Onion Market : केंद्रामुळे कांदा पुन्हा दीड हजारांनी गडगडला

Onion Rate : गेल्या सप्ताहात निर्यातशुल्क रद्द करून किमान निर्यातमूल्य प्रतिटन ८०० डॉलर केल्यानंतर आठ दिवसांत कांदा दरात क्विंटलमागे १,३०० ते १,७०० व सरासरी १५०० रुपये घसरण झाली आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र सरकार कांदा उत्पादकांच्या बाजूने विचार करायला तयारच नसल्याची स्थिती आहे. गेल्या सप्ताहात निर्यातशुल्क रद्द करून किमान निर्यातमूल्य प्रतिटन ८०० डॉलर केल्यानंतर आठ दिवसांत कांदा दरात क्विंटलमागे १,३०० ते १,७०० व सरासरी १५०० रुपये घसरण झाली आहे. आवक घटूनही फटका बसत असून केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे.

गेल्या रब्बी उन्हाळ कांदा हंगामात लागवड ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यातच साठविलेल्या कांद्याची विक्रीपूर्वी ५० टक्के सड झाल्याने मोठा फटका बसला. त्यातच जवळपास ७५ टक्के कांदा उत्पादकांना आपला खर्चही वसूल करता आलेला नाही, अशी भयाण परिस्थिती आहे. मात्र तरीही केंद्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही.

Onion Market
Onion Market News : कांद्याचे दर वाढल्याने २५ कांदा पिशव्यांची चोरी

‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन केंद्रीय खरेदी यंत्रणांच्या माध्यमातून जवळपास ५ लाख टन कांदा खरेदी केला. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही. परिणामी जून ते ऑगस्टपर्यंत विक्री केलेल्या कांद्याचा उत्पादन खर्च वसूल झालेला नव्हता. त्यानंतर वातावरणीय बदलामुळे कांद्याची सड वाढल्याने आवक कमी झाली.

त्यावेळी केंद्र सरकारने पुन्हा दरावर नियंत्रण आणण्यासाठी अर्थ मंत्रालयाद्वारे कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले. त्यानंतर बाजारपेठ प्रभावित होऊन शेतकरी व व्यापारी, निर्यातदार अडचणीत आले.

तेव्हापासून बाजार घटक तणावात होते.शनिवारी (ता.२८)किमान निर्यात मूल्य प्रतिटन ८०० डॉलरची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर कांदा बाजारपेठ पुन्हा अस्थिर झाली. निर्यात शुल्क मागे घेत किमान निर्यातमूल्य लागू करून अप्रत्यक्ष निर्यातबंदी केली आहे.

Onion Market
Onion Market Price : किमान निर्यातमूल्य अधिसूचनेनंतर कांदा दरात घसरण; क्विंटलमागे सहाशे रुपयांपर्यंत तफावत

केंद्राकडून देशभरात स्वस्तात विक्री

केंद्राने कांद्याची प्रतिकिलो २५ रुपये दराने किरकोळ विक्री सुरू केली आहे. २ नोव्हेंबरपर्यंत २१ राज्यांमधील ५५ शहरांत विक्री दुकाने आणि मोबाईल व्हॅनचा समावेश असलेली ३२९ केंद्रे उभारली आहेत. ‘एनसीसीएफ’ने २० राज्यांमधील ५३ शहरांत ४५७ किरकोळ विक्री केंद्रे स्थापन केली आहेत.

केंद्रीय भांडारने देखील ३ नोव्हेंबरपासून दिल्लीमध्ये विक्री केंद्रावरून कांद्याचा पुरवठा सुरू केला आहे. तेलंगणा आणि इतर दक्षिणेकडील राज्यांतील ग्राहकांना कांद्याची किरकोळ विक्री हैदराबाद कृषी सहकारी संघाद्वारे केली जात आहे, अशी माहिती केंद्र सरकारने प्रसिद्धीस दिली आहे.

गेल्या आठ दिवसांतील दरातील घसरण (क्विंटल, रुपये)

बाजार समिती २८ ऑक्टोबर ४ नोव्हेंबर दर तफावत

लासलगाव ४,८०० ३,५०० १,३००

विंचूर(लासलगाव) ४,७५० ३,३५० १,४००

पिंपळगाव बसवंत ४,८०० २,५०० १,३००

येवला ४,३५० ३,००० १,३५०

कळवण ५,१०० ३,७०० १,४००

चांदवड ४,६७० ३,३०० १,३७०

मनमाड ४,६०० २,९०० १,७००

(संदर्भ ः पणन मंडळ)

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आता प्रत्यक्षात कांदा दरवाढ होण्यास सुरवात झाली तर सरकारने आता किमान निर्यात मूल्य प्रतिटन ८०० डॉलर वाढविल्यामुळे आठवडाभरात कांद्याचे दर दीड हजारापर्यंत घसरले. एकंदरीत केंद्राने ठरवून कांद्याचे भाव पाडले आहेत. त्यामुळे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन फसवे निघाले.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना.
ग्राहकांना स्वस्त भावात कांदा मिळावा, या साठी शेतीमालाचे दर पडले जात आहेत. जूनपासून कांद्याचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. मोठे नुकसान सोसल्यानंतर दर वाढले असताना पुन्हा ते पाडले आहेत. कृषिप्रधान देशात निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे.
- पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com