Soybean Production India : गेले वर्षभर शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचे ठरणाऱ्या सोयाबीनचे समीकरण यंदा बदलताना दिसत आहे. गेले वर्षभर भाव कमी असल्याने वाढलेला सोयाबीन वापर, देशात कमी झालेली पेरणी, पावसामुळे झालेले नुकसान यामुळे देशातील सोयाबीनचा पुरवठा कमी होणार आहे. तसेच देशातील जुने सोयाबीन जवळपास संपल्याने शिल्लक साठाच नाही. या परिस्थितीत सोयाबीन भावाला नक्कीच आधार मिळेल. तर दुसरीकडे मध्य प्रदेशाची भावांतर योजना आणि सुरुवातीच्या टप्प्यात मालात असलेला आलावा याचाही परिणाम बाजारावर दिसणार आहे..मुंबई येथे नुकतेच टेफ्लास आयोजित ग्लोबऑइल काॅन्फरन्स पार पडली. यामध्ये बाजारविश्लेषक आणि उद्योगांतील जाणकारांनी सोयाबीनसह तेलबिया उत्पादन, पुरवठा आणि संभाव्य किमतीवर चर्चा केली. यात सोयाबीनच्या ताळेबंदावर जीजीएन इंटरनॅशनलचे निरव देसाई, गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट लि.चे कार्यकारी संचालक मनीष गुप्ता, बुंगे इंडियाचे संचालक विद्या भूषण यांनी सविस्तर माहिती दिली.देशात यंदा सोयाबीनची लागवड घटली. पावसाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सोयाबीनचे नुकसान केले. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन यंदा गेल्या वर्षीपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. .देशातील सोयाबीन उत्पादन ९५ ते १०० लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल, असे या जाणकारांनी सांगितले. मागील हंगामात देशात १२५ लाख टनाच्या आसपास उत्पादन झाले होते. यंदा उत्पादन कमी होणार असल्याने सोयापेंडचेही उत्पादन कमी राहील. त्यामुळे देशातील वापर वगळता निर्यातीसाठी कमी माल उपलब्ध होईल. या सगळ्याचा परिणाम दरावर होऊ शकतो, असा सूर या वेळी झालेल्या विविध चर्चासत्रांतून निघाला..Soybean Bhavantar Yojana: सोयाबीनसाठी भावांतर योजना; मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय.विविध संस्थांचे उत्पादन अंदाजजीजीएन इंटरनॅशनलचे निरव देसाई यांनी सांगितले, की देशात यंदा सोयाबीनची लागवड पाच ते सात टक्के कमी झाली. तसेच पावसामुळे प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये झालेले नुकसान लक्षात घेता यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन १० ते १२ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. यंदा देशातील उत्पादन ९८ लाख टनांच्या पातळीला राहील. त्यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्यास मदत होईल. मात्र दुसरीकडे पावसामुळे सोयाबीनची गुणवत्ताही कमीच राहील, असा अंदाज देसाई यांनी व्यक्त केला..गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट लि.चे कार्यकारी संचालक मनीष गुप्ता यांनी देशात मागील वर्षभरात सोयाबीन आणि सोयापेंडचा वापर वाढल्याचे सांगितले. ते म्हणाले “मागील वर्षभरात देशात १३५ लाख टन सोयाबीन गाळप झाले. तर ९० ते ९५ लाख टन सोयापेंडचा वापर झाला. यापैकी देशांतर्गत वापर जवळपास ७० ते ७५ लाख टन राहिला. तर १५ लाख टन निर्यात झाली. तसेच मानवी खाद्यातही सोयापेंडचा वापर वाढला. मागील वर्षभर देशात सोयाबीन आणि सोयापेंडचा भाव कमी होता. त्यामुळे वापर वाढला. कमी भावात मागणी असल्याने सोयाबीनचे गाळप वाढले. त्यामुळे सध्या देशात सोयाबीनचा साठा नगण्य आहे. ऑक्टोबरमध्ये शिल्लक सोयाबीन काहीच नसेल. तसेच यंदा देशातील सोयाबीन उत्पादन १०० लाख टनांवरच स्थिरावण्याची शक्यता आहे.”