Turmeric Rate : पुणेः हळदीच्या दरातील तेजी सध्या टिकून आहे. हळद वायद्यांसह बाजार समित्यां मध्येही तेजीत आहे. हळदीच्या वायद्यांनी आता १४ हजार रुपयांचा टप्पा पार केला. तर बाजार समित्यांमध्येही भावाने १२ हजारांची पातळी गाठली आहे. हळदीच्या दरातील तेजी पुढील काही महिने टिकून राहू शकते, असा अभ्यासकांनी व्यक्त केला.
हळदीच्या वायद्यांनी आज १४ हजारांचा टप्पा पार केला. ऑक्टोबरचे वायदे आज सायंकाळपर्यंत १४ हजार १०० रुपयांवर पोचले होते. तर डिसेंबरचे वायदे १४ हजार ३५८ रुपयांवर होते. तर ऑगस्टच्या वायद्यांनी १३ हजार २५० रुपयांचा टप्पा गाठला होता. सोबतच बाजार समित्यांमधील भाव आता ११ हजार ते १२ हजार रुपयांवर पोचले आहेत.
देशात मागील दीड महिन्यापासून हळदीच्या दरात चांगली वाढ झाली. मे महिन्यातील काही आठवड्यांमध्ये हळदीची विक्री ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांनी झाली. तर वायदे ७ हजारांच्या दरम्यान होते. पण नंतर हळदीच्या उत्पादनाविषयी चिंता व्यक्त होऊ लागली. मागील हंगामात हळदीला कमी भाव मिळाला. त्यातच माॅन्सूनचा पाऊस उशीरा दाखल झाला. राज्यासह महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये जून महिन्यात पावासाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हळद लागवडीवर परिणाम झाला.
देशातील बहुतांशी भागात हळदीची दुबार लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. पण दुबार लागवडीसाठी बियाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे यंदा हळदीची लागवड कमी राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोबतच बाजारातील कमी आवक, लागवडीला होणारा उशीर, प्रतिकूल हवामान आणि निर्यातीसाठी असलेली मजबूत मागणी यामुळे मागील महिनाभारत हळदीच्या दारत चांगलीच वाढ झाली.
यंदा महाराष्ट्रातील हळद लागवड मोठ्या प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. हळदीला कमी मिळलेला भाव आणि पावसामुळे पिकाचे झालेले नुकसान यामुळे यंदा शेतकरी इतर पिकांकडे वळल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये यंदा लागवड घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा देशात १२ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील काळात पाण्याचा ताण बसल्यास गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोरोनानंतर हळदीच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत चालू हंगामात हळदीच्या निर्यातीत ११ टक्क्यांची वाढ झाल्याचे निर्यातदारांनी सांगितले. सोबतच यंदा लागवड कमी राहून उत्पादनही घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ ते ५ महिने तेजीत राहण्याचा अंदाज आहे, असे जाणकारांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.