१) सोयाबीनमध्ये किंचित सुधारणा (Soybean Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये शुक्रवारी वाढ झाली. सोयाबीनचे वायदे १३.५२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे मात्र दबावातच दिसले. देशातील बाजारात सोयाबीन दर आजही ४ हजार ७०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते.
तर एनसीडीईक्सच्या डिलेव्हरी केंद्रांवर सोयाबीनचे भाव ५ हजार १५० ते ५ हजार ४०० रुपयांवर होते. देशातील बाजारात सध्या आवक आणि खाद्यतेलाचे नरमलेल्या दराचा दबाव आहे. त्यामुळे दरपातळी कायम दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) देशात कापूस दरात वाढ (Cotton Rate)
देशातील बाजारात कापसाच्या दरात मागील आठवडाभरात सुधारणा पाहायला मिळाली. कापसाची आवक कमी झाल्याने दर सुधारत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. खेडा खरेदीत कापसाला आज ७ हजार ३०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
तर आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारात यापुढील काळात कापसाची आवक कमी होत जाणार आहे. त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) कांदा भाव दबावातच (Onion Rate)
बाजारांमध्ये कांद्याची आवक काहीशी अधिकच दिसते. पण कांद्याची गुणवत्ता सध्या सुधारली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात बाजारात चांगल्या गुणवत्तेचा कांदा आला. त्यामुळे दरातही सुधारणा दिसून आली. कांद्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार ३०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
पुढील काळात कांद्याची गुणवत्ता चांगली असेल. तसेच आवकही काहीशी मर्यादीत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कांद्याच्या दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) हिरव्या मिरचीचा बाजारत तेजीतच (Green Chilli)
बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक कमी दिसते. पण हिरव्या मिरचीला उठाव चांगला आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे. सध्या राज्यातील, पणे, मुंबई, नागपूर, नाशिक या मोठ्या बाजारांंमध्येही आवक कमी दिसते.
यामुळे हिरव्या मिरचीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काळात मिरचीची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव तेजीतच दिसू शकतात, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
५) काबुली हरभऱ्याला सध्या काय भाव मिळत आहे? (Kabuli Chana)
देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन घटले. काबुली हरभऱ्याला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला. त्यामुळं उत्पादकता कमी राहीली. यंदा सरकारने देशात ४ लाख ५० हजार टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. पण उत्पादन ४ लाख टनांच्या आतच स्थिरावण्याची शक्यता आहे.
त्यामुळे बाजारातील आवक आता कमी झाली. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या बाजारांमध्ये काबुली हरभरा आवक सरासरीपेक्षा कमी आहे. एकीकडे देशी हरभरा दबावात असताना काबुली हरभरा मात्र तेजीत आला.
सध्या बाजारातील आवक कमी असताना उठाव मात्र चांगला मिळत आहे. जागतिक बाजारातही यंदा काबुली हरभऱ्याचा तुटवडा दिसू शकतो. त्यामुळे स्टाॅकीस्टही सक्रीय झालेले दिसतात. व्यापारी स्थानिक पातळीवरूनही काबुली हरभऱ्याची खरेदी करत आहेत.
या सर्व घटकांमुळे काबुली हरबऱ्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हा भाव मालाचा आकार आणि गुणवत्तेनुसार मिळत आहे. पुढील काळातही काबुलीची आवक कमीच राहील. त्यामुळे दरातील तेजीही टिकून राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.