Orange Market : छोट्या बागायतदारांसाठी संत्रा बाजारपेठेचा पर्याय

Varud APMC : मोठ्या बागायतदारांच्या बागांमधून व्यापारी थेट खरेदी करीत होते. मात्र छोट्या बागायतदारांसमोर नेहमी विक्रीचा प्रश्‍न निर्माण होत होता.
Orange Market
Orange MarketAgrowon

Amarvati News : मोठ्या बागायतदारांच्या बागांमधून व्यापारी थेट खरेदी करीत होते. मात्र छोट्या बागायतदारांसमोर नेहमी विक्रीचा प्रश्‍न निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेता वरुड बाजार समितीने खुल्या लिलाव पद्धतीच्या माध्यमातून अशा बागायतदारांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या बाजार समितीला शेतकऱ्यांचा देखील वाढता प्रतिसाद असून वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांतून देखील संत्रा फळे विक्रीसाठी आणली जातात, अशी माहिती सभापती नरेंद्र पावडे यांनी दिली.

राज्यात अमरावती जिल्हा हा सर्वाधिक संत्रा लागवड क्षेत्र असलेला आहे. सुमारे १ लाख हेक्‍टरची लागवड जिल्ह्यात आहे. त्यातील ७० हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या वरुड, मोर्शी तालुक्‍यात आहे. मात्र याच जिल्ह्यात बाजार समित्यांच्या माध्यमातून संत्रा खरेदी-विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने खासगी मंडीमध्येच संत्रा विक्री करावी लागते.

Orange Market
Orange Orchard : संत्रा बागांना हवामानाचा ट्रिगर लागूनही मदत नाही

शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी पहिल्यांदाच वरुड बाजार समितीकडून पुढाकार घेण्यात आला. हैदराबाद येथील फ्रुटेक्‍स ही कंपनी विविध फळांमध्ये काम करते. याच कंपनीने वरुड बाजार समितीच्या माध्यमातून संत्रा खरेदीवर भर दिला आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये पहिल्यांदा याप्रकारची विक्री व्यवस्था शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करून देण्यात आली. शेतकऱ्यांकडून आलेल्या फळांचे ग्रेडिंग केले जाते.

त्यानंतर खुला लिलाव पद्धतीने व्यापारी दर ठरवितात, अशी व्यवस्था या ठिकाणी आहे. त्यामुळेच त्याला शेतकऱ्यांचा देखील प्रतिसाद वाढता आहे. २ हजार २०० शेतकऱ्यांकडून पहिल्या वर्षी ३८०० टन आंबीया बहारातील फळांची खरेदी करण्यात आली.

या पद्धतीत २४ तासांत शेतकऱ्यांना चुकारे केले जातात. शेतकऱ्यांची केवायसी झालेली असल्यास अवघ्या दीड तासात त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. एक रुपया पाच पैसे याप्रमाणे सेसची आकारणी कंपनीकडून होते. यातील पाच पैसे सरकारला मिळतात.

Orange Market
Orange Market : संत्रा फळांनी गाठला ५५ ते ६० हजारांचा टप्पा

संत्रा विक्रीतून तीन कोटींचा सेस

भाजीपाला नियमनमुक्‍त करण्यात आल्यामुळ बाजार समितीचे सनियंत्रण निघाल्याने बाजार समितीच्या सेसवर याचा परिणाम झाला. पूर्वी वार्षिक तीन कोटी रुपयांचे उत्पन्न होत होते. त्यानंतर ७० लाख रुपयांवर वसुली आली.

आता नव्या कार्यकारिणीने राबविलेल्या उपाययोजनांमुळे बाजार समितीचे उत्पन्न पावणेदोन कोटी रुपयांवर पोहोचले आहे. संत्रा खरेदीसाठी बाजार समितीने फ्रुटेक्‍स कंपनीला जागा उपलब्ध करून दिली असून त्या ठिकाणी कंपनीने ग्रेडिंगसाठीची यंत्रणा बसविली आहे.

कमी फळे असलेल्या शेतकऱ्यांसमोर विक्रीचा पर्यायच नव्हता. माल कमी असल्याने व्यापारी बागांकडे फिरकत नव्हते. त्यामुळे अशा अल्प आणि अत्यल्प क्षेत्र असलेल्या बागायतदारांना विक्रीचा पर्याय या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. अमरावतीच नाही तर बुलडाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यांतून देखील या बाजारात संत्रा आवक नोंदविली गेली आहे.
- नरेंद्र ऊर्फ बबलू पावडे, सभापती, बाजार समिती, वरुड, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com