
अनिल जाधव
Cotton Prices : पुणेः कापूस बाजार तेजीत राहण्यासाठी यंदा परिस्थिती अनुकूल होत आहे. जागतिक कापूस उत्पादनात यंदा घट होणार आहे. पण अनेक देशांचा कापूस वापर वाढणार आहे. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव तेजीत राहणार आहे. मग तुम्ही म्हणाल दुष्काळामुळं पीक येत की नाही याची आम्हाला चिंता आहे. अन् तुम्ही त्यात उत्पादनाचं आणि बाजारभावाचं घेऊन बसलाय. पण उत्पादन घटल्यावर चांगला भाव मिळाला तरचं आपल्याला परवडेल.
तर यंदा झालं अस की, जगातील महत्वाच्या कापूस उत्पादक देशांमधील पिकांची स्थिती चांगली नाही. जसं आपलं कापूस पीक कमी पावसामुळं संकटात आहे. तसं अमेरिका, ब्राझील आणि चीनमध्येही परिस्थिती आहे. जगाच्या एकूण उत्पादनापैकी भारत, चीन, अमेरिका आणि ब्राझील हे चार देश तब्बल ७० टक्के कापूस उत्पादन घेतात. पण या चारही देशांमधील कापूस उत्पादन कमी होणार आहे.
चीनमध्ये सर्वाधिक घट अपेक्षित
अमेरिकेच्या कृषी विभाग अर्थात युएसडीएने यंदा जागतिक कापूस उत्पादन ६ टक्क्यांनी कमी राहीलं असं सांगितलं. पण कापूस वापर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यातच जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादन आणि वापर करणाऱ्या चीनमधील उत्पादन सर्वाधिक १२ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. पण यंदा चीनला कापूस गेल्यावर्षीपेक्षा जास्त लागणार आहे. म्हणजेच उत्पादन घटणार पण कापूस जास्त लागणार. म्हणजे चीन इतर देशांमकडून जास्त कापूस खरेदी करणार. तुम्हाला माहितीच आहे, चीन जेव्हा खरेदीत उतरतो तेव्हा सगळे एका बाजूला होतात आणि बाजार वाढतो.
अमेरिकेचंही उत्पादन घटणार
ब्राझीलमधील उत्पादनही ५ टक्क्यांनी घटणार आहे. तर अमेरिकेतील उत्पादनात ४ टक्क्यांची घट होईल. भारतातही गेल्या महिन्यापर्यंत उत्पादन २ टक्क्यांनी घटेल, असे युएसडीएने म्हटले. पण भारतात ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे भाररताच्या उत्पादनाचा अंदाज मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. या एकूणच परिस्थितीमुळे कापसाचा बाजार तेजीत राहू शकतो.
देशातील उत्पादनाला फटका
भारतात सध्या १२२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. पण देशातील महत्वाच्या कापूस उत्पादक भागात पाऊसच नाही. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटक या चार राज्यांमध्येच कापसाचे एकूण ७७ टक्के क्षेत्र आहे. नेमकं याच राज्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे. ऑगस्ट महिन्यात पिकांना पाण्याची नितांत गरज होती. पण पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच देशातील कापूस उत्पादन घटणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे देशातील बाजारातही कापसाचे भाव वाढू शकतात…
यंदा ऑफ सिझनमध्ये विक्रमी आवक
देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांमध्ये कापूस दरात वाढ झाली पण सध्या शेतकऱ्यांकडे कापूस नाही. हंगाम शेवटचा टप्प्यात आला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव नाही. चालू हंगामात कापूस शेवटच्या टप्प्यात नाईलाजानं कमी भावात विकावा लागला. मागच्या दोन वर्षांमध्ये कापसाला मे महिन्यानंतर विक्रमी भाव मिळाला होता. त्यामुळं चालू हंगामात शेतकऱ्यांनी मे महिन्यानंतरच कापूस विक्रीचा निर्णय घेतला. त्याचं झालं असं की ऑक्टोबर ते मार्च या पहिल्या पाच महिन्यांमध्ये बाजारातील कापूस आवक कमी राहून भाव टिकून होते. पण मार्चनंतर बाजारातील आवक वाढत गेली पण भाव कमी होत गेले. त्यानंतर आवक वाढतच राहिल्यानं मे महिन्यापासून भाव चालू हंगामातील निचांकी पातळीवर पोचले होते.
कापूस विक्री फायदेशीर कशी ठरेल?
यंदा ऐन ऑफ सिझनमध्ये आवक वाढल्याने कापूस दबावात आला होता. म्हणजेच पहिल्या चार ते पाच महिन्यांमध्ये खूपच कमी कापूस बाजारात आला होता. पण यंदा कापूस विकताना खूपच काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. आधी आपला उत्पादन खर्च काढा. आपल्याला एक क्विंटलसाठी किती खर्च आला हे काळालं की गिणत सोप होतं. त्यानंतर वेगवेगळ्या संस्था, सल्लागार, अभ्यासक हंगामातील भावाचे अंदाज देत असतात. यानुसार आपल्याला कापूस किती भावाने विकायचा हे ठरवावं. हा भाव आला की एक माल टप्प्याटप्प्यानं विकावा. टप्प्याटप्प्यानं यासाठी कारण भावात सतत चढ उतार होत असतात. आपण सगळाच माल उचांकी भावात विकण्यासाठी थांबलो आणि भाव कमी झाले तर नुकसान होऊ शकतं. त्यामुळं मालाचे टप्पे करून विकणं फायदेशीर ठरतं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.