
१) कापूस बाजार स्थिर (Cotton Market(
सरत्या आठवड्यात कापूस दरात (Cotton Bajarbhav) देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार पाहायला मिळाले. देशात कापूस दर सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान राहिले. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८२.९८ सेंट प्रतिपाऊंडवर होते.
देशातील बाजारात सध्या कापसाची आवक चांगली आहे. उद्योगांना गरजेप्रमाणं कापूस मिळतोय. त्यामुळं कापसाचे दर कायम आहेत. पण कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) सोयाबीन दरात चढ उतार (Soybean Rate)
देशातील सोयाबीन बाजार (Soybean Market) स्थिर आहे. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारतील आवकही चांगली दिसते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार आहेत.
सोयाबीनचे वायदे १४.९९ सेंट प्रतिबुशेल्सवर बंद झाले, तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४५९ डाॅलरपर्यंत मान टाकली. देशात सध्या खाद्यतेलाची आवक वेगाने सुरु आहे. पण सोयापेंडला चांगला उठाव असल्यानं दरवाढीची अपेक्षा आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
३) जिऱ्याला तेजीचा तडका (Jeera Rate)
देशातील बाजारात सध्या जिऱ्याच्या दरात मोठी तेजी आली आहे. देशात सध्या गेल्या हंगामातील शिल्लक साठा खूपच कमी आहे. त्यातच हंगामातील पिकाचं पावसानं मोठं नुकसान झालं. त्यामुळं स्टाॅकिस्ट आणि मसाला कंपन्यांनी जिऱ्याची खरेदी वाढवली.
परिणामी जिऱ्याचे दर ३२ हजार ते ४० हजार रुपयांच्या दरम्यान पोचले. वायद्यांनी तर ४१ हजारांचा टप्पाही पार केला. यंदा जिऱ्याचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज आहे.
४) गहू दरात सुधारणा (Wheat Rate)
देशातील महत्वाच्या गहू उत्पादक भागांमध्ये मागील काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. याचा फटका इतर पिकांसह गव्हालाही बसला. अनेक ठिकाणी गव्हाचे नुकसान झालं आणि गुणवत्ताही खालावली. यामुळं हमीभावाच्या दरम्यान पोचलेल्या गहू दरानं पुन्हा उचल घेतली.
सध्या गव्हाचे दर महत्वाच्या गहू उत्पादक भागातील बाजारांमध्ये प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचले आहेत. पिकाचं होणारं नुकसान आणि सरकारची खरेदी, यामुळं गव्हाचे दर पुढील काळातही टिकून राहतील, असा अंदाज गहू बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
५) देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा सुरु (Edible Oil Import)
मागील वर्षभरापासून देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा सुरु आहे. याचा दबाव देशातील खाद्येतल बाजार आणि पर्यायानं तेलबियांवर येतोय. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन आणि मोहरी उत्पादकांना बसतोय. भारताचं तेल वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असं असतं. म्हणजेच नवं तेल वर्ष सुरु होऊन आता पाच महिने झाले.
या पाच महिन्यांमध्ये भारतानं जवळपास ७० लाख टन खाद्यतेलाची आयात केली. जी मागीलवर्षी याच काळातील आयातीपेक्षा १४ लाख टनांनी अधिक आहे. यात पामतेलाचा समावेश अधिक आहे. गेल्या वर्षी याच पाच महिन्यांमध्ये २६ लाख टन पामतेल देशात आलं होतं.
यंदा मात्र पामतेल आयात ४४ लाख टनांवर पोचली. म्हणजेच भारताच्या एकूण खाद्यतेल आयातीत पामतेलाचा वाटा जवळपास ६३ टक्के आहे. जो मागील हंगामात ४६ टक्के होता. भारत पामतेलाची आयात कमी करु शकतो, हे लक्षात आल्यानंतर इंडोनेशिया आणि मलेशियानं कमी दरात पामतेल देऊ केलं.
यामुळं देशात पामतेल आणि पर्यायानं खाद्यतेल आयात वाढली. यामुळं देशात सोयातेलावर कायम दबाव राहीला. मोहरी तेलही स्वस्त झालं. सोयाबीन दरवाढीसाठी यंदा सोयातेलाचा आधार मिळाला नाही. देशात खाद्यतेलाचे साठे पडून आहेत.
त्यामुळं खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी केली जाते. खाद्यतेल आयात शुल्कात वाढ झाली आणि आयात नियंत्रित झाल्यास देशातील तेलबिया बाजारालाही आधार मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.