
Market Bulletin :
सोयाबीन दबावातच
सोयाबीन भावावरील दबाव कायम आहे. खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे. सोयाबीनची हमीभावाने सरकार खरेदी करत आहे. मात्र ही खरेदी खूपच धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे त्याचा आधार खुल्या बाजारात मिळताना दिसत नाही.
तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. आज सोयाबीनचे वायदे ९.७५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस स्थिर
देशात कापसाच्या बाजारावर सध्या आवकेचा दबाव आहे. कापसाची आवक सध्या शिगेला पोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातही आजही देशातील बाजारात ६ हजार ९०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत.
शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ६८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. याचाही दबाव देशातील कापूस बाजारावर दिसत आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांदा नरमला
कांद्याच्या भावातील नरमाई कायम आहे. कांद्याच्या भावात मागील १० दिवसांमध्ये मोठी घट झाली. कांद्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. बाजारात सध्या कांद्याची आवक वाढत आहे. खरिप कांद्याची काढणीही जोमाने सुरु आहे.
त्याचा दबाव देशातील बाजारावर येत आहे. मात्र निर्यातीवर २० टक्के शुल्क असल्याने कांदा बाहेर जाण्यात अडथळे निर्माण होत आहेत. याचा दबाव बाजारात दरावर दिसत आहे. कांद्याला सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील कांदा आवकेतील वाढ कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
ज्वारी दबावातच
राज्यातील बाजारात ज्वारीचे भाव दबावातच आहेत. सध्या ज्वारीला हमीभावापेक्षा किमान २० टक्यांपर्यंत कमी भाव मिळत आहे. खरिपातील वाढलेले उत्पादन आणि बाजारातील आवक यामुळे दरावर दबाव आला आहे.
सध्या राज्यातील बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणानुसार प्रतिक्विंटल सरासरी २ हजार १०० ते २ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. यंदा रब्बी ज्वारीचाही पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा दबाव ज्वारीच्या भावावर येण्याची शक्यता आहे.
लसूण तेजीतच
बाजारातील लसणाची आवक कमी आहे. त्यामुळे लसणाच्या भावात चांगली तेजी आली आहे. लसणाला घाऊक बाजारात २४ हजार ते २८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. भाव जास्त असल्याने उठाव काहीसा कमी झाला.
मात्र सध्याची उपलब्धताही मर्यादीत आहे. त्याचा आधार लसणाच्या भावाला मिळत आहे. त्यामुळे लसणाचे भाव आणखी काही दिवस तेजीत राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.