Agrowon Podcast : ब्राझीलच्या सोयाबीनचा दरावर दबाव का वाढला?

Soybean Production Update : ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्यानं सोयाबीन बाजारातील समिकरणच बदललं.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनच्या वायद्यांमध्ये वाढ होऊन वायदे १४.३७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. तर सोयापेंडचे वायदे ४२६ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते.

देशातही काही बाजारांमध्ये सोयाबीन दरात काहीशी सुधारणा झाली होती. मात्र सरासरी दरपातळी कायम होती. सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील सुधारणा टिकल्यास देशातही सोयाबीन दर वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) देशात कापसाचा भाव स्थिर (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये जवळपास ३ टक्क्यांची वाढ झाली होती. कापसाच्या वायद्यांनी शुक्रवारी शेवटच्या सत्रात ८४.०६ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. मात्र देशातील बाजारावर त्याचा परिणाम दिसला नाही.

देशातील बाजारात कापसाचे भाव कायम होते. दर बाजारातील आवकही एक लाख गाठींच्या दरम्यान होती. कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांचा भाव मिळाला. पुढील काही दिवसांमध्ये देशातील बाजारात कापसाची आवक मर्यादीत होण्याचा अंदाज असून दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला.

३) कांदा दरावरील दबाव कायम (Onion Rate)

देशातील बाजारात कांद्याचे भाव सध्या दबावात आहेत. बाजारातील कांद्याची आवक आजही सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळं बाजारावर दबाव असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं सध्या कांद्याचे सरासरी भाव आजही उत्पादन खर्चापेक्षा कमीच असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

सध्या कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते १ हजार रुपये भाव मिळतोय. पुढील काही दिवस कांद्याची आवक आणि दरपातळी कायम राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

४) आल्याच्या भावात सुधारणा (Ginger Rate)

आल्याच्या दरात मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पावसामुळं काही भागांमध्ये पिकाचे नुकसान झाले. तर आल्याला मागणीही वाढली. पण बाजारातील आवक खूपच कमी आहे. त्यामुळे आल्याच्या दरात मोठी तेजी आली.

सध्या आल्याला राज्यातील बाजारात सरासरी ७ हजार ते १० हजार रुपयांचा दर मिळतोय. पुढील काळातही आल्याची आवक मर्यादीत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आल्याच्या दरातील तेजी टिकून राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) ब्राझीलची सोयाबीन निर्यात कशी सुरु आहे? (Soybean Export)

ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्यानं सोयाबीन बाजारातील समिकरणच बदललं. ब्राझीलचं सोयाबीन बाजारात आल्याबरोबर दरावर दबाव आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात मोठी घट मागच्या माहिनाभरात पाहायला मिळाली.

ब्राझील यंदा विक्रमी सोयाबीन निर्यात आणि गाळप करण्याचीही शक्यता आहे. ब्राझीलमधील संस्थांच्या मते यंदा ९७० लाख टन सोयाबीन निर्यात होऊ शकते. तर सोयापेंड निर्यातीतही ब्राझील यंदा विक्रमी टप्पा गाठणार आहे.

या सर्व शक्यतांमुळंच आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठा दबाव जाणतोय. ब्राझीलनं एप्रिल महिन्यात विक्रमी १४३ लाख टन सोयाबीन निर्यात केली. तर मे महिन्यात १२१ लाख टनांची निर्यात होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. सोयापेंड निर्यातीनंही ६३ लाख टनांचा टप्पा गाठला. ही निर्यात विक्रमी आहे.

ब्राझीलमधील सोयाबीनचा स्टाॅकही झपाट्यानं कमी होतोय. अमेरिका आणि अर्जेंटीनातही सोयाबीन उत्पादनात यंदा मोठी घट झाली. यामुळं ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन होऊनही बाजार काहीसा स्थिरावला. मागील दोन दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरातही काहीशी सुधारणा पाहायला मिळाली.

पण ब्राझीलमधील शेतकरी सोयाबीन विक्री कशी करतात, यावर गणित बऱ्यापैकी अवलंबून असेल. तसचं आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ टिकल्यास भारतातही सोयाबीनचा बाजार सुधारेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com