीनाच्या उत्पादनाबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर टिकून राहण्याचा अंदाज आहे. त्यातच केंद्र सरकारने सोयाबीनवरील स्टाॅक लिमिट काढले. त्यामुळं स्टाॅकिस्ट, मिलर्स आणि निर्यातदार खरेदीत उतरले आहेत. त्यामुळं मागील १५ दिवसांमध्येच सोयाबीनच्या दरासरी दरात क्विंटलमागं ७०० ते ८०० रुपयांची सुधारणा झाली.
देशातील दर
सध्या देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर अनेक बाजारात कमाल दराने ६ हजार रुपयांचा टप्पा गाठलेला आहे. तर काही बाजारांमध्ये कमाल दर ६ हजार ४०० रुपयांपर्यंतही पोचले होते. पुढील काही दिवस शेतकऱ्यांना सरासरी ६ हजार रुपये दर मिळू शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.