Amaravati News : बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची आवक चार हजार क्विंटलवर आणि दर ४५०० ते ४६१५ रुपयांवर स्थिरावली असताना बुधवारपासून (ता.१०) दर स्थिर असताना आवक मात्र अचानक वाढीस लागली आहे. शनिवारी (ता.१३) सुमारे साडेसात हजार क्विंटलपेक्षा अधिकची आवक झाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांकडून देण्यात आली.
केंद्र सरकारने खाद्य तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तेलबिया त्यासोबतच कच्चा तेलाच्या आयातीवर भर देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे देशांतर्गंत बाजारपेठेत तेलबियावर्गीय पिकांचे दर दबावात आले आहेत.
त्याचा फटका सोयाबीन उत्पादकांनाही बसत असल्याचे चित्र आहे. सध्या देशांतर्गंत बाजारपेठेत सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांपेक्षा खाली आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळेच बाजारात माल कमी आणण्यावर भर दिला जाता होता. अमरावती बाजार समितीमधील आवक गेल्या काही दिवसांपासून अवघ्या चार हजार क्विंटलवर स्थिरावली होती.
परंतु यापुढील काळात देखील सोयाबीन दरात तेजीचे कोणतेही संकेत मिळत नसल्याने अखेरीस सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्याच कारणामुळे बाजारातील आवक पूर्वीच्या चार हजार क्विंटलवरून सरासरी तीन हजार क्विंटलने वाढून साडेसात हजार क्विंटलवर पोहोचली आहे.
कमीतकमी ४५००, तर जास्तीत जास्त ४६५१ रुपयांचा दर सोयाबीनला मिळत आहे. दुसरीकडे बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलावा आणि कचरा निर्धारीत प्रमाणापेक्षा अधिक असल्यामुळेच दर कमी असल्याचा दावा व्यापारी करीत आहेत. कुटुंबाच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी मात्र नाइलाजाने सोयाबीन विक्रीवर भर देत असल्याचे चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.