
पुणेः देशातील सोयाबीनचा हंगाम (Soybean Season) सुरु होऊन आता जवळपास दीड महिना होत आला. दिवाळीच्या आधी देशातील सोयाबीन बाजार (Soybean Market) काहिसा दबावात होता. मात्र मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीनचे दर (Soybean Rate) वाढले आहेत. त्यामुळे सोयाबीन विकावं की ठेवावं? या द्विधा मनस्थित शेतकरी आहेत.
अमेरिकेचा सोयाबीन हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान सुरु होतो. भारतातही याच काळात सोयाबीन पीक बाजारात यायला सुरुवात होते. यंदा अमेरिकेत गेल्यावर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. तर भारतातही सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र बाजाराची खरी नजर आहे ती ब्राझील आणि अर्जेंटीनाकडे. यंदा या दोन्ही देशांमधील सोयाबीन उत्पादन वाढेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला.
ब्राझीलमध्ये खरंच उत्पादन वाढणार?
ब्राझीलमध्ये यंदा विक्री १ हजार ५२० लाख टनांवर उत्पादन पोचेल, असे युएसडीए सांगत आहे. मात्र बाजारातील अभ्यासकांना हा अंदाज मान्य नाही. ब्राझीलमध्ये यंदा पेरा वाढत असला तरी ला निनो च्या स्थितीमुळे पुढील काळात पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. हीच परिस्थिती अर्जेंटीनातही उद्भवणार आहे. एकूणच काय तर सध्या ब्राझील आणि अर्जेंटीनात विक्रमी उत्पादनाचे अंदाज असले तरी अंतिम उत्पादन कमी राहण्याचाच अंदाज बहुतेक अभ्यासक व्यक्त करत आहेत.
खाद्यतेल बाजारातील स्थिती
इंडोनेशिया आणि मलेशियात पामतेल निर्मितीला पाऊस आणि पुराचा फटका बसत आहे. त्यामुळं पामतेलाचे दरही वाढले आहेत. दुसरीकडे रशियाने आक्रमण केल्यानंतर युक्रेनमधील सूर्यफुल तेल उत्पादन घटले. तसेच निर्यातही ठप्प आहे. त्यामुळे जागतिक बाजारात यंदाही सूर्यफुलतेलाची उपलब्धता कमीच असेल. त्यामुळे सहाजिकच पामतेल आणि सोयाबीन तेलाला मागणी वाढेल.
ब्राझील बायोडिझेल बंधरनकार करेल का?
ब्राझीलने २०२२ पासून १० टक्के बायोडिझेल मिश्रणाचे उद्दीष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार पावले टाकणार असल्याचे वृत्त अलिकडेच आले होते. ब्राझीलने १० मिश्रणाचे धोरण राबविल्यास यात सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात वापर होईल. असं झाल्यास जागतिक बाजारातील सोयाबीन वापर वाढेल. या सर्व परिस्थितीमुळे यंदा सोयाबीनला चांगली मागणी राहू शकते. तसेच सोयाबीन तेलाचा वापरही वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या सर्व घटकांमुळे जागितक बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडेचे दर वाढलेले आहेत. ते टिकून राहील, असाही अंदाज व्यक्त होत आहे. तर देशातही सध्या सोयाबीनचे दर वाढलेले आहेत.
सोयाबीन विक्री करताना याकडे लक्ष द्या !
अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचा कमाल दर ६ हजार रुपयांपर्यंत पोचला. पण कमाल दर हा मोजक्याच म्हणजेच नगण्य मालाला मिळत असतो. जास्तीत जास्त माल हा सरासरी दराने विकला जातो. सध्या सोयाबीनचा सरासरी दर हा ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील काळात सोयाबीनचे दर वाढूही शकतात. मात्र ज्या शेतकऱ्यांना लेगच सोयाबीन विकण्याची घाई आहे, त्यांनी काही माल सध्या भावात विकण्यास हरकत नाही. मात्र बाजारात चढ-उतार सुरु असताना सर्व माल विकण्यापेक्षा मालाचे टप्पे पाडून विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.