१) सोयाबीन दरात आजही सुधारणा
देशातील बाजारात आजही सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे दर क्विंटलमागं १०० रुपायने सुधारले होते. आज बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला.
तर प्रक्रिया प्लांट्सचे दरही ५ हजार ५०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान पोचले. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Soybean Market) सोयाबीन आणि सोयापेंडचे दर (Soymeal Rate) तेजीत आहेत. त्यामुळे देशातील सोयाबीन दरवाढ कायम राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
२) कापूस दर स्थिर
देशातील बाजारात आज कापसाचे दर (Cotton Rate) स्थिर होते. तर कापसाची आवकही कायम होती. आज कापसाला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर टिकून आहेत.
कापसाचे वायदे ८५.८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशात सध्या कापसाचा भाव दबावात असला तरी पुढील काळात दर सुधारू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) कांद्याचा बाजारभाव दबावातच
देशातील कांदा बाजार सध्याही दबावातच आहेत. यंदा सुरुवातीच्या काळात कांदा पिकावर (Onion Crop) कडी-रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटले. त्यामुळे कांदा दर सुधारतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र सध्या कांद्याला ८०० ते १ हजार १०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.
आवकेचा दबाव असल्याने दर दबावात असल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळं कांद्याचे भाव आवक कमी होईपर्यंत दबावात राहू शकतात, असा अंदाज कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
४) गवारचे भाव तेजीत
सध्या गवारच्या दराने उच्चांकी पातळी गाठली. बाजारातील आवक नगण्य पातळीवर पोचली आहे. बहुतेक बाजारांमध्ये २ क्विंटलच्या दरम्यान आवक होत आहे. मात्र गवारला चांगला उठाव मिळत आहे.
त्यामुळे गवारला ५ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळतोय. गवारचे हे दर काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
५) केळीचे दर पुढील काळात काय राहू शकतात?
देशातील बाजारात सध्या केळीचे दर तेजीत आहेत. केळी उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटक या महत्वाच्या राज्यांमध्ये केळी उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदा देशात जवळपास ५ लाख हेक्टरवर केळी लागवड झाली. तर महाराष्ट्रातील लागवड ७५ हजार हेक्टरच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रात मागील हंगामात सुरुवातीच्या काळात केळीला अगदी २ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला होता.
मात्र बाजारात केळीची आवक वाढल्यानंतर दरात मोठी घसरण झाली. दरानं ८०० रुपयांचा निच्चांकी टप्पा गाठला होता. त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. परिणामी यंदा राज्यातील शेतकऱ्यांनी केळी लागवड कमी केल्याचं सांगितलं जातं. त्यातच केळीवर कीड-रोगांचाही प्रादुर्भाव झाला.
सध्या बाजारात केळीची आवक कमी आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण मालाला निर्यातीसाठी मागणी मजबूत आहे. पण सध्या केळीचा तुटवडा आहे. बाजारातील आवकही कमी असल्याने सध्या केळीला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.
तर किरकोळ बाजारात केळीला प्रतिडझन ६० रुपये ते ८० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. केळीचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज केळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.