कापूस, हरभरा, सोयाबीनच्या भावात नरमाई

या अवस्थेत आर्थिक वाढ कमी होते मात्र भाववाढ अनिर्बंध होते. यामुळे २०२२ मध्ये जागतिक आर्थिक वाढीचा दर २.५ टक्के अपेक्षित आहे. चीन, भारत व अमेरिका यांच्या आर्थिक वाढीचा दर अनुक्रमे ४.३ टक्के, ७.५ टक्के व २.५ टक्के असेल, असा बँकेचा अंदाज आहे.
Cotton &Soybean
Cotton &SoybeanAgrowon

डॉ. अरुण कुलकर्णी (फ्यूचर्स किमतीः सप्ताह- १८ ते २४ जून २०२२)

या सप्ताहात कापूस, हरभरा व सोयाबीन यांचे भाव उतरले. मका, मूग, तूर, कांदा यांचे भाव वाढले. या महिन्यात जागतिक बँकेने गेल्या वर्षातील आर्थिक घडामोडींचा आढावा घेऊन पुढील वर्षासाठी अंदाज करणारा अहवाल (Global Economic Prospects – World Bank Group, Flagship Report) प्रसिद्ध केला. तो https://www.worldbank.org/en/publication/global-economic-prospects या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या अहवालानुसार जागतिक अर्थव्यवस्था कोविड व रशिया-युक्रेन युद्धामुळे मंदीयुक्त भाव-पुरवठा (stagflation) अनुभवत आहे. या अवस्थेत आर्थिक वाढ कमी होते मात्र भाववाढ अनिर्बंध होते. यामुळे २०२२ मध्ये जागतिक आर्थिक वाढीचा दर २.५ टक्के अपेक्षित आहे. चीन, भारत व अमेरिका यांच्या आर्थिक वाढीचा दर अनुक्रमे ४.३ टक्के, ७.५ टक्के व २.५ टक्के असेल, असा बँकेचा अंदाज आहे. पुढील वर्षी (२०२३) परिस्थितीमध्ये फार सुधारणा अपेक्षित नाही. जागतिक आर्थिक वाढीचा दर ३ टक्के आणि चीन, भारत व अमेरिका यांच्या अर्थवाढीचा दर अनुक्रमे ५.२ टक्के, ७.१ टक्के व २.४ टक्के असेल.

मुख्यत्वे खनिज तेल, खनिज वायू आणि शेतीमालाच्या घसरलेल्या उत्पादनामुळे भाववाढ होत आहे. तेलाच्या किमती २०२२ मध्ये ५२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यात पुढील वर्षी बदल होण्याचा संभव नाही. युद्ध लांबले तर ही वाढ अधिकच मोठ्या प्रमाणावर होईल. शेतीमालाच्या किमती २०२२ मध्ये १८ टक्क्यांनी वाढल्या. पुढील वर्षी हा दर कमी होईल पण गेल्या पाच वर्षांपेक्षा तो जास्तच असेल. या सर्वाचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापार, वाहतूक व आर्थिक निर्बंधांवर होणार आहे.

शेतीमालाच्या (Agriculture Produce) किमती वाढत्या राहतील व सर्वच राष्ट्रे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतील. गरीब राष्ट्रात खाद्यवस्तूंचा तुटवडा अधिक भासेल. अखाद्य तेल व खाद्यतेलांच्या आंतरराष्ट्रीय किमतींचा परिणाम भारतावरही होईल. त्याच बरोबर या वर्षातील खरीप व रब्बी उत्पादनाचा सुद्धा परिणाम भावावर होईल. अपेक्षित आर्थिक वाढीचा दर आणि पुरेसे उत्पादन यांचा किमतीतील वाढ रोखण्यासाठी उपयोग होईल. या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) मे महिन्यात वाढत होते. सध्या ते कमी होत आहेत. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ०.४ टक्क्याने घसरून रु. ४७,९०० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ४.२ टक्क्यांनी घसरून रु. ४५,८९० वर आले आहेत. जुलै डिलिव्हरी भाव १०.८ टक्क्यांनी घसरून रु. ४१,३३० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा (प्रति २० किलो) ४.१ टक्क्यांनी घसरून रु. २,२७९ वर आले आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती मे महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.८ टक्क्याने घसरून रु. २,२०० वर आल्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. २,२४८ वर आल्या. फ्यूचर्स (जुलै डिलिव्हरी) किमती रु. २,२५६ वर आल्या. सप्टेंबर फ्यूचर्स किमती रु. २,००८ वर आल्या आहेत.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती मे महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या रु. ८,२७७ वर स्थिर आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. ७,८९४ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती जूनमध्ये उतरत होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्याने घसरून रु. ४,७८९ वर आल्या आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ६,५०० होती; या सप्ताहात ती ०.८ टक्क्याने वाढून रु. ६,३०० वर आली आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) मे महिन्यात उतरत होती. या सप्ताहात ती ६.६ टक्क्यांनी घसरून रु. ६,३१२ वर आली आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) मे महिन्यात कमी होत होती. गेल्या सप्ताहात ती रु. ५,९३० वर आली होती. या सप्ताहात ती ४.१ टक्क्यांनी वाढून रु. ६,१७३ वर आली आहे.

कांदा

कांद्याची स्पॉट किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२२९ होती; या सप्ताहात ती वाढून रु. १,४२९ वर आली आहे. कांद्याची आवक या महिन्यात प्रति सप्ताह साडे तीन लाख टन आहे.

टोमॅटो

टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) गेल्या सप्ताहात रु. ३,७५० होती; या आठवड्याच्या शेवटी ती रु. ३,६६७ पर्यंत आली. टोमॅटोची आवक या सप्ताहात पुन्हा वाढली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com