
सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागजसह अन्य परिसरात बेदाणा (Raisin Production) तयार केला जातो. यंदा द्राक्ष हंगामाच्या (Grape Season) प्रारंभीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे द्राक्ष हंगाम धरण्यास विलंब झाला. त्यामुळे यंदाचा बेदाणा निर्मितीचा (Raisin) हंगामही पंधरा दिवस लांबणीवर पडणार आहे. सध्या बेदाणा शेडची दुरुस्ती करण्याचे नियोजन शेड मालक करत असून मजूरही लवकर दाखल होणार आहेत.
जिल्ह्यात यंदा द्राक्ष हंगामाच्या प्रारंभीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे फळ छाटणी लांबणीवर पडली. पावसाने उघडीप दिल्यानंतर फळ छाटणी सुरू झाली. मात्र, ऑक्टोबरमध्येही पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळ छाटणी थांबवली. यंदाचा द्राक्षाचा हंगाम विखुरलेला आहे.
अर्थात पावसामुळे काही भागात आगाप फळ छाटणी तर, काही भागात एकाचवेळी फळ छाटणी झाली असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण होते, परंतु त्याचा फारसा परिणाम बागेवर झाला नाही. सध्या बागेला पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे दर्जेदार द्राक्ष तयार होण्यास मदत होणार असल्याने दर्जेदार बेदाणाही तयार होईल, अशी आशा बेदाणा उत्पादकांची आहे.
जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरासह मिरज तालुक्याचा पूर्व भाग, जत तालुक्याच्या पूर्व भागासह अन्य भागात बेदाणा तयार केला जातो. दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून बेदाणा निर्मिती सुरू होते. परंतु यंदा द्राक्ष हंगाम धरण्याच्या वेळीच पावसाने हजेरी लावली असल्याने फळ छाटणी मागे पुढे झाली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल, असे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सांगितले आहे.
शेडच्या डागडुजीचे नियोजन सुरू
बेदाणा हंगाम सुरू होणार असल्याने, बेदाणा शेडची दुरुस्ती, स्वच्छता करण्याचे नियोजन बेदाणा शेड मालकांनी सुरू केले आहे. बेदाणा निर्मिती करण्यासाठी राज्यासह परराज्यातील मजूरही या महिन्याच्या अखेरपर्यंत दाखल होतील. त्यानंतर शेडची दुरुस्तीचे काम हाती घेणार असून लवकर बेदाणा शेड दुरुस्त करून बेदाणा निर्मितीसाठी सज्ज होतील.
यंदाच्या हंगामात बेदाणा निर्मितीसाठी शेडची दुरुस्ती करण्याचे काम येत्या दोन दिवसांत हाती घेतले जाणार आहे. द्राक्ष विक्री झाल्यानंतर जो माल शिल्लक राहतो, त्यापासून बेदाणा निर्मिती सुरू होईल. परंतु बेदाण्यासाठी जे वाण आहेत, त्या वाणापासून बेदाण्याची निर्मिती फेब्रुवारीपासून सुरू होईल.
- सुनील माळी, बेदाणा शेड मालक
यंदा द्राक्षाला पोषक असे वातावरण असल्याने दर्जेदार द्राक्ष तयार होतील. त्याचबरोबर दर्जेदार बेदाणाही तयार होईल, अशी आशा आहे.
- पंकज म्हेत्रे,बेदाणा उत्पादक शेतकरी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.