.बुंगे इंडियाचे संचालक विद्या भूषण यांनी घटलेली लागवड आणि पावसाचा दणका यामुळे यंदा ९९ लाख टन सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला. तर काही जाणकारांनी ९५ लाख टनांचाही अंदाज व्यक्त केला. सोयाबीन पिकाची अजून काढणी सुरू व्हायची आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पादनाचा अचूक अंदाज येण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल..Soybean Harvesting : पावसामुळे सोयाबीन कापणीत व्यत्यय.सोयाबीनचा साठा संपलादेशात मागील वर्षभर सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव दबावात होते. दुसरीकडे स्वस्त डीडीजीएसही उपलब्ध होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयापेंड दबावात राहिले. खाद्यतेलासाठी सोयाबीनचे गाळप वाढले. त्यामुळे सोयापेंडचा साठा तयार झाला. या सगळ्या घडामोडींमुळे देशातील सोयाबीनचे भाव कमी राहिले. सोयापेंड स्वस्त राहिल्याने देशातील वापरही चांगला झाला. देशातच जवळपास ७० ते ७५ लाख टन सोयापेंडचा वापर झाला. कमी भावामुळे निर्यातही चांगली झाली. जत्यामुळे देशातील सोयाबीनचा साठा संपल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे.देशातील सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्यातही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे. ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात पाऊस कमी झाला तरी पीक काढणीच्या टप्प्यात येणार असल्याने पिकाला थेट फटका बसेल. तसेच काढणीला उशीर होणार आहे. त्यामुळे उद्योगांना यंदा २० ते ३० दिवस सोयाबीनची मोठी टंचाई भासण्याची दाट शक्यता आहे..सोयाबीनचा भाव वाढणार?देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन १५ ते २० टक्के घटण्याचा अंदाज आताच व्यक्त केला जात आहे. जसे जसे पीक नुकसानीचे आकडे पुढे येतील तसे उत्पादनात किती घट येईल, याचे चित्र स्पष्ट होईल. २०२४-२५ चा गाळप हंगाम सुरू झाला तेव्हा देशात मागील हंगामातील शिल्लक सोयाबीन ९ लाख टन होते. २०२३-२४ हंगामात हा साठा २५ लाख टनांच्या दरम्यान होता. पण यंदा जुने सोयाबीनच शिल्लक नाही. त्यामुळे सोयाबीनचे भाव गेल्या वर्षीपेक्षा अधिक राहतील, असा अंदाज ग्लोबऑइल काॅन्फरन्समध्ये जाणकारांनी व्यक्त केला..हमीभाव आणि भावांतरकेंद्र सरकारने यंदा सोयाबीनला प्रति क्विंटल ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला. सध्या प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहेत. तर जुने सोयाबीन बाजारात ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपयाने विकले जात आहे. नवे सोयाबीन, ज्यात ओलावा २० ते २५ टक्क्यांच्या दरम्यान आहे, ३ हजार ५०० रुपयांनी विकले जात आहे. महाराष्ट्र सरकार यंदा हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार आहे. तर मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनसाठी भावांतर योजना जाहीर केली. त्याचा परिणाम बाजारावर जाणवण्याची शक्यता आहे. भावांतर योजनेमुळे तिथे शेतकरी कमी भावात सोयाबीन विकतील. सरकार हमीभाव आणि बाजारभावातील फरक आपल्या शेतकऱ्यांना देईल. त्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल. पण एकूण देशातील बाजारभावावर यामुळे काही काळ दबाव राहू शकतो. उत्पादन घटीमुळे बाजारभावाला ज्या प्रमाणात आधार मिळायला हवा त्याला मध्य प्रदेशच्या भावांतर योजनेमुळे काही काळ खो बसण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.