
Sangli News: राज्यात यंदा अंदाजे १ लाख ५० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले असल्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. बाजारपेठेत बेदाण्याची मागणी स्थिर असूनही गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. आजअखेर सुमारे ३० हजार टन बेदाण्याची विक्री झाली असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच बेदाण्याचे दर स्थिर राहतील, अशी शक्यताही वर्तवली आहे.
यंदा निसर्गाची अवकृपेमुळे द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली होती. त्याचा फटका बेदाणा निर्मितीला मोठ्या प्रमाणात बसला. यामुळे हंगामाच्या निर्मितीपासून बेदाणा उत्पादनासाठी द्राक्षाची टंचाई निर्माण झाली होती. यंदाच्या बेदाणा हंगामात अंदाजे १ लाख ५० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. राज्यात गतवर्षी सुमारे २ लाख ८४ हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. अर्थात, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात बेदाण्याचे १ लाख ३४ हजार टनांनी उत्पादन घटले असल्याचा अंदाज बेदाणा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
यंदा बेदाण्याचे उत्पादन घटले. त्यामुळे सांगली, तासगाव आणि पंढरपूर या तीनही बेदाणा बाजारपेठेत बेदाण्याची आवक कमी अधिक प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या दीड महिन्याअखेर या तीनही बाजार समितीत बेदाण्याची २२०० ते २३०० टन बेदाण्याची आवक होती. बेदाण्याला मागणी असल्याने उठावही झाला. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेदाण्याच्या दरात प्रति किलोस ५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
सध्या तासगाव बाजार समिती आणि सांगली बाजार समितीत प्रत्येक सौद्याला अनुक्रमे ६०० टन बेदाण्याची आवक होते. पंढरपूर येथील बाजार समितीत आठवड्याला ७०० टनांची आवक होत आहे. सध्या बाजार समितीत बेदाण्याची आवक किंचित मंदावली आहे. मात्र, उठाव चांगला होत असल्याने गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. गेल्या तीन महिन्यांत अंदाजे ३० हजार टन बेदाण्याची विक्री झाली असल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.
बेदाण्याचे दर प्रति किलोत
हिरवा बेदाणा : २३० ते ३००
पिवळा बेदाणा : २०० ते २५०
काळा बेदाणा : ५० ते ११०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.