१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले (Soybean Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर आज काहीसे सुधारले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरात चढ उतार सुरु आहेत. मात्र सरासरी पातळी टिकून आहे. सोयाबीनला दुपारपर्यंत १५.१३ डाॅलर प्रतिबुशेल्सचा दर मिळाला होता.
तर सोयापेंडचे भाव ४८७ डाॅलर प्रतिटनावर होते. देशातील सोयाबीनचे दर मात्र कायम होते. बाजारातील आवक वाढल्यामुळं दरावर दबाव आहे. पण आवक मर्यादीत झाल्यानंतर दर सुधारू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) कापूस दबावातच (Cotton Rate)
कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी गेल्या पाच महिन्यांतील निचांकी ७८ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. पण आज बाजार सुरु झाल्यापासूनच दरात सुधारणा दिसली. कापसाचे वायदे ८१ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते.
तर देशात कापसाची आवक वाढल्यानं दर दबावात आहेत. कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार २०० रुपये भाव मिळाला. कापसाची आवक मार्च महिन्यात जास्त राहण्याची शक्यता असून दरात चढ उतार राहण्याचा अंदाज आहे.
तर एप्रिल महिन्यात आवक मर्यादीत होऊन दराला आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) तुरीला मिळतोय चांगला भाव
देशातील बाजारात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. देशातील तूर उत्पादन घटले. तसेच आयातही तुटवड्याऐवढी होणार नाही. व्यापारी आणि उद्योग गरजेप्रमाणं खरेदी करत आहेत.
पण तुरीची आवक मर्यादीत असल्यानं दराला आधार मिळतोय. शेतकरी यंदा तुरीची एकदम विक्री करताना दिसत नाहीत. त्यामुळे दर तेजीत आहेत. तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत करत आहेत.
४) काकडीला मागणी वाढली
सध्या दुपारी उन्हाचा चटका अधिक जाणवतोय. त्यामुळं फळं आणि काकडीला मागणी वाढत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने काकडी पिकाचे काही भागांमध्ये नुकसान झाले. त्यामुळं काकडीची आवक सध्या कमी दिसते. पण दुसरीकडे काकडीला चांगला उठाव आहे.
त्यामुळे काकडीचे दर तेजीत आहेत. सध्या काकडीला सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपये भाव मिळतोय. उन्हामुळं काकडीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे.
५) गहू हमीभावाचा टप्पा पार करेल का?
देशातील गव्हाचा हंगाम आता तोंडावर आला. केंद्र सरकारने यंदा देशातील गहू उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला. पण वाढती उष्णता आणि वादळी पावसामुळे अनेक भागातील गहू पिकाला फटका बसत आहे.
त्यातच वाढलेले गव्हाचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार स्टाॅकमधील गहू विकत आहे. सरकारने भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यामातून आतापर्यंत ५ टप्प्यांमध्ये लिलाव केले. महामंडळाने पाचव्या टप्प्यात ११ लाख ८७ हजार टन गहू देऊ केला होता.
त्यापैकी फक्त ५ लाख ३९ हजार टर गव्हाचे लिलाव झाले. देशातील काही बाजारांमध्ये नवा गहू दाखल होतोय. त्यामुळं पाचव्या टप्प्यातील लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला. पण पाचव्या लिलावातील किंमत क्विंटलमागं ४ रुपयाने अधिक होती.
लिलावात गव्हाला सरासरी २ हजार १९८ रुपये दर मिळाला. पहिल्या लिलावात सर्वाधित २ हजार ४७५ रुपये दर मिळाला होता. गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकार स्टाॅकमधील माल बाजारात आणत आहे. यंदा केंद्राने ३४३ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले.
केंद्राने यंदा गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार १२५ रुपये हमीभाव जाहीर केला. केंद्र सरकारला गव्हाचे भाव कमी करण्यात यश आले. पण पाचव्या लिलावातील दर हमीभावापेक्षा ७३ रुपये अधिक दर मिळाला. त्यातच गहू पिकाचे नुकसान होत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळं खुल्या बाजारात गव्हाचे भाव यंदाही हमीभावापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.