
Pune News: केंद्राने मोकळीक दिल्याने देशात मागील वर्षभरात कडधान्य आयात दुप्पट झाली. तूर, उडीद, हरभरा, पिवळा वाटाणा आयातीने विक्रम केले आहेत. २०२४ मध्ये देशात विक्रमी ६६ लाख टन कडधान्य आयात झाल्याची शक्यता आहे. आधीच्या वर्षी ३३ लाख टन आयात झाली होती. यापुर्वी २०१७ मध्ये ६३ लाख टन आयात झाली होती. म्हणजेच आयातीने सगळे विक्रम मोडीत काढले. एवढेच नाही तर पिवळा वाटाणा २८ फेब्रुवारीपर्यंत तर हरभरा ३१ मार्चपर्यंत आणि तूर पुढील वर्षभर मुक्तपणे आयात होणार आहे.
देशात २०२३-२४ च्या हंगामात कमी पाऊस आणि भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कडधान्याची लागवड कमी केली होती. परिणामी उत्पादन कमी होऊन भाववाढ झाली. ही भाववाढ कमी करण्यासाठी सरकारने कडधान्य आयातीला पायघड्या घातल्या. आयातीवरील शुल्क शुन्य केले. सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये पिवळा वाटाणा आयात शुल्कमुक्त केली. २८ फेब्रुवारीपर्यंत पिवळा वाटाणा आयात खुलीच असणार आहे.
तसेच सरकारने तूर, हरभरा आयातही शुल्कमुक्त केली आणि सर्व दारे मोकळी केली. त्यामुळे देशात २०२४ या वर्षात विक्रमी ६६ लाख ३३ हजार टन कडधान्य आयात झाली. यापुर्वी २०१७ मध्ये जवळपास ६३ लाख टन आयात झाली होती. २०१७ मधील आयातीचा विक्रम यंदा मोडला आहे.
भारताला वर्षाला जवळपास २७० लाख टन कडधान्याची गरज असते. मात्र देशातील कडधान्य उत्पादन मागील हंगामात घटले होते. शेतकऱ्यांना कमी मिळालेले बाजारभाव आणि कमी पाऊस यामुळे उत्पादन घटले होते. २०२३-२४ च्या हंगामातील उत्पादन ३१ लाख टनांनी कमी होऊन २४२ लाख टनांवर स्थिरावले होते. २०२४-२५ मध्ये उत्पादनातही फार मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. खरिपातील उत्पादनही घटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशातील उत्पादन घटल्याने किमती वाढल्या. मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना तेवढा झाला नाही. कारण शेतकरी उत्पादन हाती आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांमध्ये माल विकतात. बाजारात पुरवठा वाढतो. उत्पादन घटल्याचा आधार या काळात बाजाराला मिळत नाही. त्यामुळे किमती कमी राहतात. नंतरच्या काळात तेजी आली तरी शेतकरी या तेजीपासून वंचित राहतात. सरकारनेही देशातील उत्पादन वाढवण्याऐवजी आयातीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे २०२४ या वर्षात विक्रमी कडधान्य आयात झाली.
पिवळा वाटाणा आयातीचाही विक्रम
भारताने पिवळा वाटाणा आयातीवरील शुल्क काढल्याने देशात आयातीचा लोंढाच आला. पिवळा वाटाणा आयातीचा विक्रम करत भारताने जवळपास ३० लाख टन आयात केली. पिवळा वाटाणा जवळपास सर्वच डाळींना काही प्रमाणात पर्याय ठरतो. तर हरभरा डाळ आणि बेसनला मोठा पर्याय म्हणून पिवळ्या वाटाण्याकडे पाहीले जाते. पिवळा वाटाणा आयात वाढल्याने हरभऱ्याच्या भावातील तेजी कमी होण्यास सुरुवात झाली.
तूर, उडदाचाही विक्रम
भारतात २०२४ मध्ये विक्रमी १२ लाख ३३ हजार टन तुरीची आयात झाल्याचा अंदाज आहे. ही आयात विक्रमी आहे. मागील हंगामात ८ लाख टनांच्या दरम्यान होती. उडदाची आयातही विक्रमी ७ लाख ६५ हजार टनांवर पोचली होती. तर मसूरची आयात जवळपास ११ लाख टन झाली आहे.
हरभरा आयात ४ पट वाढली
देशात २०२४ मध्ये हरभरा आयात चार पटीने वाढली आहे. २०२३ मध्ये हरभरा आयात केवळ १ लाख ३१ हजार टन झाली होती. मात्र २०२४ मध्ये आयात ५ लाख ७४ हजार टनांवर पोचल्याचा अंदाज आहे. त्यातही डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियातून मोठी खेप देशात दाखल झाली आहे. त्याचा बाजारावर परिणाम होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.