Soybean Market : खाद्यतेल बाजारामुळे सोयाबीनला फटका बसतोय का?

Edible Oil Rate : खाद्यतेलातील नरमाईचा सोयाबीनवर सध्या दबाव येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल, सूर्यफूल तेल आणि पामतेलाच्या दरात मोठी घट झाली.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

१) आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस स्थिर (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये काहीसे चढ उतार सुरु आहेत. कापसाचे वायदे आज ८३.७३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर प्रत्यक्ष खरेदीचा दर ९७ सेंटवर कायम होता. देशातील वायद्यांमध्ये मात्र आजही नरमाई होती.

वायदे ५८ हजार रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमध्येही दरात नरमाई कायम आहे. कापसला आजही ७ हजार ते ७ हजार ६०० रुपये दर मिळाला. देशातील बाजारावर आणखी काही दिवस दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) डाळिंबाची दरपातळी कायम (Pomegranate shortage)

देशात यंदा गुणवत्तेच्या डाळिंबाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या डाळिंबाला सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा उत्पादनात घट झाल्याचेही व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत. सध्या काही बाजारांमध्ये डाळिंबाची आवक काहीशी अधिक दिसते.

तर सरासरी मालाला ६ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. डाळिंबाचे दर पुढील काळातही कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

३) कांद्याचे दर दबावातच (Onion Rate)

कांदा दरावरील दबाव कायम आहे. बाजारातील कांदा आवक सरासरीपेक्षा जास्तच दिसते. बाजारात सध्या कांद्याला प्रतिवारीनुसार अगदी १०० रुपये क्विंटलपासून भाव मिळत आहे. राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये आवकेचा दबाव असल्याने कांद्याला सध्या ७०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे.

बाजारावर आणखी काही दिवस आवकेचा दबाव राहून दरपातळीही कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Soybean Market
Onion Rate : कांदाभावामुळे शेतकऱ्यांत असंतोष

४) टोमॅटो दरात काहीशी सुधारणा (Tomato Rate)

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान केले होते. यामुळे बाजारातील टोमॅटो आवक काहीशी कमी झाली आहे. परिणामी टोमॅटोच्या दरात सुधारणा झाली.

सद्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील टोमॅटो आवक पुढील काळात आणखी मर्यादीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) सोयाबीन बाजारावर नेमका काय परिणाम होतोय? (Soybean Rate)

खाद्यतेलातील नरमाईचा सोयाबीनवर सध्या दबाव येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल, सूर्यफूल तेल आणि पामतेलाच्या दरात मोठी घट झाली. आयातही स्वस्त पडत आहे. सध्या पामतेलाचे भाव गेल्यावर्षीपेक्षा ५० टक्क्यांनी कमी झाले. सध्या पामतेल ९२५ डाॅलर प्रतिटनाने आयात होत आहे.

तर सोयाबीन तेलाचे दर ४५ टक्क्यांनी कमी होऊन ९९० डाॅलर प्रतिटनापर्यंत आले. सूर्यफुल तेलाच्या भावातही ५६ टक्क्यांची घट झाली असून सध्या ९५० डाॅलर प्रतिटनाने भारतात आयात होत आहे. विशेष म्हणजे सध्या पामतेलाच्या तुलनेत सोयातेल आणि सूर्यफुल तेलाच्या दरातील तफावत कमी झाली.

Soybean Market
Soybean Seed : सोयाबीनच्या ‘हब’मध्ये घरचे बियाणे वापरावर जोर

यामुळे देशात सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढली. देशात सध्या तीन महीने पुरेल एवढा तेलाचा स्टाॅक असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात आले. परिणामी देशातील बाजारातही खाद्यतेलाचे भाव नरमले आहेत.

देशात पामतेल, सोयातेल आणि सूर्यफुल तेलाच्या दारत जवळपास १९ टक्क्यांनी घट झाली. तर मोहरी तेलाचे भावही १७ टक्क्यांनी नरमले. खाद्यतेलाचे भाव नरमल्याचा फटका सोयाबीन आणि मोहरीला बसत आहे.

सोयातेलाचे भाव कमी झाल्याने सोयाबीनला आधार मिळत नाही. सोयाबीनचे भाव सध्या ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काही काळ खाद्यतेलाचा सोयाबीन बाजारावर दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com