Kolhapur News : केंद्र सरकारने बी हेवी मोलॅसीस, उसाचा रस आणि सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर लावलेल्या प्रतिबंधाच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे. अनेक संघटना यासाठी केंद्रीय पातळीवर या मागणीसाठी जोर लावत आहेत.
हिवाळ्यात महाराष्ट्र व कर्नाटकात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे उसाची वाढ अनपेक्षित रित्या चांगली झाली. याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या उत्पादनवाढीवर होत आहे. यामुळे केंद्राला साखर उत्पादन घटीची जी भीती वाटत होती ती आता दूर होत असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.
साऊथ इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (कर्नाटक) ने अन्न मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांना पत्र लिहून सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसचा वापर प्रतिबंधित करण्याच्या आदेशावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीला अन्न मंत्रालयाने साखर कारखान्यांना इथेनॉल तयार करण्यासाठी उसाचा रस किंवा सिरप न वापरण्याचे निर्देश दिले होते. साखर उद्योगातून टीका झाल्यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेत १७ लाख टनांपासून साखर तयार करण्यास परवानगी दिली होती. हंगामाच्या सुरुवातीला ३५ ते ४० लाख टन साखर इथेनॉलसाठी वापर अपेक्षित होता.
साखर उद्योगातील संघटनांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक व महाराष्ट्रातील काही भागांत नोव्हेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत चार ते पाच दिवस सलग पाऊस झाला. तोडणी काही काळ रखडली असली तरी उसासाठी हा पाऊस फायदेशीर ठरला. पाऊस पडण्याअगोदर फारशी समाधानकारक परिस्थिती नव्हती पण पावसानंतर मात्र ऊस व साखर उत्पादनासाठी पोषक स्थिती निर्माण झाली.
निर्बंध उठवले तर हंगामाला फायदा
साऊथ इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले की, कर्नाटकात ४२ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता होती. पण आता या राज्यात ५० लाख टन साखर तयार होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात हंगाम बंद होण्याची चर्चा होती. पण आता बदलत्या परिस्थितीमुळे हंगाम २५ फेब्रुवारीपर्यंत जाईल, अशी शक्यता आहे.
अनेक शेतकरी ऊस तातडीने जावा यासाठी कारखान्यांकडे सातत्याने संपर्क साधत आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना साखरेला मागणी नसल्याने साखरेचे दर घसरत आहेत. यामुळे कारखान्यांना तोटा सहन करावा लागत आहे. केंद्राने जर इथेनॉल निर्मितीबाबतचे पूर्ण निर्बंध उठवले तर उर्वरित हंगामाला याचा फायदा होवू शकतो.
केंद्राने साखर टंचाईची भीती बाळगू नये
महाराष्ट्रातील काही भागातही अंदाजापेक्षा साखर निर्मिती वाढत असल्याचे महाराष्ट्रातील संघटनांचे म्हणणे आहे. केंद्राला वाटते तशी बिकट परिस्थिती सध्या तरी नाही. आधीच्या अंदाजापेक्षा देशाचे साखर उत्पादन १५ ते २० लाख टनांनी वाढेल आणि ही वाढ देशांतर्गत बाजारात साखरेची पुरेशी उपलब्धता होण्यासाठी पुरेशी ठरेल.
यामुळे केंद्राने साखर टंचाईची भीती बाळगू नये, असे आवाहन संघटनांनी केले आहे. तेल उत्पादक कंपन्यांनी निर्बंध घालण्याअगोदर उत्पादित केलेल्या बी हेवी, ऊस रस आणि सिरप पासून तयार केलेल्या इथेनॉलचा उठाव ही लवकर करावा, अशीही मागणी साखर उद्योगातून होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.