Onion Market Update नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून लेट खरीप कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर (Onion Rate) मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत. वादळी वाऱ्यासह गारपिटीने (Hilstorm) शेतमालाचे मोठे नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
अशी संकटांची मालिका असताना दुसरीकडे सुलतानी संकट शेतकऱ्याच्या डोक्यावर नाचत आहे. याचाच प्रत्यय म्हणजे सटाणा बाजार समितीमध्ये व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची क्रूर थट्टा करण्याचा प्रकार समोर आला आहे.
उन्हाळ कांद्याला अवघा १ रुपया २५ पैसे प्रतिकिलो दर मिळाला आहे. शेतकऱ्यावर जवळचे पैसे घालून भाडे देण्याची वेळ आली आहे.
सटाणा तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील शेतकरी सुभाष आहिरे यांनी दीड एकर लेट खरीप कांदा लागवड केली होती. त्यावेळी रोपे कमी पडल्याने त्यांनी लागवडीसाठी तयार केलेल्या उर्वरित ५ गुंठे क्षेत्रावर उन्हाळ कांदा लागवड केली होती. त्यासाठी जवळपास लागवड ते काढणीपर्यंत ८ हजार रुपये खर्च आला होता.
मात्र अवघा ५ क्विंटल १० किलो कांदा काढणीअंती निघाला. गोल्टी प्रतवारीचा हा माल आर्थिक अडचण असल्याने विकण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यावेळी मजुरांना २०० रुपये वाहन भरण्यासाठी देऊन तो कांदा शुक्रवारी (ता.२४) सटाणा बाजार समितीत आणला.
मात्र व्यापाऱ्याने अवघी सव्वा रुपयाची बोली लावून हा कांदा खरेदी केला. त्यापोटी कपात करून ५६९ रुपये ८५ पैसे हिशोबपट्टी मिळाली. त्यामुळे खिशातून वाहतूक भाडे १३१ रुपये द्यावे लागले.
कांदा भरण्यासाठी २०० तर वाहन भाड्यासाठी ७०० असा एकूण ९०० रुपये निव्वळ विक्रीसाठी खर्च आला होता. त्यामुळे कांदा विक्री करण्यासाठी खिशातून ३३१ रुपये देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली.
त्यामुळे एकप्रकारे घाम गाळून, भांडवल गुंतवून, शेतीमाल पिकविणाऱ्या शेतकऱ्याला हातात काहीच नाही, मात्र खुल्या बाजारात लूटच होत असल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्याचे कोलमडले अर्थकारण
- ५ गुंठे कांदा लागवड ते काढणी खर्च...८ हजार
- मिळालेले प्रत्यक्ष उत्पादन...५ क्विंटल १० किलो
- वाहनात कांदा भरणे व विक्रीसाठी वाहतूक खर्च...एकूण ९०० रुपये
- काढणी ते विक्रीपर्यंत खर्च...८९०० रुपये
- विक्रीनंतर मिळालेले उत्पन्न...५६९ रुपये ८५ पैसे
- झालेला निव्वळ तोटा...८ हजार ३३० रुपये १५ पैसे
बाजार समितीकडून दिशाभूल
सटाणा बाजार समितीकडून अधिकृत व्हाट्सअॅप ग्रुपवर कांद्याचे दर जाहीर केले जातात. त्यामध्ये उन्हाळ कांद्याचे शुक्रवारी(ता.२४) दर किमान २७५, कमाल १०७५ तर सरासरी ८७५ रुपये प्रतिक्विंटल होते. तर मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हेच दर होते. मात्र शेतकऱ्यांना १२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.