
अनिल जाधव
पुणेः देशातील बाजारात सोयाबीनचे दर (Soybean Rate) मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. मात्र आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत होते.
तसेच सोयातेलाच्या दरातही सुधारणा पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनच्या दरानं (Soybean Market) पुन्हा १५ डाॅलरचा टप्पा पार केला.
सोयाबीनचे दर मागील १० दिवसांतील उच्चांकी पातळीवर पोचले होते. यापुर्वी ३ जानेवारीला सोयाबीनचे दर १५ डाॅलरवर पोचले होते.
काल सोयाबीनचे वायदे १४.९५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. रुपयात हा दर ४ हजार ५१० रुपये होतो. आज बाजार सुरु झाल्यानंतर दरात वाढ होत गेली.
दुपारी ४ वाजेपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.०९ डाॅलरवर पोचले. रुपयात हा दर ४ हजार ५५३ रुपये प्रतिक्विंटल होतो.
सोयातेलाच्या दरात मात्र मोठे चढ उतार सुरु आहेत. सोयातेलाचे दर दुपारी ४ वाजेपर्यंत ६२.५६ सेंट प्रतिपाऊंडवर होते.
पामतेलाच्या दरातही सध्या तेजी मंदी होत आहे. त्याचा परिणाम सोयातेलाच्याही दरावर जाणवत आहे, असं खाद्यतेल बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.
सोयापेंड तेजीत
सोयाबीनसह सोयापेंडचेही दर तेजीत होते. सोयापेंडच्या दरानं आज मागील सहा महिन्यांतील उच्चांकी टप्पा गाठला होता.
दुपारी ४ वाजेपर्यंत सोयापेंडच्या दरानं ४७९ डाॅलरची पातळी गाठली होती. काल सोयापेंडचा बाजार ४७५ डाॅलरवर बंद झाला होता. म्हणजेच सोयापेंडचे दर आज ४ डाॅलरने वाढले होते.
देशातील दरपातळी
देशात आजही सोयाबीनचे दर कायम होते. आज देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार सुरु असल्याचा परिणाम देशातील दरावरही जाणवत असल्याचं जाणकार सांगत आहेत.
दरवाढीची अपेक्षा
यंदा अर्जेंटीनात विक्रमी सोयाबीन उत्पादनाचा अंदाज होता.
मात्र येथे दुष्काळाची तिव्रता वाढली. महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये सध्या पाऊस कमी असल्याने पिकाला फटका बसत आहे.
त्यामुळं उत्पादन घटणार आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चढ उतार सुरु असले तरी दरपातळी वाढली आहे.
तर भारत सरकारने एप्रिल महिन्यापासून सोयाबीन तेल आयातीवरील शुल्क लागू करण्याच निर्णय घेतला.
यामुळं देशातील सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.