Agrowon Podcast : मक्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे का?

Maize Market : देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावात आहेत. त्यातच केंद्र सरकारने तिसऱ्या सुधारित अंदाजात देशातील मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्याचं म्हटले.
Mazie Market
Mazie MarketAgrowon

१) सोयाबीन आज स्थिरावले (Soybean Rate)

सोयाबीनचे भाव सध्या एका भावपातळी दरम्यान काहीसे कमी जास्त होताना दिसत आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीनच्या भावात क्विंटलमागं ५० रुपयांची सुधारणा केली होती. तर एनसीडीईक्सच्या डिलेव्हरी केंद्रांवर सोयाबीन ५ हजार १०० ते ५ हजार ३५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

तर बाजार समित्यांमधील दराची सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होती. आणखी काही दिवस बाजारातील सोयाबीन आवक अधिक राहून दरावर दबाव दिसू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) वायद्यांमध्ये कापसात काहीशी सुधारणा (Cotton Rate)

राज्यातील महत्वाच्या राळेगाव, सेलू, सावनेर, वडवणी, हिंगणघाट, पूलगाव या बाजारांमध्ये कापसाची आवक हंगामातील उचांकी पातळीवर दिसत असल्याचे येथील व्यापारी सांगत आहेत. याचा परिणाम दरावर होतोय. आज दरातील नरमाई थांबलेली दिसली.

आज कापसाचा सरासरी भाव ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान होता. तर वायद्यांमध्ये दरात खंडीमागे दुपारपर्यंत ९०० रुपयांची सुधारणा होऊन ५९ हजार रुपये झाला होता. बाजारातील भाव आणखी काही दिवस दबावात दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) कांद्यावर आवकेचा दबाव (Onion Rate)

राज्यातील महत्वाच्या कांदा उत्पादक पट्ट्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या आवक जास्त आहे. आवकेचा दबाव असल्याने दरही दबावात आहेत. त्यामुळे सध्या कांद्याला सरासरी ७०० ते १ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत झालेल्या पावसाचा काही भागातील पिकाला फटका बसला होता. हा कांदा बाजारात येत आहे. तसेच यंदा उत्पादनही चांगले असल्याचे सरकारने सांगितले. त्यामुळे कांदा दरावरील दबाव काही काळ राहू शकतो, असाही अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Mazie Market
Onion Procurement : पुढील आठवड्यापासून ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदी

४) गाजराला चांगला उठाव (carrot Rate)

बाजारातील गाजर आवक सध्या कमी झाली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या बाजारांमध्येही सरासरीपेक्षा खूपच कमी आवक होते. तर दुसरीकडे गाजराला सध्या उठाव चांगला मिळत आहे. त्यामुळे गाजराचे भावही चांगले आहेत.

सध्या गाजराला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. गाजराचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) मक्याचे उत्पादन किती झाले? (Maize Rate)

देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावात आहेत. त्यातच केंद्र सरकारने तिसऱ्या सुधारित अंदाजात देशातील मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्याचं म्हटले. विशेष म्हणजे यंदा खरिप, रबी आणि उन्हाळी या तिनही हंगामातील उत्पादन सराकरने गृहीत धरले आहे.

गेल्या हंगामात ३३७ लाख टनांवर मका उत्पादन झाले होते. ते यंदा २२ लाख टनांनी वाढून ३५९ लाख टनांवर पोचल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला. विशेष म्हणजे यंदा रब्बीतील उत्पादन घटले. तर खरिप आणि उन्हाळी हंगामातील उत्पादनात वाढ झाली, असेही सरकारच्या आकड्यांवरून स्पष्ट होते.

सध्या बाजारात मक्याची आवक वाढत आहे. त्यातच निर्यातीसाठी मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे मक्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. मक्यासाठी १ हजार ९६२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर मक्याला अगदी १ हजार ७०० रुपयांपासून ते २ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

जास्त आवक असलेल्या बाजारांमध्ये मक्याला १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. एनसीडीईक्सच्या डिलेव्हरी केंद्रांवर मक्याला १ हजार ८०० ते १ हजार ९७० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

यंदा देशात मक्याचे उत्पादन वाढल्याने पुढील काळात देशातून मका निर्यात कशी राहते आणि माॅन्सून काळातील पाऊस यावर बाजार अवलंबून राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com