

Amaravati News : राज्य सरकारने हमीदराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेडमार्फत प्रारंभ केला असला, तरी जिल्ह्यात आतापर्यंत नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी केवळ दहा टक्के शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी होऊ शकला आहे.
हमीदराने खरेदीसाठी नाफेडच्या अटींना कंटाळून शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराचा रस्ता धरणे पसंत केले असून, बाजार समित्यांमध्ये दररोज दहा हजारांवर पोत्यांची आवक होत आहे. त्यामुळे सरकारच्या घोणषांचा लाभ नेमका कुणाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाफेडने चाळीस दिवसांत १७ हजार ४३७ क्विंटल सोयाबीन खरेदी केला आहे.
सोयाबीनच्या पडत्या दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारा रोष निवडणुकीत उफाळून आल्यास फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता तत्कालीन सरकारने सप्टेंबरमध्ये राज्यात १३ लाख मेट्रिक टन सोयाबीन हमीदराने खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एक ऑक्टोबरपासून नोंदणी व १५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरू केली.
जिल्ह्यात त्यासाठी जिल्हा मार्केटिंगची नऊ व विदर्भ मार्केटिंगची ११ केंद्रे सुरू केलीत. एकूण वीस खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ११ हजार नऊ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नाफेडला एफएक्यू दर्जाचाच सोयाबीन हवा असल्याने अनेक शेतकरी त्यामध्ये नापास केल्या गेलेत. परिणामी आतापर्यंत १,२०१ शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी झाला आहे. जिल्हा मार्केटिंगने १६ हजार १५१ व विदर्भ मार्केटिंगने १ हजार २८६ क्विंटल सोयाबीन हमीदराने खरेदी केला आहे.
शेतकऱ्यांची खुल्या बाजाराला पसंती
यंदाच्या हंगामात सोयाबीनला ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल असा हमीदर जाहीर करण्यात आला आहे. खुल्या बाजारात किमान ३,५५० व कमाल ४,२८० रुपये दर मिळत आहे. दररोज १० हजारांवर पोत्यांची आवक बाजार समितीमध्ये नोंदविण्यात येत आहे.
नाफेड व बाजार समितीमधील तुलना केल्यास शेतकऱ्यांची पसंती खुल्या बाजारात मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या घोषणांचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. नाफेडच्या अटी शिथिल करण्याची घोषणा केल्यानंतरही ही स्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.